
Vedanta महाराष्ट्राला बनवणार आयफोन, टीव्ही उपकरणांच्या निर्मितीचं हब
नवी दिल्ली : फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पावरुन सध्या महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. वेदांता लिमिटेड भारतात आयफोन आणि टीव्ही उपकरणांच्या निर्मितीचं हब बनवणार आहे, अशी माहिती खुद्द वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी दिली. CNBC TV 18 ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Vedanta to create hub to manufacture iPhones TV equipment in India)
अग्रवाल म्हणाले, आयफोन आणि इतर टेलिव्हिजन उपकरणे तयार करण्यासाठी कंपनी पश्चिम भारतातील महाराष्ट्रात एक केंद्र (हब) तयार करेल. गुजरात जेव्ही प्लांटसाठी हे एक प्रकारचे फॉरवर्ड इंटिग्रेशन असेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
याबरोबरच तेल ते धातू उद्योगाकडून इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रातही गुंतवणूक करणार असल्याचं यावेळी अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्बन कमी करण्याच्या अजेंड्यामध्ये ईलेक्ट्रिक वाहनं हे केंद्रस्थानी आहेत. सन 2030 पर्यंत भारतात एकूण कार विक्रीत इलेक्ट्रिक वाहनांचा 30 टक्के वाटा असेल, असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून वेदांता चर्चेत असल्यानं वेदांताचे शेअर्स 8 टक्क्यांपर्यंत वाढून 10 जूननंतर सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.