कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात

विजय तावडे
Tuesday, 19 May 2020

आधीच म्युच्युअलफंडाचे गुंतवणूकदार असलेले आणि नव्याने गुंतवणूकीची सुरूवात करू इच्छिणाऱ्यांनी सद्य परिस्थितीत घाबरून न जाता नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहूया

कोरोना विषाणूमुळे आलेल्या महामारीमुळे सर्व जग अभूतपूर्व संकटात सापडल्यामुळे दैनंदिन कामकाजच ठप्प झाल्यासारखे झाले आहे. अर्थचक्रावर याचा विपरित परिणाम झाला आहे. शेअर बाजारात आणि इतर मालमत्ता प्रकारातदेखील मोठी अस्थिरता यामुळे निर्माण झाली आहे. आर्थिक नियोजनावर या सर्व घटकांचा परिणाम नक्कीच झाला आहे. गुंतवणूक ही आर्थिक नियोजनातील महत्त्वाची बाब आहे. मात्र या संकटकाळामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत. विशेषत: शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार चिंताग्रस्त झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही देखील बाजाराशी निगडित असल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारदेखील साशंक झाले आहेत. कारण या अस्थिरतेच्या वातावरणात आणि शेअर बाजारात मागील काही आठवड्यात मोठी घसरण झाल्यामुळे म्युच्युअल फंडांच्या एनएव्हीमध्येदेखील घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीच्या रकमेत घसरण झालेली दिसते आहे. त्यामुळे आपले मूळ भांडवल तरी सुरक्षित आहे काय? असा प्रश्न त्यांना पडतो आहे. मात्र चढउतार हा बाजाराचा स्थायी भाव आहे. सध्या निर्माण झालेली अस्थिरता आणि बाजारातील घसरण ही काही कायमस्वरुपी राहणार नाही. याआधीदेखील बाजारात अनेक वेळा मोठ्या पडझडी झालेल्या आहेत आणि त्यानंतर बाजाराने चांगला परतावा दिला आहे. मात्र तरीही अस्थिरता आणि घसरण म्हटली की गुंतवणूकदारांची चिंता नक्कीच वाढलेली असते. मग आपल्या गुंतवणूकीचे नेमके काय करावे, भविष्याती नियोजन कसे करावे असे प्रश्न सर्वसामान्यांना पडतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आधीच म्युच्युअल फंडाचे गुंतवणूकदार असलेले आणि नव्याने गुंतवणूकीची सुरूवात करू इच्छिणाऱ्यांनी सद्य परिस्थितीत घाबरून न जाता नेमक्या कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत ते पाहूया.

१. चढ उतार बाजाराचा स्वभाव
म्युच्युअल फंडांची खासियत म्हणजे तुम्ही अप्रत्यक्षपणे बाजाराशी जोडले जातात आणि त्यामुळे तुमच्या गुंतवणूकीची जोखीम बऱ्याचअंशी कमी होते. कारण कोणताही म्युच्युअल फंड (इक्विटी) हा फक्त एकाच कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत नाही. तर आपल्या उद्दिष्टानुसार अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये ही गुंतवणूक म्युच्युअल फंडांनी केलेली असते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचे मूल्य हे त्या फंडाच्या एनएव्हीवर अवलंबून असते. आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला एनएव्हीच्या मूल्यानुसार युनिट्स मिळतात. एनएव्हीचे मूल्य जितके जास्त तितकी मिळणाऱ्या युनिट्सची संख्या कमी आणि एनएव्हीचे मूल्य जितके कमी तितकी मिळणाऱ्या युनिट्सची संख्या जास्त. बाजारातील घसरणीच्या काळात एनएव्हीचे मूल्य कमी झाल्यामुळे तुम्हाला मिळणाऱ्या युनिट्सची संख्या वाढलेली असते. घसरणीत कमी गुंतवणूकीत जास्त युनिट्स मिळत असतात. याचाच अर्थ घसरणीच्या काळात तुम्ही केलेल्या गुंतवणूकीचे मूल्य बाजार जेव्हा तेजीत परतेल तेव्हा चांगलेच वाढलेले असेल. कारण तेव्हा म्युच्युअल फंडांच्या एनएव्हीचे मूल्यदेखील वाढलेले असेल. यालाच रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंग असे म्हणतात. एसआयपीद्वारे गुंतवणूक करणाऱ्यांना याचा जास्त लाभ होतो.

