Pune Wall Collapse : संवेदनशीलतेला माणुसकीचा पाझर

विश्वजीत पवार
Sunday, 30 June 2019

माझ्या कामाचा भाग म्हणून मी लागलीच कॅमेरा काढला. छायाचित्र पत्रकारांसाठी कॅमेरा म्हणजे डोळा असतो. या घटनेला कॅमेरात कैद करणं मला कितीही कठीण जात असलं तरी ते करणं आवश्‍यक होतं. अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले कि, "कोंढवा भागात पेट्रोल पंप जवळील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून कामगार जागीच मृत पावले असून काही कामगार अजूनही भिंतीखाली अडकले आहेत." हे ऐकून आणि तेथील मृतांच्या घरच्यांच्या किंकाळ्या ऐकून ती घटना आता जास्त भयानक वाटू लागली होती.

दूरदर्शन, रेडिओ, वेबपोर्टल सगळीकडे एकच बातमी. "कोंढवा भागात रात्री दीड वाजता इमारतीची भिंत कोसळून कामगार ठार." झोपेतून जागही आली नव्हती, ती सकाळ अशी दुःखद झाली होती. तरीही घटनास्थळी गेलो नसल्यामुळे मी दिनचर्येप्रमाणे पुन्हा झोपणार तोच दुसऱ्या क्षणाला वरिष्ठांचा फोन आला. तोपर्यंत घटनेचं गांभीर्य माझ्यापर्यंत पोहचलं नव्हतं. छायाचित्रपत्रकार असल्यामुळे अशा बातम्या कानावर येणं हा रोजच्या कामाचा भाग होता. त्यामुळे कामाचा भाग समजूनच मी घटनास्थळी जाऊ लागलो. गाडीला किक मारेपर्यंत मी नेहमीच्या मूडमध्ये होतो. मध्येच एखाद्या रस्त्याच्या सिग्नलला थांबलेल्या माणसांकडून सहानुभीतचे शब्द कानावर पडत होते. थोडीतरी 'माणुसकी आणि संवेदनशीलता' शिल्लक आहे याचे समाधान मला होते. 

घटनास्थळापासून एक किलोमीटरवर असताना आजूबाजूला गर्दी दिसू लागली. ती गर्दी कापत मी अज्ञात होऊन गाडी लावली. घटना एका ओळीत माझ्यापर्यंत पोहोचली होती. आता कुठे मला घटना उलगडू लागली होती. ती घटना मीडियापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावरून अधिक स्पष्ट अन् खरी दिसत होती. माझ्या कामाचा भाग म्हणून मी लागलीच कॅमेरा काढला. छायाचित्र पत्रकारांसाठी कॅमेरा म्हणजे डोळा असतो. या घटनेला कॅमेरात कैद करणं मला कितीही कठीण जात असलं तरी ते करणं आवश्‍यक होतं. अग्निशामक दलाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले कि, "कोंढवा भागात पेट्रोल पंप जवळील आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून कामगार जागीच मृत पावले असून काही कामगार अजूनही भिंतीखाली अडकले आहेत." हे ऐकून आणि तेथील मृतांच्या घरच्यांच्या किंकाळ्या ऐकून ती घटना आता जास्त भयानक वाटू लागली होती. या दरम्यान मी माझा कॅमेरा तयार केला. ते करत असताना घटनेबाबतची हळहळ, लोकांची गर्दी आणि चर्चा कानावर पडत होती. लोकांच्या भावनांना ठेच पोहोचणार नाही हि आवश्‍यक ती काळजी घेऊन मी घटना कॅमेरात टिपत होतो. भयभीत झालेली लोक आणि घटनेचे साक्षीदार यांच्या संभाषांतून त्या घटनेचे गांभीर्य छायाचित्रकरातील माणसाला जागे करत होते. सगळे वातावरण बघून मी घटनास्थळी गेल्यानंतर बघितले, पोलीस यंत्रणा, बचावकार्य, नागरिक आणि भयभीत झालेली ओक्‍साबोक्‍शी रडणारी कुटुंब हे सगळे कैद करून ऑफीसला तातडीने ते छायाचित्र पाठवले. पण त्यात चिमुरडी मुले अडकलेली पाहून मात्र त्यांच्यावर बातमी करणे 'माणूस' म्हणून खूपत होते. 

