जुलैमध्ये महागाई कमी; घाऊक चलनवाढीत घसरण

पीटीआय
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

घाऊक चलनवाढीतील घसरण जुलै महिन्यात कायम राहिली असून, ती 1.08 टक्‍क्‍यांवर आली आहे. घाऊक चलनवाढीची ही मागील 25 महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. 

नवी दिल्ली : घाऊक चलनवाढीतील घसरण जुलै महिन्यात कायम राहिली असून, ती 1.08 टक्‍क्‍यांवर आली आहे. इंधन आणि अन्नपदार्थांच्या कमी झालेल्या किमती याला कारणीभूत ठरल्या आहेत. घाऊक चलनवाढीची ही मागील 25 महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. 

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक चलनवाढ जून महिन्यात 2.02 टक्के होती. ती मागील वर्षी जुलैमध्ये 5.27 टक्के होती. यंदा जुलैमध्ये अन्नपदार्थांची महागाई 6.15 टक्के आहे. मागील वर्षी याच महिन्यात ती 6.98 टक्के होती. याचबरोबर जुलैमध्ये इंधन आणि ऊर्जाक्षेत्रातील महागाईत उणे 3.64 टक्के घसरण झाली आहे. जूनमध्ये ती उणे 2.2 टक्के होती. अर्थतज्ज्ञांनी आधी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा मागील महिन्यातील घाऊक चलनवाढ कमी आहे. दरम्यान, किरकोळ चलनवाढही जुलैमध्ये 3.15 टक्‍क्‍यांवर आली आहे. जून महिन्यात ती 3.18 टक्के होती. 

आगामी काळात वाढीची शक्यता कमी 
आगामी काळात घाऊक चलनवाढीत फारशी वाढ होणार नाही. मात्र, कमकुवत रुपयामुळे खनिज तेलाची आयात महागण्याची शक्‍यता आहे. असे घडल्यास घाऊक चलनवाढीत थोडी वाढ होईल, अशी शक्‍यता अर्थतज्ज्ञांनी वर्तविली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wholesale inflation in July falls to multiyear low