कोरोनोला हरवण्यासाठी लस तयार; अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या लसीची यशस्वी चाचणी

२. आर्थिक उद्दिष्टावर लक्ष केंद्रीत करा
बाजारातील किंवा म्युच्युअल फंडांच्या एनएव्हीच्या चढउताराची चिंता न करता आपल्या आर्थिक उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. आपण आपले आर्थिक उद्दिष्टानुसार (अल्पकालीन आणि दीर्घकालीन) म्युच्युअल फंडांची निवड करायची असते. यासाठीच तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करायचा सल्ला नेहमी दिला जातो. अल्पकालीन उद्दिष्टावर सध्याच्या घसरणीचा परिणाम होऊ शकतो मात्र दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर बाजारातील चढउतारांचा नकारात्मक परिणाम होत नाही. कारण आपण जेव्हा सातत्याने गुंतवणूक करतो तेव्हा बाजारातील चढ आणि उतार दोन्ही काळात आपण गुंतवणूक केलेली असते. त्यामुळे तेजी असताना आपल्याला कमी युनिट्स मिळतात तर मंदी असताना जास्त युनिट्स मिळतात. परिणामी दीर्घकालात सरासरीचा मोठा लाभ मिळत आपल्याला चांगला परतावा मिळतो. त्यामुळे जर गुंतवणूकीतील सातत्य राखण्यात आर्थिक अडचणी नसतील तर घाबरून न जाता नियमितपणे गुंतवणूक करत राहावी. बाजारातील चढउतारापेक्षा आपल्या आर्थिक उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. आपली बहुतांश महत्त्वाची आर्थिक उद्दिष्टे ही दीर्घकालीन गुंतवणूकीशीच निगडित असतात. त्यामुळे दीर्घकाळात येणाऱ्या चढ उतारांनी घाबरून वेळेआधीच गुंतवणूक काढून घेऊ नका आणि जर नव्याने गुंतवणूक सुरू करणार असाल तर घसरलेल्या एनएव्ही मूल्याचा लाभ घेत गुंतवणूक सुरू करा.

३. पोर्टफोलिओची आखणी
ज्यांनी आधीच म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेली आहे. त्यांनी या अस्थिरतेच्या काळात आपल्या गुंतवणूक तज्ज्ञांशी चर्चा करून आपल्या पोर्टफोलिओची आढावा घेणे श्रेयस्कर ठरेल. आपण गुंतवणूक केलेले फंड योग्य दीर्घकालावधीसाठी योग्य आहेत ना, विविध फंड प्रकारातील आपल्या गुंतवणूकीची विभागणी योग्य आहे की नाही, आपले आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी सध्याच्या पोर्टफोलिओत काही बदल करायला हवा का किंवा आपल्या पोर्टफोलिओतील जोखीम आपल्या क्षमतेनुसारच आहे ना, यासारख्या मुद्द्यांची आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी चर्चा करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे भविष्यातील आपले आर्थिक उद्दिष्ट गाठणे अधिक सुलभ होईल. 

नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांनी फक्त जुजबी माहितीच्या आधारावर गुंतवणूकीची सुरूवात न करता, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच पोर्टफोलिओची आखणी करावी. दीर्घकालात आपले आर्थिक उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य पोर्टफोलिओचे महत्त्वा अनन्यसाधारण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Tawade writes article about tips for mutual fund investment