विप्रोच्या अझीम प्रेमजींनी जाता-जाता पुन्हा दिली कोट्यधीश होण्याची संधी! 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

विप्रोच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. 

मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने 10,500 कोटी रुपये मूल्याच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने 10,500 कोटी रुपयांच्या बायबॅकला नुकतीच मंजूरी दिली आहे. बायबॅकची प्रक्रिया 14 ऑगस्टला सुरू होणार असून 28 ऑगस्ट ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. विप्रोच्या बायबॅकच्या बातमीमुळे आज मुंबई शेअर बाजारात शेअरच्या किंमतीमध्ये सकाळच्या सत्रात 4 टक्क्यांपर्यत वाढ झाली. 

सेबीकडून 30 जुलैला विप्रोला बायबॅकसंदर्भातील अंतिम मंजूरी मिळाली आहे. बायबॅकसाठी कंपनीने 21 जून 2019 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली होती. त्यासंदर्भातील पत्र कंपनी संबंधित शेअरधारकांना 6 ऑगस्ट किंवा त्यापूर्वी पाठवणार आहे. 16 एप्रिलला विप्रोच्या संचालक मंडळाने 32.3 कोटी इक्विटी शेअरच्या बायबॅकला मंजूरी दिली आहे. प्रति शेअर 325 रुपयांप्रमाणे हे बायबॅक केले जाणार आहे. प्रवर्तकांनी बायबॅकमध्ये सहभाग घेण्याचे संकेत दिले आहेत. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात जितक्या मूल्याचे बायबॅक होईल त्यावर 20 टक्के कर आकारणी करण्याचे जाहीर केल्यानंतर बायबॅक करणारी विप्रो ही पहिलीच कंपनी आहे. घसरत्या शेअर बाजारात विप्रोने गेल्या काही महिन्यात 2 टक्क्यांचा परतावा दिला आहे. विश्लेषकांना आगामी काळात स्पर्धेमुळे आणि अंमलबजावणीच्या संदर्भातील आव्हानांमुळे विप्रोच्या महसूलात घट होण्याची शक्यता वाटते.

कोट्यधीश होण्याची संधी! 
सध्या मुंबई शेअर बाजारात विप्रोचा शेअर 270 रुपयांवर व्यवहार करतो आहे. शिवाय कंपनीने 325 रुपयांना शेअर 'बायबॅक' करणार असल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच सध्याच्या शेअरच्या बाजारभावापेक्षा कंपनी शेअरधारकांना 55 रुपये जास्त देत आहे. सध्याच्या घसरलेल्या बाजारात कंपनीकडून शेअरधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

अझीम प्रेमीजींनी याआधी देखील १२ हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक केले होते. शिवाय कंपनीकडून नियमित लाभांश देखील दिला जातो आहे. त्यामुळे विप्रोच्या शेअरमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केलेले अनेक गुंतवणूकदार कोट्यधीश झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wipro’s Rs 10,500 crore buyback begins on Aug 14