Loksabha 2019 : तारे-तारका चमकणार लोकसभेत

ज्ञानेश्‍वर बिजले 
गुरुवार, 16 मे 2019

कर्नाटकात अटीतटीची लढत 
मंड्या मतदारसंघातून माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा कन्नड अभिनेता निखील गौडा प्रथमच निवडणूक लढवित आहे. कन्नड अभिनेत्री सुमलता यांनी आव्हान दिले आहे. भाजपने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे ही लढत अटीतटीची ठरली. सुमलता यांचे पती कन्नड अभिनेते अंबरीश या मतदारसंघातून तिनदा खासदार झाले. केंद्रात राज्यमंत्री होते. दोनशेपेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केलेल्या सुमलता कॉंग्रेसकडून निवडणूक लढविणार होत्या. मात्र, जागा वाटपात हा मतदारसंघ जनता दल (सेक्‍युलर) कडे गेला. त्यामुळे, त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. खलनायकी भुमिकेसाठी नावाजलेला प्रकाश राज बंगळुरमध्ये अपक्ष उमेदवार आहे. 

दक्षिण भारतामध्ये चित्रपटसृष्टीतील कलाकार राजकीय क्षितीजावरही गेली पाच दशके मुख्य भुमिका निभावत आहेत. आता मात्र देशातील सर्वच भागात चित्रपट अभिनेते-अभिनेत्री लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसून येते. अडचणीच्या जागा पक्षाकडे खेचून घेण्यासाठी राजकीय पक्षही या कलाकारांना निमंत्रित करून उमेदवारी बहाल करू लागले आहेत. सुमारे 25 अभिनेते -अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे त्यांच्यापैकी आठ-दहा कलाकार तरी यंदा लोकसभेच्या सभागृहात निश्‍चितपणे दिसणार आहेत. 

बॉलीवूडमधील शत्रुघ्न सिन्हा, हेमामालिनी, उर्मिला मातोंडकर, जयाप्रदा, सनी देओल, राजबब्बर यांच्यासारखे नावाजलेले कलाकार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भोजपुरी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते रवी किशन, मनोज तिवारी, दिनेशलाल यादव निरहुआ हेही भाजपकडून निवडणूक लढवित आहेत. तर पश्‍चिम बंगालमध्ये टॉलिवूडमधील सध्या चित्रपटसृष्टी गाजवित असलेल्या मिकी चक्रवर्ती, नुसरत जहॉं या बंगाली सुपरस्टार देव, पूर्वीच्या नावाजलेल्या अभिनेत्री मूनमून सेन, शताब्दी रॉय यांच्यासोबत तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार होऊन भाजपला टक्कर देत आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्रीमंडळातील स्मृती इराणी, बाबूल सुप्रियो हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या व्यतिरिक्त अमोल कोल्हे, नवनीत कौर राणा, किरण खेर, प्रकाश राज, हंसराज हंस, निखिल गौडा, सुमलता, पूनम सिन्हा हेही कलाकार देशाच्या वेगवेगळ्या भागात निवडणूक लढवीत मतदारांचा कौल अजमावित आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करणारा भाजपचा खासदार "शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा यांनी कॉंग्रेसचा "हात' हातात घेतला अन्‌ पाटणा साहिब मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. त्यांचे प्रतिस्पर्धी केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरोधात लखनौमध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी व सत्तरच्या दशकातील अभिनेत्री पूनम सिन्हा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवित आहेत. तेलगू देशम, त्यानंतर समाजवादी पक्षातर्फे दोनवेळा लोकसभेत गेलेल्या अभिनेत्री जयाप्रदा आता भाजपकडून उत्तरप्रदेशातील रामपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरुद्ध निवडणूक लढवीत आहेत. 

"ड्रीमगर्ल' म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या भाजपच्या खासदार हेमामालिनी यंदा पुन्हा मथुरा मतदारसंघातून नशीब आजमावित आहेत. त्यांचे पती धर्मेंद पूर्वी बिकानेरचे खासदार होते. धर्मेद्र यांचे पूत्र सनी देओल यांनी राजकारणात प्रवेश केला असून, पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून विनोद खन्ना तीनदा भाजपचे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत कॉंग्रेसने ती जागा बळकावली. 

