लढाई लोकसभेची पण रणांगण सोशल मीडिया

डॉ. आशुतोष जावडेकर
बुधवार, 22 मे 2019

एकुणातच राजकीय पोस्ट्सचं सगळ्यात महत्वाचं गमक हे की भारतात लोकं उत्तम मत प्रदर्शित करू शकतात आणि बिनधास्त करतात हे जगालाही कळल. चीनमध्ये, उदाहरणार्थ असं काही होऊ शकत नाही.

१. इथे फेसबुकवर यावेळी जी पोस्ट-युद्धे निवडणुकीच्या निमित्ताने झाली ती मूळ निवडणुकीहून अधिक झुंजार होती. निवडणुकीत हरल्यावर प्रतिस्पर्धी अनेकदा एकमेकांचे अभिनंदन करतात. इथे मात्र या वेळेस वार आरपार गेले आहेत. अनेकजणांच्या मैत्र्या तुटल्या आहेत, अनेक जणांचे परस्पर स्नेह मंदावले आहेत. अर्ग्युमेन्टेटिव्ह इंडियन्स आपण असल्याचे भारतीय नागरिकांनी या वेळी फेसबुक, ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांवर जसं ठसठशीतपणे सिद्ध केले आहे तसे क्वचित कुठे घडले असेल.

२. यातली विसंगती ही आहे की मतदान हे फेसबुक प्रचारावर किंवा मतप्रदर्शनावर अखेर होत नाही, हे इथले अनेक हुशार लोक विसरतात. मतांच्या पेढ्या वेगळीकडे आहेत. जो वर्ग निरक्षर आहे त्याला या फेसबुक पंडितांशी घेणंदेणं नाही. (आणि हा वर्ग अखेर मते देतो) जो वर्ग खरा श्रीमंत आहे, उद्योगपती वर्ग वगैरे त्यालाही फेसबुकवरच्या प्रचाराचं काहीही पडलेलं नाहीये. (आणि हा वर्ग पक्षांना फंडिंग देतो) या दोन्ही वर्गांचे राज्यकर्त्यांना असेस करण्याचे निकष हे फेसबुक पोस्ट लिहिणाऱ्या लोकांहून वेगळे आहेत. एवढंही भान दुर्दैवाने इथले पोस्टकर्ते ठेवताना मला आढळत नाहीत आणि जागांचे अंदाज बांधतात.

३. दुसरी खटकलेली गोष्ट म्हणजे, जी 'नॅरेटिव्ह' (हा लाडका शब्द झालाय सध्या मराठी राजकीय पत्रकारितेदेखील) पक्षांनी दिली, तिच्याच भोवताली इथल्या पोस्ट पडल्या. पोस्टकर्त्यांनी स्वतःला कुठली नॅरेटिव्ह महत्त्वाची वाटतात, कुठले मुद्दे जिव्हाळ्याचे वाटतात आणि पक्ष त्या संदर्भात काय करत आहेत असं काही लिहिलेलं निदान सर्रास दिसलं नाही.

४. तिसर म्हणजे, अनेक पोस्ट्स या बौद्धिक अहंकार दाखवणाऱ्या होत्या किंवा तशा नसल्या तरी किमानपक्ष अजाण होत्या. ग्राउंड लेव्हलला कुठल्याही पक्षाचं काम कसं चालत, उन्हात सभा घेणं म्हणजे काय नक्की असतं, कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते कशा तऱ्हेने दौऱ्यांमध्ये काम करतात, हेलिकॉप्टरने दौरे करणं ही चैन नसून गरज असते आणि कुठल्याही नेत्याचा तेव्हाच दिनक्रम प्रचंड थकवणारा असतो अशा अनेक मुद्द्यांची जाणीव मला लेखनात आढळली नाही.

५. जमेच्या बाजूला असं म्हणता येईल की एक उजवी-डावी कुठली का असेना भूमिका मनात धरून लिहिण्याचा मुळात उत्साह दाखवला गेला. अनेकदा कॉमेंट युद्धे ही जास्त महत्त्वाची, मुद्द्यांची दुसरी बाजू नकळत पुढे आणून विचारांना चालना देणारी अशी ठरली. पक्षांना, विशिष्ट नेत्यांना सोल्ड आउट झालेले भाडोत्री फेसबुक यूजर सोडले (असे अनेक आहेत आणि अनेकांना ते तसें भाडोत्री यूजर असतील याची शंकाही येत नाही) तर लोकांनी स्वतःची मते प्रामाणिकपणे मांडली.

६. महाराष्ट्राची विनोद आणि उपहासाची प्रत ही 'चल हवा येऊद्या' इतकी ढोबळ नाही हे अनेक पोस्ट्स वाचताना जाणवलं. पोस्टचं राजकीय मत पटो न पटो पण अनेकदा सगळे गालातल्या गालात त्या विनोदांना हसले.

एकुणातच राजकीय पोस्ट्सचं सगळ्यात महत्वाचं गमक हे की भारतात लोकं उत्तम मत प्रदर्शित करू शकतात आणि बिनधास्त करतात हे जगालाही कळल. चीनमध्ये, उदाहरणार्थ असं काही होऊ शकत नाही.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या