व्हिंटेज वेस्पा

शशांक पाटील
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

वेगवान बाईकस्‌ आणि आधुनिक स्कूटीमध्ये आपली एक वेगळी ओळख टिकवून ठेवलेली ७३ वर्षे जुनी वेस्पा पुन्हा एकदा भारतीय बाजारात विक्रीस आली आहे. पीआयजीओ या इटालियन कंपनीची वेस्पा सध्या जगभरातील रस्त्यांवर धावताना दिसून येते...

वेगवान बाईकस्‌ आणि आधुनिक स्कूटीमध्ये आपली एक वेगळी ओळख टिकवून ठेवलेली ७३ वर्षे जुनी वेस्पा पुन्हा एकदा भारतीय बाजारात विक्रीस आली आहे. पीआयजीओ या इटालियन कंपनीची वेस्पा सध्या जगभरातील रस्त्यांवर धावताना दिसून येते...

आपले अनोखे आणि आकर्षक रंग वेगळी डिझाईन यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्पा या स्कूटरने १९४६ मध्ये जागतिक बाजारात प्रवेश केला होता. दरम्यान दोन वर्षांपूर्वी म्हणजे १९४४ मध्ये पीआयजीओ कंपनीचे अभियंते रेन्झो स्पोल्टी आणि विटोरिओ कॅसिनी यांनी पहिले वेस्पाचे मॉडेल बनविले. इतर स्कूटरपेक्षा वेगळ्या प्रकारचे रंग आणि हॅंडलबारमधील भिन्नता यामुळे वेस्पा ही इतर स्कूटरपेक्षा वेगळी दिसत होती. २३ एप्रिल १९४६ रोजी पीआयजीओ कंपनीने इटलीतील फ्लोरन्स येथे वेस्पाचे उद्‌घाटन केले. ९८ सीसीचे इंजिन असणारी ही वेस्पा सिंगल सीट होती. पुढे जाऊन मागे एक आणखी सीट किंवा सामान ठेवण्यासाठी जागा देण्यात आली होती. 

वेस्पाला इटलीत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर १९५५ च्या आसपास इतर देशात कंपनीने वेस्पा विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. ज्यात अमेरिका, फ्रान्स, बेल्जियम आणि स्पेन या देशांचा समावेश होता; तर १९६० मध्ये भारत, ब्राझील, इंडोनेशिया या देशातही वेस्पा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. विशिष्ट डिझाईन आणि आकर्षक रंगामुळे पुढील १० वर्षात वेस्पाची विक्री लाखोंच्या घरात पोहोचली. पुढे जाऊन वेस्पाचे इंजिन आणि बॉडीत बदल करण्यात आले. सुरुवातीला चाकाच्या वरच्या बाजूस असणारी हेडलाईट ही हॅंडलबारवर देण्यात आली. तसेच ९८ सीसीचे इंजिन थेट १२५ सीसी करण्यात आले.  

भारतात वेस्पाची विक्री सुरू करण्यासाठी पीआयजीओला बजाज या भारतीय कंपनीची मदत घ्यावी लागली. कंपन्यांनी मिळून १९६० मध्ये वेस्पा भारतीयांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिली. पुढे जाऊन बजाज आणि पीआयजीओ यांच्यातील करार संपल्यानंतर बजाजने स्वत:ची ‘चेतक’ नामक स्कूटर भारतीय बाजारात आणली. त्यामुळे भारतातील चेतक हीदेखील वेस्पाच्याच डिझाईनने प्रेरित आहे. बजाजनंतर पीआयजीओने १९८३ मध्ये एलएमएल मोटर्स या भारतीय कंपनीशी करार करत १९९९ मध्ये पुन्हा एकदा भारतीय बाजारात वेस्पा दाखल केली.

२०१२ मध्ये दिल्लीत पार पडलेल्या वाहन मेळाव्यात पीआयजीओने भारतात पुन्हा एकदा वेस्पा लाँच केली. आधीच्या मॉडेल्सपेक्षा आधुनिक आणि आकर्षक वेस्पा ही पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीस उतरली. त्यामुळे इतर स्कूटीजच्या तुलनेत महाग असूनही वेस्पाची भारतीय बाजारातील विक्री चांगलीच वाढली. सध्या वेस्पाचे नऊ प्रकारचे मॉडेल बाजारात विक्रीस असून यातील सुरुवातीच्या मॉडेलची एक्‍स शोरूम किंमत सुमारे ८३ हजार आहे.

तसेच वेस्पाची सर्वात महाग सूक्‍टर म्हणून ओळखली जाणारी वेस्पा ९४६ एम्पोरिओ आरमनी हीदेखील भारतात विक्रीसाठी आणण्यात आली होती. तिची एक्‍स शोरूम किंमत तब्बल १२ लाखाच्या घरात होती. दरम्यान इतक्‍या जास्त किमतीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद न मिळाल्याने ही स्कूटर भारतातून विक्रीसाठी कमी करण्यात आली.  सुरुवातीपासून अनोखे डिझाईन, मनमोहक रंग यामुळे ग्राहकांच्या मनात भरलेली वेस्पा आजही आपली वेगळी ओळख भारतीय बाजारासह जगभरात टिकवून आहे.

हॉलीवुडकरांची लाडकी

१९५२ च्या रोमन हॉलीडे या चित्रपटात अभिनेता ग्रिओगिरी पेक याने वेस्पा ही स्कूटर वापरली होती. ज्यामुळे वेस्पा सामान्यांत इतकी प्रसिद्ध झाली की १९५६ मध्ये तब्बल १ लाख वेस्पा स्कूटर विकल्या गेल्या. ज्यानंतर जॉन वेन, मार्लोन ब्रॅंडो, डिन मार्टीन, ॲबी लेन यांसारख्या प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्यांनी वेस्पा वापरायला सुरुवात केली. त्यामुळे रातोरात वेस्पाची लोकप्रियता कमालीची वाढली.

web title : vespa scooter history 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vespa scooter history