कारणराजकारण : उच्चभ्रू असो वा गरीब; वाढता वाढता वाढे समस्यांचे पाढे!

कारणराजकारण : उच्चभ्रू असो वा गरीब; वाढता वाढता वाढे समस्यांचे पाढे!

'अहो आमचा भाग फक्त बाहेरून झक्कास दिसतो, आतमधल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती वेगळीच आहे...', 'स्मार्ट सिटीच्या नावाखाली आमच्या परिसारची वाट लाऊन टाकलीय हो...', 'गेली काही वर्ष आम्हाला पाणीच नाही, बोअरवेल आणि टँकर मागवून आम्ही आमची पाण्याची 'मूलभूत' गरज भागवतोय...', 'सिमेंटचे रस्ते तयार करून त्यावर पेव्हर ब्लॉक टाकणारे हे हुशार कुठून आलेत तेच काळत नाही...'

वरचे हे सगळे संवाद आहेत ते पुण्यातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या औंध भागातील काही आलिशान सोसायटीत राहणाऱ्या रहिवाशांचे... 'कारणराजकारण' या मालिकेच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे लोकसभा मतदारसंघातील शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात फिरताना अशा काही गोष्टी ऐकायला मिळाल्या ज्यांचा विचार आपण कधीच करत नाही. 

हाय क्लास अशा सेनापती बापट रस्त्याच्या आतल्या बाजूला काहीशे मीटर अंतरावर असलेली जनवाडी... सकाळची वेळ होती, सगळे आपापल्या कामाला निघाले होते. त्यापैकी काहींना एकत्र केलं आणि त्यांच्या भागातील समस्येवर बोलायला सांगितलं. त्या लोकांच्या मनातही हा विचार आला असेल की हे 'मीडिया'वाले एक दिवस आपल्याला येऊन विचारतात, पण पुढे काय होतं त्याचं? तरी काही लोकं पुढे येऊन बोलली. त्यातले काही पहिल्यांदा मतदान करणारे होते. त्यापैकी एक जण म्हणाला, आम्हाला कोण निवडून येतो, कोण हरतो, कोणाचं सरकार येतं, कोणाचं पडतं याच्याशी काही देणंघेणं नाही हो... फक्त आमच्या हाताला नोकरी द्या. नंतर बघितलं तर हा शिकलेला मुलगा एका सरबताच्या गाडीवर मदत करत होता!

जनवाडी हा तसा गरीब वस्ती असलेला भाग. सध्या इथली तिसरी पिढीही विकासासाठी संघर्षच करतीये. महिलांनी पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे हे सांगितलं तर पुरुषांनी गॅसची सबसिडी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचत नाही याबाबत भावना व्यक्त केल्या. तरुण मंडळी तर कुठले सरकार आपल्याला नोकरी देईल याकडे आशेने डोळे लावून बसले आहेत. तरी बरं हा भाग सध्याच्या पुण्याच्या विद्यमान खासदारांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर आहे!

समस्या आणि अडचणी काही फक्त गरिबांसमोरच नाही बरं का... श्रीमंत आणि उच्चभ्रू लोकही सध्या 'पाण्याच्या' प्रश्नाने हैराण आहेत. बाहेरुन सुंदर, आकर्षक दिसणाऱ्या अपार्टमेंट्समध्ये गेली काही वर्ष पाणीच नाही! हे चित्र होतं औंधमधल्या सोसायट्यांमधलं! या भागात मॉल, मल्टिप्लेस जोरात दिसतील. स्मार्ट सिटीअंतर्गत कामही सुरु असलेली दिसतील, पण इथल्या नागरिकांची 'स्मार्ट' होण्याआधी मूळ गरजा भागवणं किती गरजेचं आहे हे त्यांच्याशी बोलल्यावर कळतं. नदीत वाढलेली जलपर्णी आणि त्यामुळे पसरलेलं डासांचं साम्राज्य, पथारी व्यावसायिकांची पदपथावर वाढणारी मक्तेदारी, सिमेंटच्या रस्त्यावर विनाकारण बसवलेल्या आणि उचकटून वर पेव्हर ब्लॉकमुळे गाडीवरून पडण्याच्या भीतीने इथले नागरिक त्रस्त आहेत.

पुण्यात मेट्रो, स्मार्ट सिटीअंतर्गत कामं होतंच राहतील, त्यांना कोणाचीच ना नाही. विकासासाठी सगळेच पुढे येत आहेत. पण दोन्ही वर्गात (गरीब आणि उच्चभ्रू) फिरल्यावर त्यांचं एकच म्हणणं आहे की, आमच्या भागातल्या नगरसेवकांनी आणि आमदार-खासदारांनी एकत्र येऊन आमच्या अडचणी सोडवाव्यात मग सरकार कोणाचही असो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com