असा बदलला राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन!

शरयू काकडे
शनिवार, 25 मे 2019

कोणतीही निवडणूक ही लोकशाहीचा सोहळा असते. जिथे सत्ता सामान्य जनतेच्या हाती येते. हाच काळ असतो जेव्हा देशाचं भवितव्य जनता ठरविते. चला... अजून विधानसभा निवडणूक पण बघायची आहे. अजूनही खूप काही शिकायचं बाकी आहे.

लोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच कल्पना नाही... पण समोर येईल ते काम करायचं एवढंच ठरवलं होत. लोकसभा निवडणुका सुरू झाल्यापासून लागू झालेली आचारसंहिता ते आजचा निकालाचा दिवस सगळं नवीन होत.  

निवडणूक जाहीर झाल्यावर पक्षांतर्गत होणाऱ्या घडामोडी, इच्छुक उमेदवारांचा उत्साह, पक्षाचा जाहीरनामा, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी दिलेली आश्वासने, पक्ष उमेदवारी जाहीर होईपर्यंत सुरू असलेलं राजकारण, 5 वर्ष मतदारसंघात न फिरणारे खासदारांच्या भेटी, उमेदवारी जाहीर होताच बदलणार राजकारण आणि सुरू होणारी प्रचाराची धामधूम, उमेदवारांची तयारी आणि विश्वास, सत्ताधारी पक्षाने केलेल्या आणि फसलेल्या कामांचा हिशोब, विरोधकांची टिक्का टिपण्णी आणि अखेर निवडणुकांचा दिवस. असं खूप काही होत असतं या काळात. प्रत्येक घडमोड राजकारण कसं बदलतं हे जाणून घेता आलं. अशा घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्र संस्थेत प्रत्येकजण प्रयत्नशील असतात. ऑनलाईन माध्यमांसाठी काम करताना ही प्रत्येक घडामोड वाचकांपर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यात वेगळीच मजा असते.

राहून राहून एक प्रश्न सारखा पडतो, की सरकार इतक्या योजना काढतं पण त्या जनतेपर्यंत पोहचल्यात का हे कोणीच का तपासून बघत नाही. पण '#कारणराजकारण'च्या या मालिकेतून याच मुद्याला हात घातला. राज्यकर्ते घसा ताणून सांगतात की, आम्ही हे केलं ते केलं. पण ते लोकांपर्यंत कितपत पोहचलं हे यातून समजलं. लोकसभा निवडणुकीत राजकारणासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचा, प्रश्नाचं आढावा घेण्यासाठी कारण 'सकाळ'ने राजकारण मालिका सुरू केली. महाराष्ट्रातील काही भागातील गावांना भेट देऊन तेथील स्थानिक समस्या जाणून घेतल्या. #कारणराजकारण मालिकेत काम करतानाचा अनुभव देखील महत्वाचा होता. या सर्व मालिकेत खूप काही शिकायला मिळालं. देशाचं राजकारण ते स्थानिक राजकारणाबाबत आजपर्यंत माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी समजल्या. काही लोक पक्षाला मानतात तर काही लोक चेहऱ्यांना. काही लोकांना आपले स्थानिक प्रश्नच महत्वाचे वाटतात.  शेतकऱ्याच्या प्रश्नांवर मात्र फक्त राजकारणच होतं. 

यंदाचा निवडणुकीचा निकाल हा जनेतेचा कौल आहे की, मोदी-शहांची रणनिती याचा विचार विरोधक करत असतील. एक्झिट पोलनंतरच भाजपची सत्ता येणार असा अंदाज सर्व माध्यमांनी वर्तविला होता. मोदी सरकारनी बहुमत मिळवून ते सिध्दही केलं. आता पुढील 5 वर्षांत मोदी काय करणार याकडे सर्वांचं लक्ष राहिल.

'सकाळ'मध्ये निवडणुकीसाठी काम करताना अशा बऱ्याच गोष्टी उमजल्या. एकंदर राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. राजकारण माहीत असणे आणि समजून घेणं दोन्ही महत्वाचं आहे. पत्रकार म्हणून तर आहेच पण या देशाचे नागरिक म्हणूनही ते महत्वाचं आहे. कोणतीही निवडणूक ही लोकशाहीचा सोहळा असते. जिथे सत्ता सामान्य जनतेच्या हाती येते. हाच काळ असतो जेव्हा देशाचं भवितव्य जनता ठरविते. चला... अजून विधानसभा निवडणूक पण बघायची आहे. अजूनही खूप काही शिकायचं बाकी आहे.

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या