अर्थचक्र सुधाराचे संकेत | इंधनाचा खप पूर्ववत होण्याच्या मार्गावर; 2019 च्या तुलनेत वर्षअखेरीस खपात वाढ 

कृष्ण जोशी
Tuesday, 5 January 2021

देशातील इंधनाचा खप 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये वाढला आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा खप किंचित कमी असला, तरीही तो 2019 च्या खपाशी एक-दोन महिन्यांतच मेळ घालण्याच्या बेतात आहे.

मुंबई  ः देशातील इंधनाचा खप 2019 च्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये वाढला आहे. पेट्रोलच्या तुलनेत डिझेलचा खप किंचित कमी असला, तरीही तो 2019 च्या खपाशी एक-दोन महिन्यांतच मेळ घालण्याच्या बेतात आहे. या आकडेवरून देशाचे औद्योगिक आणि अर्थचक्र पूर्वपदावर येत असल्याचे हे चिन्ह असल्याचे बोलले जात आहे. 
आजवर बऱ्याच प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे डिझेलचा खप थोडासा कमी होता; पण याच कारणाने नागरिकांनी त्यांची वाहने बाहेर काढल्यानंतर पेट्रोलच्या खपात वाढ झाली आहे. त्याच वेळी एलपीजी वायूचा खपही वाढला आहे. हवाई इंधनाचा (विमान वापरासाठीचा) खप मात्र अजूनही 43 टक्‍क्‍यांनी कमी आहे. विमान वाहतूक अद्याप सुरळीत झालेली नाही. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

मार्च-एप्रिलपासून लॉकडाऊनमुळे सारे व्यवहार ठप्प होते; मात्र अनलॉकिंगनंतर दैनंदिन व्यवहार पूर्ववत सुरू झाले. त्याचे प्रत्यंतर पेट्रोल-डिझेलच्या खपातून दिसून येत आहे. देशातील पेट्रोलचा खप 2019 च्या डिसेंबर महिन्यात 2,240 टीएमटी (थाऊजंड मेट्रिक टन) होता, तर 2020 च्या डिसेंबरमध्ये तो 2,435 टीएमटी झाला आहे. हा खप आधीच्या वर्षापेक्षा 8.7 टक्‍क्‍यांनी वाढला आहे; तर डिझेलचा डिसेंबर 2020 मधील खप 6,354 टीएमटी होता. त्याआधीच्या वर्षाच्या डिसेंबरचा खप 6,557 टीएमटी होता. याचा अर्थ हा खप अद्यापही आधीच्या वर्षापेक्षा तीन टक्‍क्‍यांनी कमी आहे, तरीही त्याने कोव्हिडपूर्वीचा पल्ला जवळपास गाठला आहे. 
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या देशातील तीन प्रमुख सरकारी इंधन वितरण कंपन्यांकडील आकडेवारीनुसार सध्या देशातील इंधन खपाचे हे चित्र आहे. 2020 च्या सप्टेंबरमध्येच पेट्रोलने आधीच्या वर्षीच्या खपाचा टप्पा गाठला होता. नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलच्या खपात गेल्या नोव्हेंबरपेक्षा 4.8 टक्के वाढ झाली; तर डिझेलचा खप सात टक्के कमी होता. डिझेलचा खप हा देशातील आर्थिक स्थितीचा निदर्शक असतो, देशातील एकूण इंधनखपातील 40 टक्के वाटा डिझेलचा आहे. 

 

इवाई इंधनाचा खप 43 टक्केच 
डिसेंबर 2020 मध्ये एलपीजी वायूच्या खपात आधीच्या वर्षीच्या डिसेंबरपेक्षा 7.6 टक्के वाढ झाली. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा खप अजूनही 43 टक्के कमीच आहे. कारण अद्यापही देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या पूर्वीपेक्षा 50 टक्के एवढीच आहे.

On the way to undoing fuel consumption; Consumption increases at the end of the year compared to 2019

----------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the way to undoing fuel consumption; Consumption increases at the end of the year compared to 2019