समाजसेवा अन्‌ प्रसिध्दी...! 

राजेश अग्निहोत्री,नाशिक
गुरुवार, 10 जानेवारी 2019

परवाच फेसबुकवर कुणीतरी शेअर केलेला विचार वाचला आणि त्या विचारावर सखोल विचार केला पाहिजे असं अगदी मनापासून वाटलं. त्यावर आलेले कॉमेंटस्‌ही वाचण्यात आले. जवळपास सर्वांनीच या विचाराबद्दल सहमती दर्शवली होती. मला सुध्दा त्यावर कॉमेंटमधून व्यक्त होण्याची तीव्र इच्छा होती.पण नाण्याच्या दोन्ही बाजू मांडण्यासाठी छोटासा कॉमेंट पुरेसा नाही,तर विस्तृत लेखन करणे गरजेचे आहे,असं वाटलं म्हणूनच हा लेखन प्रपंच.... 

परवाच फेसबुकवर कुणीतरी शेअर केलेला विचार वाचला आणि त्या विचारावर सखोल विचार केला पाहिजे असं अगदी मनापासून वाटलं. त्यावर आलेले कॉमेंटस्‌ही वाचण्यात आले. जवळपास सर्वांनीच या विचाराबद्दल सहमती दर्शवली होती. मला सुध्दा त्यावर कॉमेंटमधून व्यक्त होण्याची तीव्र इच्छा होती.पण नाण्याच्या दोन्ही बाजू मांडण्यासाठी छोटासा कॉमेंट पुरेसा नाही,तर विस्तृत लेखन करणे गरजेचे आहे,असं वाटलं म्हणूनच हा लेखन प्रपंच.... 

     मित्रहो तो शेअर केला गेलेला विचार होता..."सामाजिक कार्यासाठी जाताय? जरूर जा! पण कॅमेरे मात्र घरीच ठेवा!' असो,आला असेल ना यातला आशय तुमच्या लक्षात? थोडक्‍यात आपण करत असलेल्या सामाजिक कार्याची,समाजसेवेची प्रसिध्दी करू नका. समाजसेवा जरूर करा,पण त्या कामाचा प्रचार करू नका वगैरे. खरं आहे. असं म्हणतातच की एका हाताने दिलेलं दुसऱ्या हातालाही कळता कामा नये. हा निश्‍चितच आदर्शवाद मानला जाईल. परंतु....परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूचाही वचार केला पाहिजे ना? जे प्रसिध्दीसाठीच भुकेले आहेत किंवा समाजकार्य केवळ दर्शविण्यासाठी अथवा स्टेटस्‌ प्राप्त करण्यसाठीच करत असतात. त्यांच्यासाठी वरील विचार पुरेपुर लागू पडतो.पण प्रश्‍न असा आहे की समाजकार्य करणारे सर्वचजण या प्रकारात मोडतात का? प्रत्येकजण मी कसं महान कार्य करतो याची जाहीरात करायला आसुसलेला असतो का? तर याचं उत्तर आहे "मुळीच नाही' समाजसेवेची अथवा एखाद्या सामाजिक कार्याची कुणी सचित्र प्रसिध्दी देत असेल तर त्याचं स्वागतचं झालं पाहिजे. सोशल मिडीयाच्या विकासामुळे या गोष्टी आजकाल सहज सुलभ झाल्या आहेत आणि अनेकजण आपापल्या सामाजिक कार्याची माहिती छायाचित्रांसह सोशल मिडीयावर प्रसिध्द करत असतात. 

मित्रहो,कुणी असं काही शेअर केलं आणि लगेच आपल्या मनात असा विचार आला की हा फक्त चमकण्यासाठी खटाटोप चालु आहे,तर हा पूर्वग्रह म्हणायचा. कारण एक बाजू आपण पूर्ण दुर्लक्षित करत असतो की ते वृत्त पाहून किती जणांना प्रेरणा मिळत असते. आपणही असं काहीतरी करावं. याबद्दल अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन मिळत असते. समाजकार्याच्या नवीन नवीन कल्पनादेखील किती जणांना सूचतात. मग समविचारी मित्रमंडळींचा ग्रुपही तयार होतो आणि एखाद्या छान समाजकार्याची अमंलबजावणी होते देखील. कित्येक जणांना समाजासाठी काहीतरी करावे असे वाटतं असते,पण कार्य नेमकं काय करावं आणि कुणासोबत करावं याबद्दल त्यांना काही कल्पना नसते. पण आपण जे काही छोटंमोठं सामाजिक कार्य पार पाडत असू ते इतरांना माहित झालं तर निश्‍चितच त्या कार्याचा गुणाकार होत शेवटी हित समाजाचेच साधले जाते हेही खरेच. 
समाजाबद्दल व विशेषतः वंचित समाजाबद्दल कळकळ असणे हे खरोखरीच निरोगी मनाचे लक्षण आहे. पण कुणी एखादं छान समाजकार्य करत असेल त्यास केवळ प्रसिध्दी दिली गेली म्हणून हिणवलं गेलं तर ती व्यक्ती नाउमेद होऊन काम थांबविण्याची शक्‍यता असते. थोडक्‍यात हे म्हणजे आपणंही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही असंच झालं. म्हणूनच काही कार्य पाहण्यात अलं तर प्रेरणा जरूर घ्यावी,आपल्या क्षमतेनुसार सामाजिक कार्याचा अवलंब करावा. विशेषतः दुर्गम खेडी अथवा अनाथाश्रम,वृध्दाश्रम आदी ठिकाणी कार्य पार पाडून आल्यानंतर खारीचा वाटा,उचलला गेला असेल तरी मनाला खूप समाधान वाटते. आपण किती सुखात आहोत, याची प्रचिती येते आणि जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याची नकळतपणे सवयही लागते, मग इतक्‍या साऱ्या हिताच्या गोष्टी घडणार असतील तर मित्रहो,सामाजिक कार्य करतांना कॅमेरेही अवश्‍य सोबत घेऊन जा. आम्हालाही पहायचं तुमचं नेक कार्य आणि त्यातून अनेकांना नक्कीच मिळेल प्रेरणा...! 
post.rajeshagni@gmail.com 

इतर ब्लॉग्स