गुंतवणुकीच्या मूल्यात घट झालीय?

मकरंद विपट
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

फेब्रुवारी २०१८ पासून शेअर बाजार खाली आल्याने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून परतावा तर सोडाच; पण गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेतही घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे आपण केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना?

फेब्रुवारी २०१८ पासून शेअर बाजार खाली आल्याने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून परतावा तर सोडाच; पण गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेतही घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे आपण केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना?

गेल्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबद्दल बरीच जागरूकता झाली आहे. बरेच गुंतवणूकदार इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायला लागले आहेत; कारण त्यातून मिळणारा परतावा हा इतर गुंतवणुकीपेक्षा जास्त आहे. पण, फेब्रुवारी २०१८ पासून शेअर बाजार खाली आल्याने गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीतून परतावा तर सोडाच; पण गुंतवणूक केलेल्या मूळ रकमेतही घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात एकच प्रश्न आहे आणि तो म्हणजे आपण केलेली गुंतवणूक बरोबर आहे ना?

काही गुंतवणूकदारांनी तर घाबरून जाऊन स्वतःची गुंतवणूक नुकसानीत विकून बाहेर पडण्याचा मार्ग अवलंबिला आहे आणि आता ‘कानाला खडा’... परत अशी गुंतवणूक करायची नाही! पण, या पडत्या बाजारामध्ये केलेली गुंतवणूक विकणे किंवा दीर्घ कालावधीसाठी केलेली ‘एसआयपी’ थांबविणे योग्य आहे का, असा प्रश्‍न स्वतःला विचारला पाहिजे. कारण तसे करणे खरेतर योग्य नाही. आपल्याला हे माहीत असायला हवे, की सध्याच्या बाजाराची वाटचाल ही ‘बुल मार्केट’मधील ‘करेक्‍टिव्ह ट्रेंड’ आहे. हा मंदीचा काळ नव्हे. ‘बुल मार्केट’मधील ‘करेक्‍शन’ ही नव्याने गुंतवणूक करण्याची संधी असते. थोडक्‍यात, आधी केलेली गुंतवणूक विकण्याची ही वेळ नसते.

अशा प्रकारचा कालावधी आपण या आधी, पण पाहिलेला आहे. २००९ ते २०१३ हा पाच वर्षांचा कालावधी जर बघितला, तर इक्विटी म्युच्युअल फंड १ ते १.५ टक्के सरासरी वार्षिक परतावा देत होते. कारण या पाच वर्षांत बाजार फारसा हललाच नाही. नंतर २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक निकालानंतर एक वर्षभर बाजारामध्ये तेजीचे वातावरण आले आणि आता जर २००९ ते २०१४ या सहा वर्षांचा परतावा बघितला, तर तो सरासरी २२ टक्के होतो. 

माझ्या मते, इक्विटीतील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्यासाठी दोनच गोष्टींची गरज असते आणि त्या म्हणजे १) नियमित गुंतवणूक, २) संयम.

इक्विटी म्युच्युअल फंड हे दीर्घ कालावधीत मोठा परतावा देतात, याचे उदाहरण सोबतच्या तक्‍त्यातून आपणास दिसू शकते. वरील तक्‍त्यात दिलेले उदाहरण हे प्रत्यक्ष एका गुंतवणूकदाराचे उदाहरण आहे. त्यावरून तुम्हाला कळेल, की त्याला एवढा जास्त परतावा का मिळाला ते! त्याचे कारण म्हणजे बाजारातील तात्कालीक घसरणीला घाबरून न जाता त्याने आपली गुंतवणूक वाढण्यासाठी योग्य तो वेळ दिला आणि संयम बाळगला. त्या गुंतवणूकदाराला इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून १५ वर्षे झाली आहेत. 

आता आपण बघूया की गेल्या १५ वर्षांत शेअर बाजारात नक्की किती वर्षे तेजीची होती ती -
२००४ ते २००८    ४ वर्षे
२०१४                १ वर्ष
२०१७                १ वर्ष

म्हणजे गेल्या १५ वर्षांत फक्त सहा वर्षे तेजी आणि बाकीची नऊ वर्षे मंदी होती. तरीदेखील परतावा १०७२ टक्के म्हणजे सरासरी वार्षिक परतावा १८.२८ टक्के!

म्हणूनच शेअर बाजारातील सध्याच्या घसरणीकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या थोडे कमी दिसत आहे म्हणून त्यातून बाहेर पडू नका, संयम बाळगा. दीर्घ कालावधीसाठी केलेली म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ अजिबात थांबवू नका, हा एकच सल्ला. अजून एक महत्त्वाचे म्हणजे जर आता पुढील पाच-सहा वर्षांच्या कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची तयारी असेल, तर या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींकडून सल्ला घेऊन नक्की गुंतवणूक करा. कारण सध्याची वेळ ही विकण्याची नाही, तर गुंतवणुकीची आहे, हे लक्षात घ्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: value of investment reduced Mutual Funds