अमृता फडणवीस, आप आगे बढो !

सायली नलवडे-कविटकर
सोमवार, 10 जून 2019

आजवर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर अमृता फडणवीस यांच्यासारख्या 'फस्ट लेडी' अनुभवायला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अमृता यांचं वावरणे काहींना बुचकळ्यात टाकू शकते आणि काही कौतुकही करु शकतात.

महाराष्ट्राच्या 'फस्ट लेडी' अमृता फडणवीस यांना अमेरिकेतील सादरीकरणानंतर ज्या पद्धतीने 'ट्रोल' केलं जातंय, ते केवळ निंदणीयच नाही, तर समाज म्हणून आपण किती मागे आहोत, याची पुरेपूर जाणीव करुन देणारेही आहे. जगताना स्वतःला कोणत्याही चौकटी घालणं, म्हणजे खरं तर हा एक सामाजिक दहशतवादाचा नमुना वाटतो. मात्र या सगळ्या चौकटी, कक्षा आणि तथाकथित सीमा ओलांडत अमृता फडणवीस अगदी स्वच्छंदी जगतात. जगण्याचा मनमुराद आनंद घेतात. म्हणूनच त्या भावतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊनही !

मुळात आजवर आपल्या महाराष्ट्राला इतक्या तरूण आणि मुक्तछंद 'फस्ट लेडी' मिळाल्या नाहीत, हे आपलं सुदैव की दुर्दैव यावर चर्चा होऊ शकते. पण काहीही विषय असला, की बिनबोभाट त्यांना 'ट्रोल' करत सुटायचं हे बरं नव्हे ! महाराष्ट्राची स्वतःची एक परंपरा आहे, संस्कृती आहे. महाराष्ट्र संबंध देशाला आजवर दिशाही देत आलाय, हे सगळं खरं आहे. पण या दिशा देण्याला पुरोगामीपणाचा मोठा आधार आहे. असं असतानाही एक महिला म्हणून अमृता फडणवीस यांना अर्वाच्च आणि अत्यंत हीन पातळीवर ट्रोल करताना आपण आपला 'सो कॉल्ड' पुरोगामीपणा कोणत्या बासनात गुंडाळतो?

एकीकडे हातात सर्वात लेटेस्ट स्मार्टफोन आहे म्हणून गावभर मिरवायचं आणि त्याच स्मार्टफोनमधून पाश्चिमात्य पेहराव करणाऱ्या अमृता फडणवीसांना हीन पातळीवर ट्रोल करायचं, हा दांभिकपणा अनेकांमध्ये ठासून-ठासून भरलाय ! मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून असो किंवा गायन आणि नृत्याचं सादरीकरण करणाऱ्या कलाकार म्हणून. इतकंच काय तर त्यांच्याकडे 'स्टाईल आयकॉन' म्हणून पाहायचं म्हटलं तरीही ट्रोलर्स पिच्छा सोडत नाहीत. बरं टीका करुच नये, असं अजिबातच नाही. मात्र ती टीका भूमिकेवर किंवा व्यापक धोरणाबद्दल असावी आणि त्याला किमान संसदीय भाषेचं व्यासपीठ असावं. मात्र अमृता फडणवीस यांच्यावरल केली जाणारी सोशल मीडियातील टीका वाचली तर त्या शब्दांना पूर्वग्रहदूषितपणाचा वास येतो.

आजवर महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर अमृता फडणवीस यांच्यासारख्या 'फस्ट लेडी' अनुभवायला मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अमृता यांचं वावरणे काहींना बुचकळ्यात टाकू शकते आणि काही कौतुकही करु शकतात. मात्र ट्रोलर्स हा तिसरा असा घटक, जो खासकरून अमृता फडणवीस यांच्या विरोधात तयार झालेला स्पष्टपणे दिसतोय. याला राजकीय कारणच असू शकते, हे सांगायला कोणत्याही जाणकाराची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय किंवा इतर भूमिकांवर होणाऱ्या टीकेचं स्वागतच करायला हवे. कारण हीच सदृढ लोकशाहीची पद्धत म्हणावी लागेल.

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने एखाद्या चौकटीतच राहावे, असे कोणतेही संकेत नाहीत. एक गोष्टं मात्र नक्की की, आपण मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला ठराविक चौकटीतच पाहत आलो. याबाबत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनाच विचारलं गेलं होतं, त्यावेळी त्यांचं उत्तर अमृता यांना पाठींबा देणारं होतं. ते म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांची पत्नी इतक्या तरुण असतात, याची महाराष्ट्राला अजून सवय नाही'.

आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकांची ओळख त्यांची 'बायको' म्हणून होती. परंतु अमृता फडणवीस आधी बँकर आणि आजच्या काळात स्वतःला सिद्ध करू पाहणारी स्त्री अशी आहे, जी सर्वांनी खुल्या मनाने मान्य करायला हवी. बँकर, सिंगर, मॉडेल म्हणून त्यांचं करिअर मोकळेपणा करत असताना केवळ मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून का ट्रोलर्सला खटकतंय? याचं कारण केवळ मुख्यमंत्री द्वेषात तर लपले नाही ना ही शंका राहून-राहून येत राहते. आजवर महाराष्ट्र कर्तृत्वान महिलांच्या मागे उभं राहिलाय, मग अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून नाकारणे चुकीचं आहे. मॉडेलिंग, सिंगिंग या नव्या करिअरच्या वाटा सक्षमपणे चालताना कौतुक करायला हवं, म्हणूनच अगदी खुल्या मनाने म्हणावेसे वाटते, अमृता फडणवीस आप आगे बढो !

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या