तरुण खासदारांच्या प्रगल्भ जाणिवा!

अतुल क. तांदळीकर
Sunday, 30 June 2019

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रथमच निवडून गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी देशातील महिला आणि तळागाळातील लोकांच्या आरोग्य समस्येवर केलेले भाष्य ही त्यांच्यातील लोकांप्रति असलेली तळमळ आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका छोट्या पडद्यावर हुबेहूब वठविणारे आणि तरुणांमध्ये क्रेझ असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणांतून देखील अशीच तळमळ दिसली.

संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या 17 व्या लोकसभेत गेल्या लोकसभेच्या तुलनेत तरुण खासदारांची संख्या 12 टक्के वाढली आहे. 20 ते 40 वयोगटातील खासदारांमध्ये काही आपल्या महाराष्ट्रातील आहेत. महिला संख्या देखील यावेळी वाढली आहे. मागच्या वेळी 62 होत्या, आता 78 आहेत. ही गती संथ आहे, हे मान्य करावे लागेल. आगामी काळ तरुणांचा आहे. मतदारांनी तरुणांना विशेषतः शिक्षित खासदाराना लोकसभेत धाडले आहे. 394 खासदार पदवीधर आहेत. एकूणच हे चित्र एका प्रगल्भ लोकशाहीची उत्तम सुरवात म्हणता येईल, असे म्हणण्याचे हे धाडस यासाठी करावे लागते. कारण काही तरुण खासदारांनी जी प्रथम भाषणे या अधिवेशनात केलीत, ती त्यांच्यातील प्रगल्भतेची चुणूक दर्शविणारी आहेत. अजून 5 वर्षात ही प्रगल्भता नक्कीच देशाच्या प्रगतीला चार चाँद लावेल, असे संकेत ही भाषणे देतात.

उदाहरणच द्यायचे झाले, तर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या प्रथमच निवडून गेलेल्या खासदार नवनीत राणा यांनी देशातील महिला आणि तळागाळातील लोकांच्या आरोग्य समस्येवर केलेले भाष्य ही त्यांच्यातील लोकांप्रति असलेली तळमळ आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका छोट्या पडद्यावर हुबेहूब वठविणारे आणि तरुणांमध्ये क्रेझ असलेले डॉ. अमोल कोल्हे यांच्या भाषणांतून देखील अशीच तळमळ दिसली.

संसदेत खरे तर अशाच सदस्यांची गरज आहे. केवळ एकमेकांवर अश्लाघ्य चिखलफेक करीत संसदेचा अमूल्य वेळ वाया घालविण्यात धन्य मानणाऱ्या सदस्यांना ही या तरुणाईची सणसणीत चपराक आहे. जागतिक पातळीवर झपाट्याने पायाभूत सुधारणेत बदल होत असताना त्याचे भान ठेवून आजची तरुण मंडळी काम करीत राहिली व सरकारलाही कामाला लावत राहिली, तर या देशाकडे एक प्रगत राष्ट्र म्हणून बघण्याच्या इतरांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल होईल.

राणा यांनी घरकुल योजना, आरोग्य योजना, डॉ. कोल्हे यांनी शेतमालास हमीभाव, तातडीच्या आरोग्यसेवा हे विषय मांडताना जी स्वतःमधील जाणिवा प्रगल्भ असल्याची झलक दर्शविली, ती नक्कीच भविष्यातील उत्तम कामांची नांदी मानली पाहिजे. या तरुण खासदारांना आपला देश तरुण ठेवण्याचे असलेले भान नक्कीच प्रगतिशील भारत हा आशावाद जागवितो.

पंतप्रधान मोदींना अशा सहकाऱ्यांचीच गरज आहे, त्यांना देखील विकासाची दृष्टी आहे. हा योग जुळून येणे म्हणजेच एक उत्तम संधी समजली पाहिजे. तिचं सोनं करणं, या कुशल खासदारांना जमेल असे अपेक्षिणे गैर नाही.

इतर ब्लॉग्स