केंद्रीय मंत्री जिंकणार का? 
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या टीव्ही मालिकेतून सर्वदूर पोहोचल्या होत्या. गेल्या निवडणुकीत त्यांनी अमेठीतून थेट कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढविली होती. यंदाही त्यांनी अमेठीतूनच राहूल गांधींना आव्हान दिले आहे. दुसरे केंद्रीय मंत्री व गायक बाबूल सुप्रियो हे आसनसोल मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमावित आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसचे लोकप्रिय बंगाली अभिनेत्री खासदार मूनमून सेन यांचा मतदारसंघ बदलून आसनसोलमधून उमेदवारी दिली. त्यामुळे या दोन सेलिब्रेटींमधील लढत लक्षवेधी ठरली आहे. 

तृणमूलतर्फे पाच कलाकार 
"टॉलिवूड'चा पडदा सध्या गाजवित असलेल्या मिकी चक्रवर्ती आणि नुसरत जहॉं या युवा अभिनेत्री अचानकपणे तृणमूल कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून राजकीय पटलावर अवतीर्ण झाल्या. मिकी चक्रवर्ती कलकत्त्यातील जाधवपूर मधून निवडणूक लढवित असून, तेथून पूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माकपने ज्येष्ठ नेते सोमनाथ चटर्जी खासदार होते. तिच्यासमोर माकपकडून कलकत्त्याचे माजी महापौर उभे आहेत. बांगलादेशच्या सीमेवरील बसीरहाटमधून नुसरत जहॉं निवडणूक लढवत आहे. तृणमूलच्या गेले दहा वर्षे खासदार असलेल्या बंगाली अभिनेत्री शताब्दी रॉय यंदा पुन्हा बीरभूम मतदारसंघातून, तर 2014 मध्ये तृणमूलतर्फे खासदार झालेला बंगाली चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार देव हा घातल मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

भोजपुरी अभिनेते रिंगणात 
भोजपुरी चित्रपटसृष्टी गेल्या दोन दशकात बहरली आहे. त्यामुळे बिहार व उत्तर प्रदेशात भोजपुरी अभिनेत्यांचा भाव वधारला आहे. या चित्रपटसृष्टीतील तीन प्रमुख अभिनेत्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष व विद्यमान खासदार मनोज तिवारी यांच्यासमोर नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये तीन वेळा मुख्यमंत्री पद भुषविलेल्या दिल्ली कॉंग्रेसच्या अध्यक्षा शीला दीक्षित यांचे आव्हान आहे. भोजपुरी अभिनेता दिनेशलाल यादव निरहुआ याने आझमगडमध्ये थेट उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशीच दोन हात करण्याचा निर्णय घेतला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात पोटनिवडणुकीत सप-बसप यांनी एकत्रितरित्या भाजपचा पराभव केला. त्यातूनच महागठबंधनचा जन्म झाला. त्यांनी आता उत्तरप्रदेशात भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. कॉंग्रेसकडून गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढलेले अभिनेते रवी किशन यांना भाजपने ऐनवेळी पक्षात घेऊन गोरखपूरातून उमेदवारी दिली. 

उत्तरप्रदेशात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व अभिनेते राजबब्बर फत्तेपूर सिक्री येथून निवडणूक लढवित आहेत. ते यापूर्वी तीनदा खासदार होते. चंदीगडमधून अभिनेत्री किरण खेर यंदा भाजपतर्फे दुसऱ्यांना निवडणूक लढवित आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात "आप'तर्फे अभिनेत्री गुल पनांग यांनी निवडणूक लढविली होती. भाजपने विद्यमान खासदार उदीत राज यांना वगळून नॉर्थ वेस्ट दिल्लीतून पंजाबी सूफी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली. त्यामुळे उदीत राज यांनी कॉंग्रेसचा रस्ता पकडला. 

महाराष्ट्रातही कलाकारांचे आव्हान 
बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ऐनवेळी कॉंग्रेसची उमेदवारी स्विकारीत मुंबईत भाजपने खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले. याच मतदारसंघातून पूर्वी अभिनेते गोविंदा कॉंग्रेसकडून विजयी झाले होते. पूर्वी शिवसेनेत असलेले व सध्या "संभाजी महाराज' यांचे भूमिकेद्वारे रसिकांसमोर असलेले अमोल कोल्हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिरूरमध्ये लढत आहेत. दक्षिणेतील अभिनेत्री नववीत कौर राणा या युवा स्वाभिमानी पक्षातर्फे अमरावतीतून लढत असून, त्यांना कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा पाठिंबा आहे. 

