यंदा शेअर बाजाराने काय शिकवले?

Share Market
Share Market

यंदा २० जानेवारी २०२० च्या शिखरानंतरच्या पडझडीतून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा भरारी घेत अवघ्या दहा महिन्यांत शेअर बाजारानं पुन्हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चढ-उतार हा शेअर बाजाराचा स्थायीभाव असला, तरी या काळातील अनुभवाची शिदोरी सर्व संबंधितांना नेहमीच उपयोगी पडेल, यात मात्र तिळमात्र शंका नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसं पाहायला गेलं, तर तो दिवस इतर कोणत्याही दिवसासारखाच होता. गुलाबी थंडीचे दिवस होते. गर्दीनं फुललेले रस्ते, पर्यटनस्थळांवरची खच्चून भरलेली हॉटेल्स आणि उत्सुक ग्राहकांनी ओसंडून वाहणारे बाजार, हे नेहमीचं दृश्य वेगळं असण्याचं फारसं काही कारणही नव्हतं... अपवाद होता शेअर बाजाराचा! निफ्टी निर्देशांकाच्या आलेखावर त्या दिवशी नकारात्मक संकेत देणारं एक चिन्ह उमटलं होतं... जपानी कॅंडलस्टिक पद्धतीच्या त्या आलेखावर लाल रंगाची एक मोठी कॅंडल तयार झाली होती... तर तिकडं दूरदेशी चीनमध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं तज्ज्ञांचं एक सदस्य मंडळ पाहणीसाठी वुहान प्रांतात पाठवलं होतं.

पुढं दहाच दिवसांत भारतातल्या पहिल्या कोरोना रुग्णाची अधिकृत नोंद झाली. त्यानंतरच्या घटना सर्वज्ञात आहेतच. आपली सर्वांचीच आयुष्यं त्या घटनांनी ढवळून निघाली. शेअर बाजारातही मोठी पडझड होत राहिली. परंतु, वाईटातून काही अंशी तरी काही चांगलं सापडू शकतं, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला अन् शेअर बाजाराच्या अभ्यासासाठी तिथं रोज ‘उपस्थिती’ लावण्याच्या सवयीमुळं मी त्या घटनांची साक्षीदार होत गेले.

सर्वसामान्यतः शेअर बाजाराकडं जरा नकारात्मक दृष्टीनंच पाहिलं जातं, असा माझा अनुभव आहे. सट्टाबाजार, पैसे गमावण्याचा हमखास मंत्र आदी दूषणंही ऐकायला मिळतात. परंतु, या वेळी मात्र मतपरिवर्तन झालेले बरेच लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेअर बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक असणारं डी-मॅट खातं उघडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याची आकडेवारी समोर येत गेली. उत्तम दर्जाच्या कंपन्यांचे शेअर प्रचंड सवलतीच्या दरात उपलब्ध झाल्यानं अनेकांनी त्या संधीचा फायदा करून घेतला. बाकी बरेच व्यवहार ठप्प झालेले होते. परंतु, शेअर बाजारातले व्यवहार मात्र अव्याहतपणे चालू राहिले.

विविध बिझनेस चॅनल्सनी अथक प्रयत्न करून ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून आपलं प्रसारण पूर्ववत सुरू ठेवलं. पण, सर्वांत मोठा बदल झालेला दिसला तो गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं झालेल्या प्रयत्नांत. अचानक उद्‌भवलेल्या परिस्थितीमुळं गोंधळात पडलेल्या गुंतवणूकदारांना टीव्ही व इंटरनेटच्या माध्यमातून सतत दिलासा देण्याचं काम केलं जात होतं. एरवी सशुल्क प्रशिक्षण देणाऱ्या अनेक तज्ज्ञ मंडळींनी विनामूल्य किंवा पूर्वीच्या तुलनेनं माफक दरात प्रशिक्षण देण्यास आरंभ केला. इच्छुक प्रशिक्षणार्थींना ‘वेबिनार’सारख्या माध्यमातून शेअर बाजारातल्या खाचखळग्यांची, युक्त्या-क्लृप्त्यांची माहिती देण्याचं तसेच त्यांना वेगवेगळ्या पातळ्यांवरून गुंतवणुकीचं मूलमंत्र देण्याचं काम हिरिरीनं चालू झालं. त्यात तज्ज्ञ मंडळींचा भविष्यातला व्यावसायिक हेतू असेलही; परंतु वेळेला मदतीचा हात पुढं करणं फार मोलाचं ठरलं असणार, यात मला शंका वाटत नाही आणि त्यांचे पडसाद सोशल मीडियातून उमटतही होतेच.

आता कुणाच्याही मनात प्रश्र्न उभा राहील, की असं आहे तर प्रत्येकानं हातचं काम सोडून शेअर बाजारात उतरावं का? तसेच, शेअर बाजाराकडं वळलेल्या सर्वांनाच या काळात नफा मिळाला असेल का? 
सहसा तज्ज्ञ मंडळी असाच सल्ला देताना दिसतात, की आपल्याकडची गुंतवणूकयोग्य अतिरिक्त रक्कमच शेअर बाजारात गुंतवावी. गाठीला अनुभव नसेल, तर योग्य मार्गदर्शन घेतल्याशिवाय बाजारात उडी घेऊ नये. तसेच, बाजारात थेट उतरण्याआधी म्युच्युअल फंड, एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) यांसारख्या शेअर बाजाराशी संबंधित पर्यायांद्वारेसुद्धा नफा मिळवण्याचं उद्दिष्ट गाठता येऊ शकतं. एकुणातस शिस्तबद्ध पद्धतीनं अभ्यासपूर्वक गुंतवणूक केल्यास शेअर बाजाराच्या मार्गानंही अर्थार्जन होऊ शकतं, हा मुद्दाच इथं ठळकपणे समोर येतो.

यंदा २० जानेवारी २०२० च्या शिखरानंतरच्या पडझडीतून फिनिक्स पक्ष्यासारखी पुन्हा भरारी घेत अवघ्या दहा महिन्यांत शेअर बाजारानं पुन्हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चढ-उतार हा शेअर बाजाराचा स्थायीभाव असला, तरी या काळातील अनुभवाची शिदोरी सर्व संबंधितांना नेहमीच उपयोगी पडेल, यात मात्र तिळमात्र शंका नाही.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com