कारणराजकारण: कोथरूडचा बालेकिल्ला भाजप राखणार का?

गायत्री तांदळे
Sunday, 21 April 2019

- शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशी कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख
- यंदा या बालेकिल्ल्यातून धक्का बसण्याची चिन्हे
- नागरिकांनी भाजपवर असलेली नाराजी केली व्यक्त

शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला अशी कोथरूड विधानसभा मतदार संघाची ओळख आहे. परंतु यंदा या बालेकिल्ल्यातून धक्का बसण्याची चिन्ह दिसत आहेत. कारणराजकारणच्या माध्यमातून पुणे लोकसभा मतदार संघातील कोथरूड विधानसभा मतदार संघामधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी येथील नागरिकांनी भाजपवर असलेली नाराजी व्यक्त केली.

गेल्या निवडणुकीत भाजप सरकारवर विश्वास ठेवून स्थानिक पातळीवरील उमेदवारांपासून ते केंद्रातील उमेदवारांना 'अच्छे दिन' यावे. यासाठी आम्ही केवळ चिन्ह बघून मतदान केले, असे नागरिक सांगतात. परंतु गेल्या 05 वर्षात या मतदारसंघातील वस्ती व सोसायट्यांमध्येही स्थानिक पदाधिकारी फिरकलेच नाहीत. वांरवार तक्रार करून देखील येथील मूलभूत समस्यांची दखल घेतली नाही. 
या भागात काही ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी व महायुतीचे उमेदवार गिरीश बापट किंवा त्यांचे इतर पदाधिकारी फिरकलेच नाही, असेही नागरिकांनी सांगितले. काही नागरिकांना उमेदवार कोण आहेत हेच नेमकं माहित नाही. 

पुणे स्मार्ट सिटी होणार, असे स्वप्न दाखविणाऱ्या सरकारने आधी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.  याची जाणीव या भागातील नागरिकांशी संवाद साधताना झाली. हातावरच पोट असणाऱ्या वस्त्यांमधील नागरिकांना तुंबलेल्या ड्रेनेजचे घरात शिरणारे पाणी त्यातून निघणारे किडे, दुर्गंधी, कचरा, असुरक्षितता याचा सामना करत जीवन जगावं लागत आहे. सुशिक्षित मुलं बेरोजगार आहेत. सरकारच्या योजना टीव्हीवर पाहून अन् पेपरमध्ये वाचून आम्हांला माहित आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणत्याही योजनेचा लाभ आम्हाला मिळाला नाही. सरकार कोणतही येऊ दे त्यांनी फक्त आमच्या समस्या सोडवाव्यात असं येथील नागरिक म्हणतात.  

सोसायट्यांमधील एक गठ्ठा मतदान या भागातून भाजपला मिळते. परंतु काही सोसायट्या वगळल्या तर उर्वरित सोसाट्यांमधूनही स्थानिक पातळीवर आमच्या येथे विकासकामे झालीच नाहीत, अशी तक्रार आहे. म्हणूनच मतदार राजा सत्ताधाऱ्यांवर असलेली नाराजी मतदानपेटीतून व्यक्त करणार की पुन्हा भाजपला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

इतर ब्लॉग्स