Election Results : 'जात' जात नाही; म्हणून राजू शेट्टी हरले

योगेश कानगुडे
शुक्रवार, 24 मे 2019

राजू शेट्टी हा माणूस संघटनेतून आलेला आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात संघटना बांधली ती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केले आणि करत राहतील. बहुतांश शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. त्यांच्या हितासाठी राजू शेट्टी काम करत राहिले आणि शेवटी त्याच समाजाने त्यांचा जातीच्या नावावर पराभव करावा हे न समजण्यासारखे आहे.

आपल्या लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे सार्वजनिक निवडणूक. निवडणुका म्हटल्यावर जय पराजय आलाच. परंतु निवडणुकांत काही लोकांचा पराभव व्हायला नको असे सातत्याने वाटत असते. महाराष्ट्रात काल निकाल लागल्यानंतर एका व्यक्तीबद्दल भावना होती. ते उमेदवार म्हणजे राजू शेट्टी. हातकणंगले लोकसभा मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. शिवसेनेचे नवखे उमेदवार धैर्यशील माने यांनी त्यांच्यावर लाखाहून अधिक मताने मात केली. माने घराण्यातील तिसरे खासदार म्हणून धैर्यशील माने पुढे आले आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शेट्टी यांना राजकारणाच्या शिवारातून बाहेर पडावे लागले.

खरं तर सुरुवातीला या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना कोण आव्हान देणार याचीच चर्चा होती. त्यांच्यासमोर कुणीही टिकू शकणार नाही, आता फक्त मताधिक्य मोजायचे, अशीच चर्चा पश्चिम महाराष्ट्रात होती. शिवाय राजू शेट्टी सलग दोनवेळा खासदार आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांनी 01 लाख 75 हजार मताधिक्याने विजय मिळवला होता. यावेळी मताधिक्य आणखी वाढवून हॅटट्रिक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचा मुलगा धैर्यशील माने यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली. जशी धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर झाली तशी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांची जात काढली. आतापर्यंत कधीही राजू शेट्टी यांची जात एवढ्या मोठ्या प्रमाणावर काढली गेली नाही. राजू शेट्टी यांना यावेळी हा मोठा धक्का होता. मात्र जातीचे समीकरण अनुकूल नसूनही सर्वजातीय शेतकऱ्यांनी शेट्टी यांना उचलून धरले. यावेळी मात्र जात फॅक्टर अधिक सक्रिय झाल्याचे दिसून आले. त्याचा मोठ्या प्रमाणात फटका शेट्टी यांना बसला. 

राजू शेट्टी यांना महाआघाडीबरोबर गेल्याचा फटका बसेल अशी सुरवातीपासून चर्चा होती. शेट्टी यांचे राजकारण कारखानदारविरोधी राहिले आहे. मात्र निवडणुकीच्या राजकारणात त्यांना कारखानदारांसोबत राहणे भाग पडले आहे. शेजारच्या सांगली मतदारसंघातही त्यांनी आपल्या पक्षाला मिळालेल्या जागेवर काँग्रेसचे नेते आणि कारखानदार विशाल पाटील यांनाच संधी दिली. त्यामुळे शेट्टी यांचा निष्ठावंत कार्यकर्ता नाराज असल्याची चर्चा आहे. या कूण परिस्थितीमुळे राजू शेट्टी यांची वाटचाल हातकणंगलेत खडतर होत गेली. ही शक्यता नाकारता येत नाही. परंतु या मुद्द्यांचा एवढा मोठा फटका बसला असेल असं वाटत नाही. कारण, भाजपचे नेतेही कारखानदारीशी संबधित आहेत. पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि सेनेच्या उमेदवारांची कारखानदार लोकांशी संग आहे हे लक्षात घ्यायला हवे.

मुळात, राजू शेट्टी हा माणूस संघटनेतून आलेला आहे. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात संघटना बांधली ती शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम केले आणि करत राहतील. बहुतांश शेतकरी हा मराठा समाजाचा आहे. त्यांच्या हितासाठी राजू शेट्टी काम करत राहिले आणि शेवटी त्याच समाजाने त्यांचा जातीच्या नावावर पराभव करावा हे न समजण्यासारखे आहे.

इतर ब्लॉग्स