ग्लोरियाचं पत्र...; सप्रेम नमस्कार! 

​डॉ. ग्लोरिया कोंडविलकर-खामकर
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

मातीपासून लांब परदेशात राहताना या छोट्या छोट्या गोष्टींविषयी या लेखातून विशेष प्रेम व्यक्त केलंय डॉ. ग्लोरिया कोंडविलकर-खामकर यांनी.

आज मी मेथीची भाजी केलीय. खरं तर तुम्ही म्हणाल, यात काय विशेष! पण हो, विशेष आहे. आपल्या मातीपासून लांब परदेशात राहताना या छोट्या छोट्या गोष्टींविषयी विशेष प्रेम वाटतं. आपण आपल्या मातीशी जोडलेले आहोत असं वाटतं.

2008 मध्ये मी भारतातून इंग्लंडमध्ये आले. देश नवीन, भाषा इंग्रजी असली तरी 'अँक्सेन्ट'मुळे नवीनच वाटायची. इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्या बॉर्डरजवळ असलेल्या संडरलँड या गावात मी उच्च शिक्षणासाठी आले. याला मी सुंदरलँड म्हणायची. प्रामुख्याने इंग्रज समुदाय. आशियाई वस्ती फार कमी. आणि होते ते मुख्यतः बांगलादेशी. त्यामुळे इथे मराठी खाद्यपदार्थ दुर्मिळच. मेथीची भाजीपण. मोजक्याच बांगलादेशी दुकानात भारतीय माल एकतर जुना तरी असायचा किंवा अजिबात नसायचा. संडरलँड युनिव्हर्सिटीत शिकत असताना जवळ जवळ वर्षभर इंग्रजी पद्धतीच्या खाण्याची सवय लावून घेतली. पण नंतर जेव्हा कुटुंबासोबत नोकरीनिमित्त लंडनपासून 70 मैलावर असलेल्या साऊथहॅम्पटन या शहरात आले, तेव्हा भारतीय आणि मराठीपणाची उणीव भासणं बंद झालं. इथे दुसऱ्या महायुद्धानंतर आणि मुख्यतः 1960 च्या दशकापासून आशियाई देशांतून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालंय. पंजाबी आणि गुजराती समुदाय मोठ्या प्रमाणावर या शहरात स्थायिक झालाय. छोटासा का होईना मराठी समुदायही आहे. त्यामुळेच इथे सगळं मिळतं - भारतीय, मराठी कपड्यांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सगळं. मेथीची भाजी पण.

कालच बीबीसीवर एक डॉक्युमेंटरी पहिली. दोन्ही महायुद्धांदरम्यान भारतातून ब्रिटनमध्ये झालेल्या स्थलांतराविषयी. त्यामध्ये एक मुद्दा स्पष्ट जाणवला की 1930-40 च्या दशकांमध्ये इंग्लंडमधील भारतीय समुदाय अतिशय लहान असल्यामुळे त्यावेळी इथे स्थलांतरित झालेल्या भारतीयांना ब्रिटिश जीवनशैली अंगिकारण्यावाचून पर्याय नव्हता. गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती कमालीची बदललीय. भारतातल्या दूरचित्रवाहिन्यांपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत आता सगळं अगदी सहज उपलब्ध आहे. म्हणूनच ब्रिटन हा परदेश असूनही मला फारसा परका वाटत नाही.

मला वाटतं की जेव्हा आपण लहानाचे मोठे होत असतो, त्यावेळी आपल्या सभोवतालच्या वेगवेगळ्या गोष्टींमधून - मग त्या भौतिक गोष्टी असतील अथवा जगण्याचे रीतिरिवाज - यांच्यामधून आपली ओळख तयार होत जाते. त्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनतात. परदेशात राहताना त्या गोष्टी आपल्या आयुष्यात कायम ठेवता आल्या, तर परिपूर्णता असल्यासारखी वाटते. मात्र त्या गोष्टी काही कारणाने उपलब्ध नसतील तर मात्र जाणवतं ते अपूर्णत्व. आणि म्हणूनच मेथीच्या भाजीचं महत्त्व मला जितकं कोकणात वाढताना वाटलं नव्हतं, तेव्हढं किंबहुना त्याहून कितीतरी जास्त मला आता वाटतं. कारण ती माझ्या मराठी असण्याचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्हाला काय वाटतं?

इतर ब्लॉग्स