मुलींनो, लग्न करताय.. व्हर्जिन असणं गरजेचंच आहे?

योगेश कानगुडे
मंगळवार, 14 मे 2019

खरं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. मात्र ठराविक वयानंतर सेक्ससुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, असं आपल्यला कधीच सांगितलं जात नाही. आपल्या मनावर लहानपणापसून सेक्स ही गोष्ट कशी वाईट आहे हेच बिंबवलं जातं. त्यामुळे मोठं होऊनसुद्धा सेक्सबद्दल बोलणं टाळलं जातं. नंतर उत्सुकतेपोटी कुठून तरी अर्धवट माहिती, अर्धवट ज्ञान मिळवलं जातं. पण त्या अर्धवट ज्ञानाचे गैरफायदे सुरूवातीला कधीच लक्षात येत नाही.

आज सकाळी ऑफिसमध्ये काम करत असताना एका वृत्त वाहिनीवर एक विशेष वृत्तांत सुरु होता. लग्नानंतर पहिल्या रात्री 'व्हर्जिनिटी' सिद्ध करण्यासाठी तरुणी कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेत असल्याचं धक्कादायक वास्तव तो वृत्तांत सांगत होता. हे ऐकून समाजातील अनेक संवेदनशील लोकांना प्रचंड अस्वस्थ वाटलं असेल. सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन आहे. अशावेळी या विषयाचे गांभीर्य अनेक पटीने वाढते. 

लग्न ठरलं असल्याची बातमी कानावर आली तरी मुलीच्या मनात धडकी भरते. जिवाची घालमेल सुरू होते. कारण लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीच्या, आयुष्याचाच ‘निकाल’ लावणार्‍या परीक्षेचे प्रचंड दडपण मनावर असते. या परीक्षेत तिचं ‘उत्तीर्ण’ होणं महत्त्वाचं. खूप महत्त्वाचं. केवळ नवर्‍यासाठी नव्हे! संपूर्ण समाजालाच ‘ती’ पास झाली की नापास, यात रस असतो. व्हर्जिनिटी यांसारख्या संवेदनशील विषयावरुन एखाद्या स्त्रीला अग्निदिव्याला सामोरं जावं लागतं तेव्हा आपल्याला या समाजातील लोकांच्या बिनडोक मानसिकतेचा प्रत्यय येतो. या मानसिकतेचा लोकांना प्रत्यय येत नसला तरी त्याचा परिणाम स्त्रीच्या स्वाभिमानावर होतो. यामुळे तिच्या स्वाभिमानाला ठेच पोहचते. 

स्त्री-रोगतज्ज्ञांच्या माहितीनुसार सध्या कौमार्य शस्त्रक्रियेकडे तरुणींचा कल वाढत चालला आहे. लग्नसराईच्या काळात अशा शस्त्रक्रियांच्या चौकशीतही वाढ होते. दहा-पंधरा वर्ष आधी तर अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात, याची माहितीही नव्हती. मात्र गेल्या पाच वर्षांत या शस्त्रक्रियांना मागणी वाढली आहे. मूळातच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून कौमार्य चाचणी अवैज्ञानिक ठरवली गेली आहे. खरं तर स्रीच कौमार्य सिद्ध करणारा एक पातळ पडदा तिच्या योनीमध्ये असतो. कधी कधी तर तो नैसर्गिकरित्या नसतो. आजच्या धकाधकीच्या काळात शारीरिक हालचालींमुळेसुद्धा तो पडदा फाटला जाऊ शकतो. त्याचबरोबर काही मुली वेगवेगळ्या शारीरिक खेळांमध्ये सहभागी असतात. ग्रामीण भागामध्ये शेतीच्या व कष्टाच्या अतिरिक्त कामांमुळे देखील हा पडदा फाटला जाऊ शकतो. 

या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार आधी केवळ सधन कुटुंबातील स्त्रिया अशा शस्त्रक्रिया करुन घेत असत. मात्र, आता या शस्त्रक्रिया 10 ते 50 हजारात होऊ शकतात. कमी वेळात आणि त्यातल्या त्यात परवडेल अशा दरात ही शस्त्रक्रिया होते. त्यामुळे कौमार्य शस्त्रक्रियेचं हे लोण मध्यमवर्गापर्यंतही पोहोचलं आहे. मध्यमवर्गातल्या तरुणींवरही कौमार्य शस्त्रक्रिया करुन घेण्याचा ताण असणं ही धक्कादायक बाब त्यामुळे समोर आली आहे. 

खरं तर अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. मात्र ठराविक वयानंतर सेक्ससुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, असं आपल्यला कधीच सांगितलं जात नाही. आपल्या मनावर लहानपणापसून सेक्स ही गोष्ट कशी वाईट आहे हेच बिंबवलं जातं. त्यामुळे मोठं होऊनसुद्धा सेक्सबद्दल बोलणं टाळलं जातं. नंतर उत्सुकतेपोटी कुठून तरी अर्धवट माहिती, अर्धवट ज्ञान मिळवलं जातं. पण त्या अर्धवट ज्ञानाचे गैरफायदे सुरूवातीला कधीच लक्षात येत नाही. कारण अर्धवट ज्ञान नेहमी घातकच असतं. मला वाटतं जर शाळेतच लैंगिक शिक्षण दिलं तर पुढे होणारे दुष्परिणाम टाळले जाऊ शकतात. चुकीचा माध्यमातून चुकीची माहिती घेऊन, गैरवर्तन केलं जातं ते देखील टाळला जाऊ शकतं. सेक्स ही शरीराची गरज आहे. व्हर्जिन वैगरे या मानवनिर्मित संकल्पना आहेत. हे जर होणाऱ्या मुलींच्या नवऱ्याला कळत नसेल तर मुलींनो त्या मुलाला तुमची व्हर्जिनिटी सांगण्यापेक्षा त्याला हद्दपार करा. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या