Loksabha 2019 : मोदीजी, जवानांवरून राजकारण कितपत योग्य?

Narendra Modi
Narendra Modi

लातूर येथील औसा येथे आज महायुतीची जाहीर प्रचार सभा झाली. लातूर आणि उस्मानाबदच्या उमेदवारांसाठी ही प्रचार घेण्यात आली. दरम्यान, भाजपा-शिवसेनेच्या युतीनंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी एकाच मंचावर एकत्र आले. या सभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करताना सांगितले तुमचे पहिले मत पुलवामा येथे शहीद जवानांना समर्पित करण्यासाठी भाजपाला मतदान करा. मोदींनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी मातेच्या पावन भूमीतून मी आपल्यापुढे ही गोष्ट मांडत असल्याचे म्हटले. आपण नेहमी पाहतो किंवा आपली ती संस्कृती आहे, की आपण आपली पहिली कमाई आपल्या आईजवळ ठेवतो. तसेच आपली पहिली कमाई देवापुढे किंवा आपल्या बहिणीकडे सुपूर्द करतो. त्यामुळे जीवनातील आपलं पहिलं ऐतिहासिक मत आपण पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का? तुमचं पहिलं मतदान पुलवामामध्ये जे वीर हुतात्मा झाले, त्या हुतात्म्यांना तुमचं पहिलं मतदान समर्पित होईल का? गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचं मत समर्पित होईल का? असे म्हणत चक्क सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत. आपलं मतदान हे देशासाठी असेल, असेही मोदी म्हणाले. 

दरम्यान, यंदा 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी या मतदारांना आवाहन करत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमधील जवानांच्या नावाने मतदान मागितले आहे. हे ऐकत असताना एक सजग नागरिक म्हणून धक्काच बसला. आतापर्यंत नरेंद्र मोदी विरोधकांना म्हणत आले होते कि जवानांच्या नावाने राजकारण करू नका. परंतु स्वतः मात्र वीरपुत्रांच्या नावाने देशभर राजकारण करत मतांचा जोगवा मागायचा. चौकाचौकात देशभक्तीचे उपदेशाचे डोस पाजणारे भक्तांची मात्र मोदींनी पंचायत केली. तरीही ते लंगड समर्थन करणारच. मोदीं जवानांवरून राजकारण करतात हे काही नवीन नाही. उदाहरण द्यायचे झाले तर पंतप्रधान मोदी प्रत्येक प्रचार सभेत सैन्याचा पराक्रम आणि आम्ही सैन्याला दिलेले अधिकार याविषयी सांगत असतात. परंतु काश्मीरमध्ये मोदींनी दिलेल्या भाषणांची क्लिप सर्वांनी पहावी. त्यात, आपणच काश्मिरीमधील दगड फेकीनंतर सैनिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे मोदी काश्मीरमधील सभेत सांगताना दिसत आहेत.

मोदीने आवाहन केल्याप्रमाणे नवमतदारांनी त्यांना मतदान का करावे. 2014 मध्ये हे भाजपने अच्छे दिनाच्या नावाखाली जी महत्वाच्या मुद्यावर वायदे केले. त्यात ते पूर्णपणे ते अपयशी ठरले. त्यातील 4सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारी. दरवर्षाला आम्ही एक कोटी रोजगार निर्माण करू व बेरोजगारी नष्ट करू. सध्या देशात बेरोजगारांची अवस्था अतिशय भीषण आहे.  भारतातील बेरोजगारीचा दर फेब्रुवारी, 2019 मध्ये वाढून 7.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबर, 2016 नंतरचा हा उच्चांक ठरला आहे. फेब्रुवारी, 2018 मध्ये बेरोजगारीचा दर 5.9 टक्के होता. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सीएमआयईचे प्रमुख महेश व्यास यांनी सांगितले की, वास्तविक देशातील रोजगार मागणाऱ्यांची संख्या घटली आहे. तरीही श्रम शक्ती सहभाग दर (लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट) घटल्यामुळे बेरोजगारीचा दर वाढला आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये रोजगारप्राप्त व्यक्तींची संख्या सुमारे 400 दशलक्ष होती. आदल्या वर्षी हा आकडा 406 दशलक्ष होता. सीएमआयईने भारतात हजारो घरांत प्रत्यक्ष केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा अहवाल जारी केला आहे. सीएमआयईची आकडेवारी सरकारच्या आकडेवारीपेक्षा अधिक विश्वासार्ह असल्याचे अनेक अर्थतज्ज्ञ मानतात. नोटाबंदीचा रोजगार आणि छोट्या व्यवसायांवर काय परिणाम झाला, याची कोणतीही आकडेवारी आपल्याकडे नसल्याचे सरकारने काही महिन्यांपूर्वी संसदेत सांगितले होते.

जर आपण ग्रामीण भागात गेलो तर आपल्या विदारक चित्र पहायला मिळेल. गावांगावातील तरुणांची नोकरी नसल्यामुळे लग्न जमत नाही. नोकरी नाही त्यात काही ठिकाणी दुष्काळ आहे त्यामुळे हाताला काम नाही. ज्या ठिकाणी मोदींनी हे आवाहन केले त्या मराठवाड्यातून रोज हजारो तरुण कामाच्या शोधात वेगवेगळ्या शहरात दाखल होत आहेत. मुळातच रोजगाराची निर्मिती आवश्यक तेवढ्या प्रमाणात होत नसल्यामुळे शहरात येऊनही तरुणांचा भ्रमनिरास होतो. अशावेळी जीवनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर नव्या मतदारांनी मोदींना मतदान का करावे? हा प्रश्न नवीन मतदार नक्की विचारेल या बद्दल शंका नाही. देशभक्ती व शहीद जवान या सारख्या भावनिक मुद्यावरून मत मागण्याचा मोह पंतप्रधानांनी टाळायला हवा होता. भाजपच्या संकल्पपत्रात जर तरुणांसाठी कोणतेही धोरण नसेल तर नवीन मतदारांनी तुमच्यापाठीशी उभे राहावे ही अपेक्षा करणे मुळात चुकीचे आहे. 

सध्या मोदींनीही विकास सोडून दिलेला आहे असे वाटते. प्रत्येक प्रचार सभेत ते फक्त देशभक्ती आणि पाकिस्तान या विषयांवर बोलत असतात परंतु २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले हे सांगत नाही. सांगायसारखे काही घडलेही नाही म्हणा. सत्तेसाठीची अगतिकता माणसाला कशाप्रकारे बोलायला लावते हे आज लातूरच्या सभेत याचा अनुभव आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com