कर्नाटकात अटीतटीची लढत 
मंड्या मतदारसंघातून माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा नातू व मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा मुलगा कन्नड अभिनेता निखील गौडा प्रथमच निवडणूक लढवित आहे. कन्नड अभिनेत्री सुमलता यांनी आव्हान दिले आहे. भाजपने त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे ही लढत अटीतटीची ठरली. सुमलता यांचे पती कन्नड अभिनेते अंबरीश या मतदारसंघातून तिनदा खासदार झाले. केंद्रात राज्यमंत्री होते. दोनशेपेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केलेल्या सुमलता कॉंग्रेसकडून निवडणूक लढविणार होत्या. मात्र, जागा वाटपात हा मतदारसंघ जनता दल (सेक्‍युलर) कडे गेला. त्यामुळे, त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. खलनायकी भुमिकेसाठी नावाजलेला प्रकाश राज बंगळुरमध्ये अपक्ष उमेदवार आहे. 

दक्षिण भारतात तमिळनाडूत पूर्वीपासूनच चित्रपटसृष्टीतील एम. जी. रामचंद्रन, जयललिता यांनी मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द गाजविली. त्यांच्याबरोबर अनेक अभिनेतेही राजकारणात आले. तमिळ चित्रपटसृष्टी 'कॉलीवूड'मधील सुपरस्टार रजनीकांत आणि कमलहसन यांनीही आता राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. आंध्रप्रदेशात एन. टी. रामाराव यांनी तेलगू देशम पक्षाची स्थापना करून राज्यातील सत्ता हस्तगत केली होती. तेथे आता चिरंजिवी, पवनकल्याण यांच्यासारखे दिग्गज कलाकार राजकीय क्षेत्रात आहेत. दक्षिण भारतातील अनेक कलाकारांनी लोकसभा व राज्यसभेत प्रवेश केला. 

उत्तर भारतात 'ऍग्री यंग मॅन' अमिताभ बच्चन 1984 मध्ये अलाहाबादचे खासदार होते. पहिला सुपरस्टार राजेश खन्नाने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांना 1991 मध्ये दिल्लीत जोरदार टक्कर दिली. केवळ दीड हजार मताने ते पराभूत झाले. त्यानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना पराभूत केले. ज्येष्ठ अभिनेते सुनीलदत्त मुंबईतून कॉंग्रेसतर्फे पाचवेळा निवडून आले. तर चेन्नईतून वैजयंतीमाला दोनदा खासदार झाल्या. गुजरातेतून भाजपतर्फे परेश रावल गेल्या वेळी निवडून आले होते. राज्यसभेत जया बच्चन, रेखा, शबाना आझमी, मिथून चक्रवर्ती, रुपा गांगुली यांच्यासह पूर्वीच्या काळी पृथ्वीराज कपूर, नर्गीस यांच्यासह अनेकजण खासदार होते. रामायण, महाभारत मालिकेतील अनेक कलाकार त्यावेळी लोकसभेवर निवडून गेले होते. 

नेतेच आता अभिनय करू लागल्याने, अभिनेतेही त्यांच्या कारकिर्दी संपुष्टात येऊ लागल्यानंतर राजकीय मंचावर धाव घेतात. आता मात्र सर्वच राजकीय पक्ष अशा कलाकारांना उमेदवारी देऊ लागले आहेत. अनेकदा "ग्लॅमर'मुळे कलाकार निवडून येतात. राजकीय पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत ते ढवळाढवळ करीत नसल्यामुळे, राजकीय नेत्यांच्या दृष्टीने ते सोयीचे ठरतात. त्यातच अवघड जागा त्यांच्यामुळे निवडून आल्यास पक्षाच्या दृष्टीने ते फायदेशीर ठरते. ते लक्षात घेत, यावेळी देशात अनेक राज्यात सिने कलाकार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यातील आठ-दहाजण निवडून येण्याची स्थिती आहे. त्यामुळे, राज्यसभेबरोबरच आता लोकसभेतही चित्रपटसृष्टीचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने दिसणार आहेत.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या