वयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 January 2019

'योनो' ही भारतातील पहिली आणि एकमेव अशी सेवा आहे, ज्याद्वारे लाईफस्टाईल आणि बँकिंग सेवा पुरविली जाते. देशातील तरुणाईमध्ये याची लोकप्रियता वाढत आहे.

मुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या पुरस्कारांची घोषणा केली आहे. दहा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि वय वर्षे 20 पेक्षा कमी असणाऱ्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

'योनो' ही भारतातील पहिली आणि एकमेव अशी सेवा आहे, ज्याद्वारे लाईफस्टाईल आणि बँकिंग सेवा पुरविली जाते. देशातील तरुणाईमध्ये याची लोकप्रियता वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर 'एसबीआय'ने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांसाठी नामांकनाची प्रक्रिया सुरू केली. तरुण वयातील मौजमस्तीच्या पलीकडे जात जग बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 100 तरुण-तरुणींची नावे आधी निश्चित करण्यात आली. 

विविध प्रकारच्या निकषांवरून ही यादी एकूण 60 जणांची झाली. त्यात 30 मुले आणि 30 मुलींचा समावेश होता. हिंदी अभिनेत्री सोहा अली खान, दिया मिर्झा, क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार, शशी श्रीधरन, दिलीप अस्बे, मल्लिका दुआ अशा नामवंत परीक्षकांनी ही निवड केली.

त्यानंतर या परीक्षकांनी प्रत्येक गटासाठी तीन मुले आणि तीन मुली अशी सहा नावे निश्चित केली. अंतिमत: प्रत्येक गटातून एक विजेता निवडला जाणार आहे. हा विजेता जनतेच्या मतदानाद्वारे ठरविला जाणार आहे. मतदानासाठीची व्यवस्था www.yonosbi20under20.com  या संकेतस्थळावर 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे. मतदानाची अंतिम तारीख 27 जानेवारी आहे. 

अभिनेता फैजल खान, झाहिरा वसिम, हिमा दास, पृथ्वी शॉ, स्पर्श शहा यांचा त्या एकूण 60 जणांमध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचाही समावेश आहे. विजेत्यांची घोषणा बंगळूरमध्ये 4 फेब्रुवारी रोजी होणाऱया एका कार्यक्रमात केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting for the youth who is Twenty Years and who wants to win World