
लॉकडाउनच्या काळात सर्वांनाच घरी थांबावे लागत होते. मात्र, या काळात शेअर बाजार सुरू होता आणि सुरवातीला मोठ्या प्रमाणात घसरून नंतर तो तेजीकडे वाटचाल करताना दिसला.
पुणे : 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या चार महिन्यांच्या काळात शेअर बाजारात आलेल्या अनपेक्षित तेजीने गुंतवणूकदार हुरळून गेल्याचे दिसत असून, अनेकजण रसातळाला गेलेल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये (पेनी स्टॉक) 'ट्रेडिंग' करून पैसे कमावण्याचा धोका पत्करत आहेत. पहिले लॉकडाउन 24 मार्च रोजी जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) 25,639 अंशांच्या नीचांकापासून पुढच्या अवघ्या चार महिन्यांत 38,129 अंशांपर्यंत उसळी घेतली आहे. दीर्घकाळ चाललेल्या लॉकडाउनमुळे उद्योगधंद्यांच्या बरोबरीने अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होऊनही 'सेन्सेक्स'मध्ये 48.71 टक्क्यांची वाढ झाल्याचे आश्चर्यकारक आणि अनाकलनीय चित्र दिसत आहे.
‘कर्ज काढून सरकारला किती दिवस पैसे पुरवणार?’
'सेन्सेक्स'मध्ये किमान मोठ्या म्हणजे लॉर्ज कॅपमधील कंपन्या असतात. त्यामुळे तुलनेने तेथे जोखीम कमी असते. मात्र, दुसरीकडे अत्यंत बिकट परिस्थितीत असलेल्या; किंबहुना दिवाळखोरीकडे निघालेल्या कंपन्यांच्या शेअरमध्येही (पेनी स्टॉक) तेजी दिसू लागल्याने गुंतवणूकदार नफेखोरीसाठी तिकडे आकृष्ट होताना दिसत आहेत. अल्पकाळात आकर्षक आणि फायदेशीर वाटणाऱ्या या 'पेनी स्टॉक'मध्ये पैसे गुंतविणे धोकादायक ठरू शकते, याची अनेकांना कल्पना नाही.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
घरबसल्या पैशांचा मोह
लॉकडाउनच्या काळात सर्वांनाच घरी थांबावे लागत होते. मात्र, या काळात शेअर बाजार सुरू होता आणि सुरवातीला मोठ्या प्रमाणात घसरून नंतर तो तेजीकडे वाटचाल करताना दिसला. या परिस्थितीत घरबसल्या सहजपणे पैसे कमावण्याचा मोह काहींना आवरता आला नाही. अत्यंत कमी भावात (10 रुपयांच्या दर्शनी मूल्यापेक्षाही स्वस्त) मिळणाऱ्या छोट्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक करून अल्पावधीत वाढ झाल्यावर त्यांची विक्री करून पैसे कमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे अशा सुमारे 800 कंपन्यांच्या शेअरच्या निर्देशांकाने यावर्षी 'सेन्सेक्स'पेक्षाही 33 टक्क्यांनी अधिक परतावा दिल्याने अनेकांचे डोळे दिपले आहेत. त्यामुळेच लॉकडाउनच्या काळात अनाकलनीय आणि अभूतपूर्व वेगावे नवी 'ट्रेडिंग' खाती उघडली गेली आहेत. मार्चपासून आतापर्यंत 26 लाखांहून अधिक खाती सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि.कडे (सीडीएसएल) उघडली गेली असल्याचे समजते. त्यापैकी फक्त जून महिन्यात 8,30,405 इतकी विक्रमी खाती उघडली गेली आहेत.
'पेनी स्टॉक्स'ची हवा
सुमारे 800 कंपन्यांपेकी 20 टक्के कंपन्या शून्य रुपये महसूल असणाऱ्या आहेत. पण त्यापैकी काहींचे भाव दुपटीहून अधिक वाढले आहेत, तर काहींचे बाजारमूल्य तब्बल कोट्यवधी रुपयांमध्ये गेले आहे. सिद्ध व्हेंचर्स लि. या अशाच एका कंपनीचा शेअर एक एप्रिलपासून 80 टक्क्यांहून अधिक वाढूनही आता 3.36 रुपयांवर पोचला आहे. त्याचप्रमाणे जैन स्टुडिओज लि. चा शेअर याच काळात 400 टक्क्यांहून अधिकने वाढून आता 5.05 रुपयांवर पोचला आहे. नगण्य शेअरमूल्य असणाऱ्या जयप्रकाश असोसिएट्स, सुझलॉन एनर्जी, जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांचे शेअरभावही एप्रिलपासून दुपटीहून वाढले आहेत. पण ही गोष्ट फारकाळ टिकणारी नसते. एकदा का शेअरविक्रीचा मारा सुरू झाला, की असे कवडीमोल शेअर घ्यायला कोणीही पुढे येत नसते हे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यायला हवे, असे या क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सावध राहण्याची गरज
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती अजूनही कायम आहे. यामुळे आपल्या देशात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता स्पेनपेक्षाही अधिक झाली आहे. अर्थव्यवस्थेची परिस्थितीही चिंताजनक आहे. चालू आर्थिक वर्ष सर्वच क्षेत्रांना खराब जाणार आहे. याकडे काही गुंतवणूकदार दुर्लक्ष करून शेअर बाजारात 'डे ट्रेडिंग' करून 'इझी मनी'च्या मागे लागले आहेत. त्यांनी याबाबतीत सावध राहण्याची गरज आहे, असे जाणकार गुंतवणूकतज्ज्ञांनी सांगितले.