भरपूर काम केल्याशिवाय.....! 

राजेश अग्निहोत्री
शनिवार, 19 जानेवारी 2019

    परवा एका ऑफिसमध्ये काही कामानिमित्त जाण्याचा योग आला आणि त्या ऑफिसच्या भिंतीवर लावलेल्या सुविचाराने माझे लक्ष वेधून घेतले. तो सुविचार वर पाहता सर्वसाधारण वाटला तरी मला मात्र तो खूपचं आशयपूर्ण वाटला. अगदी मनापासून... 

    परवा एका ऑफिसमध्ये काही कामानिमित्त जाण्याचा योग आला आणि त्या ऑफिसच्या भिंतीवर लावलेल्या सुविचाराने माझे लक्ष वेधून घेतले. तो सुविचार वर पाहता सर्वसाधारण वाटला तरी मला मात्र तो खूपचं आशयपूर्ण वाटला. अगदी मनापासून... 

      मित्रहो,तो सुविचार होता.."भरपूर काम केल्याशिवाय फावल्या वेळाचा आनंद लुटता येत नाही'. खरचं! फावला वेळ कुणाला नको असतो? थोडा जरी फावला वेळ मिळाला तरी त्याचा पुरेपुर आनंद लुटता येतो. ज्यांना कुणाला हा फावला वेळ लाभत नाही. ते देखील याबाबत खंत व्यक्त करतांना आपल्याला दिसतात. परंतु....परंतु वस्तुस्थिती अशी असते की आपल्या वाटेला आलेलं भरपूर काम पार पाडल्याशिवाय या फावल्या वेळेचा आनंद घेता येत नसतो. मग ते काम गृहीणींचं असो, कर्मचारी वर्गाचं असो अथवा व्यावसायिकांचं. 

जरा विचार करून पहा की,भरपूर फावला वेळ प्राप्त करण्यासाठी जर कुणी काम करायचंच सोडून दिलं अथवा कामचुकारपणा सुरु केला तर पदरी पडलेल्या फावल्या वेळेचा त्याला आनंद घेता येईल का? तर उत्तर आहे- मुळीच नाही! कारण निष्क्रीय रहाणे,म्हणजेच कार्यमुक्त रहाणे ही बाब आपल्याला फक्त वेळ मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देत असते. त्याचा आपण आनंद लुटू शकतो का याचा ज्याचा त्याने विचार करावा आणि उत्तर शोधावे. उलट टाळलेल्या कामाबाबत नकळतपणे कित्येकांच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न होत असेल. मग आपण तर आनंद लुटण्याची चर्चा करत आहोत. अपराधीपणानं मन आनंद लुटू शकतं का?  याउलट आपल्या वाटेचे काम पूर्णत्वास नेऊन जेव्हा आपण फावला वेळ अनुभवत असतो. तेव्हा मन प्रसन्न असते व काम पूर्ण पार पाडल्याचे समाधान देखील आपल्याठायी असते. जेव्हा मन प्रसन्न आहे, समाधानी आहे तेव्हाच तर आनंद मुक्तपणे लुटता येत असतो. नाही का, म्हणूनच आयुष्यात अथवा आपल्या क्षेत्रात करिअरमध्ये यशस्वी झालेले लोक आपल्याला सतत कार्यमग्न असलेले दिसतात व आयुष्याचा आनंदही लुटतांना दिसतात. अगदी निवृत्त झालेली बहुतांशी मंडळीही कुठल्या ना कुठल्या कार्यात किंवा सामाजिक कार्यात अडकवून घेतांना दिसतात. कारण वेळ जेव्हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो तेव्हा तो सत्कारणी लागला पाहिजे अशीच वृत्ती त्यांनी आयुष्यभर जोपासलेली असते. यापैकीच काही मंडळी आयुष्यभराच्या कार्मिक अनुभवावर अर्थाजन सुध्दा करतांना दिसतात. जे कौतुकास्पद आहे व प्रेरणा घेण्यासारखे आहे. "हात पाय जोपर्यत चालताहेत तोपर्यत जमेल तेवढं काम करावं' असंही जेष्ठ नागरीक मंडळी सदैव बोलत असतांना आपल्याला दिसतात. 

     थोडक्‍यात वेळ हा मौल्यवान असतोच. तो रोज सकाळी प्रत्येकाच्या खात्यावर सारख्याच प्रमाणात जमा होत असतो. पण कार्यप्रिय मंडळी त्याचा सदुपयोग करत आपलं आणि सोबतीस असणाऱ्याचं कल्याण साधतात.पण उपलब्ध वेळेचा जे कोणी आवश्‍यक तसा उपयोग करून घेत नाहीत त्यांच्यासाठी हाच वेळ मूल्यहीन ठरतो. झोकून देत काम करणारे लोक फावल्या वेळेचा मनमुराद आनंद लुटतात. त्यात आपले छंद जोपासतात. आप्तस्वकीयांशी वार्ता करतात,समाजकार्य करतात, मनोरंजन करून घेतात, मैदानी खेळांसाठीही वेळ देतात वगैरे वगैरे. हा फावला वेळ व त्याचा सदुपयोग त्यांना पुढील आयुष्यासाठी सर्वार्थाने "रिचार्ज' करत असतो. "या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' या पाडगांवकरांच्या ओळी हे लोक प्रत्यक्ष जगत असल्याचे दिसून येते. हे भरपूर काम पणकरतात व फावल्या वेळाचां आनंद लुटत जीवनावर प्रेम पण करतात. 
      भगवत्‌गीतेमध्ये कर्मयोग विस्तृतपणे सांगितला आहे,पण त्यातला महत्वाचा अंश या सुविचारामध्ये निश्‍चितच दडला आहे- भरपूर काम केल्याशिवाय फावल्या वेळाचा आनंद लुटता येत नाही...! 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या