यावेळी वाटलं सरळ कामाचे कर्तव्य धुडकावून लावून माणूस म्हणून त्या धीर सुटलेल्या कुटुंबियांना मदत करावी. पण ते करणे अशक्‍य होते कारण मीडियाच्या माध्यमातून मी त्या घटनेच प्रतिनिधित्व करत होतो, तो त्यांना माझ्या भूमिकेतून आधार देण्याचा प्रयत्नच होता. त्यावेळी घटनेतून वाचलेल्या विमल शर्मा या कामगाराची मुलाखत घेताना समजले, घटना घडल्यानंतर त्याने तातडीने अग्निशामक दलाला, पोलिसांना फोन केले. घटनेची दाहकता ज्यावेळी ते मांडत होते तेव्हा माझ्यातला छायाचित्रकार व्याकुळ होत होता. आपल्या सहकार्यांच्या मृत्यूने कासावीस झालेला इसम रात्रीपासून उपाशीपोटी बचावकार्यात मदत करत होता, ज्या पद्धतीने तहानभूक हरपून त्याने मदतीसाठी जीवप्राण केला होता, यातून तो 'वाचला' याचे समाधान माझ्या कॅमेराला मिळाले. रात्रीपासून कोणताही नागरिक न खाता न पिता त्या बचावकार्याचा भाग बनून मदत करत होता. हकीकत सांगताना तो म्हणाला, आधी तक्रार केली होती पण तक्रारींचे निवारण झाले नाही. पण काल अचानक धाडकन आवाज झाला नि लोकांचा थरकाप झालेल्या किंचाळ्या ऐकून मनात धस्स झाले. तेव्हा घाई करत हे सगळे करताना कॅमेरा चालू होता. त्यावेळी मुस्तफा या ज्या इमारतीची भिंत कोसळली त्या इमारतीत राहणार इसम होता. त्याला घडलेल्या घटनेचं इतकं वाईट वाटले नि 'हे जे काही झालं ते आमच्यामुळेच झाले' या हळहळीने तो जेवला नाही. घटनेनंतर जमा झालेल्या जमावातील व्यक्ती अशापद्धतीने मदत करत होता, जणू तो आपल्याच कुटुंबातील आहे. गेलेला व्यक्ती हा कुठल्याही राज्याचा जातीचा असो पण त्याच्यासाठी पुढे आलेले हात 'माणुसकीचे' होते. 

पुण्यातील ही अंगावर थरकाप आणणारी घटना मी बघत होतो. हे बघून कार्यरत असणाऱ्या सगळ्यांच्या मनात एकच सुन्नपणा आणि पश्‍चाताप होता कि, आम्ही यासाठी काहीच करू शकलो नाही. 
एखादा दिवस वाईट असतो. इतका कि नुसत्या वर्णनाने आणि त्या घटनेच्या साक्षीदारांकडून ऐकल्यानंतर माणूस म्हणून भावनेला यावर घालणं शक्‍य होत नाही. छायाचित्रण करताना या सगळ्या संवेदनशील मनांचे भान ठेऊन या घटनेला कसा हातभार लावता येईल हा एकच विचार मनात घोळत असतो. आम्ही केवळ छायाचित्रकार पत्रकार नसून आमच्यातही एक माणूस लपलेला आहे. पण यांचे नेतृत्व करण्याचे काम आणि झालेली घटना सावरण्याचे काम अप्रत्यक्षपणे आमच्या हातात असते, एवढ्यावर मनाला शांत करण्याचा अयशस्वी प्रयत्न मन करत राहते.

इतर ब्लॉग्स