Happy Birthday Dhoni : डिअर माही!

Mahendra_Singh_Dhoni
Mahendra_Singh_Dhoni

डिअर माही,

प्रथमतः जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आज तुझा 38 वा जन्मदिवस देशभरातच नाही, तर जगभरातील तुझे सगळे चाहते "World MSDians Day" म्हणून साजरा करत आहेत. म्हणून म्हटलं निदान तुझ्या वाढदिवशीच तुला काहीतरी लिहावं. तसा मी काही लेखक वगैरे नाही, आणि व्हॉट्सअप, फेसबुकच्या जमान्यातील असल्याने पत्र लिहायचा असा काही गाढा अनुभव पण नाही. तसं पाहिलं तर आतापर्यंत दोन वेळा (मैत्रिणींना) पत्र लेखन केलं आहे, तेवढाच काही तो अनुभव. (त्याची सरासरी तू स्टंप आऊट होण्यापेक्षाही जास्त येईल. कसोटीमध्ये 3 वेळा आणि वनडेमध्ये फक्त एकदा). असो.

मला माहित नाही तू मला इतरांपेक्षा जास्त का आवडतो ते? पण एवढं नक्की सांगू शकतो, की तुझ्यापेक्षा जास्त दुसरा कोणताच खेळाडू किंवा व्यक्ती मला आवडत नाही. लहानपणी आमच्या तीर्थरूप पप्पांनी आम्हाला सचिनचा फोटो असलेली प्लास्टिकची बॅट खेळण्यासाठी दिली होती, तेव्हापासून आमचा आणि क्रिकेटचा संबंध. आमचे पप्पा कपिल देव आणि सचिनचे फॅन. त्यामुळे भारताची मॅच असली, की आम्ही रेडिओला चिटकायचो. (त्या काळात ग्रामीण भागात लोड शेडिंग खूप असायचं).

माही, तुझा भारतीय संघात प्रवेश झाला, तेव्हा मी चौथीला होतो. मी क्रिकेट खेळायला आणि पाहायला सुरुवात केली होती, तेव्हा सचिन, सेहवाग, दादा, द्रविड, लक्ष्मण यांनाच खेळताना पाहत मोठे होत होतो. पण तू जसा भारतीय संघात आला, तसा माझा क्रिकेटकडे पाहण्याचा अंदाजच बदलला. एक तर तू तुझ्या हेअर स्टाईलमुळे चर्चेत तर होताच, पण तुझी खेळण्याची स्टाईलसुद्धा इतरांपेक्षा वेगळी होती. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून द्रविड, सचिनकडे पाहिलं जायचं, पण तू क्रिकेटमध्ये तुझी फ्री स्टाईल घेऊन आला आणि तेव्हापासून मी तुझा फॅन झालो. (गावाकडं कसलं आलंय तंत्रशुद्ध. आला बॉल की 'दे घुमाके' असा सगळा प्रकार)

2007 चा टी-20 वर्ल्ड कप, 2011 चा वन-डे वर्ल्ड कप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या प्रतिष्ठेच्या स्पर्धा तू देशाला जिंकून दिल्या. अशा अनेक स्पर्धा, सामने तू तुझ्या ऐनवेळी अफलातून निर्णय घेण्याच्या क्षमतेवर जिंकून दाखवले. यामुळे अनेक विश्वविक्रम भारताच्या तसेच संघातील खेळाडूंच्या नावावर नोंदविले गेले. विकेटकीपर आणि कॅप्टन म्हणून अनेक विक्रम तुझ्या नावावरही आहेत. आतापर्यंतचा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजही तुझ्याकडेच पाहिलं जातं. विव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविडसारखे जगभरातील सर्व महान क्रिकेटपटू तुझे फॅन असताना मी मागे कसा राहीन? जगभरातील विविध संस्थांनी तुझा यथोचित सन्मान केला आहे. भारत सरकारनेही राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2007), पद्मश्री (2009) आणि पद्मभूषण (2018) पुरस्कार देऊन तुला गौरविले आहे. तसेच भारतीय सैन्य दलातील मानाचे 'लेफ्टनंट कर्नल' हे पदही तुला बहाल करण्यात आले आहे.

आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा 2019 जशी सुरू झाली तसं तुझ्या कारकिर्दीला जणू ग्रहणच लागलं. धोनीनं कसं खेळलं पाहिजे, यावर आता गल्लीतली शेंबडी पोरं पण भाषण ठोकायला लागलेत. (मी आता नोकरीमुळे शहरात राहायला आलोय, त्यामुळे गल्लीचा उल्लेख केलाय). धोनीनं आता निवृत्त व्हावं असा सल्ला हल्ली कोणीही देत फिरतं. मीडिया वाल्यांनीही हीच गोष्ट उचलून धरली असल्यामुळे गल्लीत एक टप्पा आऊट क्रिकेट खेळणाऱ्यांना पण आपण क्रिकेट विश्लेषक असल्याचा कॉन्फिडन्स आलाय. जवळपास 132 कोटी लोकांच्या अपेक्षांचं प्रेशर असतानाही डोकं शांत ठेऊन क्रिकेट खेळण्याचा आणि सामना जिंकण्याचा आनंद काय असतो, हे आयुष्यात कधीच मैदानात पाऊल न ठेवणाऱ्यांना काय माहिती असणार? 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वात आतापर्यंत जवळपास 460 कॅप्टनची नोंद आढळते. मात्र आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा एकमेव कर्णधार तू आहेस, हे अनेकांना माहीत नाही. 6 फेब्रुवारी 2015 ला जेव्हा झिवाचा जन्म झाला, तेव्हा तू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. तेव्हा तो दौरा मधेच सोडून तू मायदेशी येऊ शकला असता, पण तू "I am on national duty, other things can wait" असं उत्तर दिलं होतं, हेही अनेकांना माहीत नाही. अनेक कर्णधार आजही सामना गमवावा लागल्यानंतर मीडियाला उत्तरे देण्यासाठी संघ सहकाऱ्यांना पाठवतात, पण तू असा एकमेव कर्णधार आहेस, जो सामना हरल्यानंतर स्वतः मीडियाला सामोरा जायचा, हेदेखील अनेकांना माहीत नाही. तसंच कोणतीही स्पर्धा जिंकल्यावर मिळणारी ट्रॉफी तू संघातील नव्या खेळाडूकडे सोपवून बाजूला व्हायचा आणि त्यांना जल्लोष करू द्यायचा, हेसुध्दा अनेकांना माहीत नाही. 

आता क्रिकेट विश्वातून तुझ्यावर टीका होत असताना तू मात्र हिमालयासारखा थंड आणि आपल्या जागी ठाम उभा असलेला दिसतो. आणि "Everybody has views in life and it should be respected" असं उत्तर देऊन सगळंच जिंकून घेतो. मी क्रिकेटचा फॅन आहे आणि तुझा 'जबरा फॅन' आहे. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असं म्हणतात, पण निंदकच जर घरात (रूममध्ये) राहत असतील तर काय करायचं? कधी कधी माझे रूममेट तुझ्यावर टीका करतात, तेव्हा त्यांना जशास तसं उत्तर द्यायची इच्छा असते, पण तुझं हे वाक्य आठवतं आणि मग सगळं तिथंच राहून जातं. तुझ्याकडून बरंच काही शिकलोय, अजूनही खूप काही शिकायचं बाकी आहे. तू क्रिकेटमधून निवृत्त व्हावं अशी अपेक्षा कोणत्याच धोनी फॅनची नसणार, माझीही नाही. तू कायम क्रिकेट खेळत राहावं असंच वाटतं. 

प्रत्येक खेळामध्ये चांगले खेळाडू असतात, पण त्यापैकी मोजकेच खेळाडू हे महान खेळाडू होतात. तू त्या महान खेळाडूंपैकी एक आहेस. कारण "A name that changed the face of Indian cricket, A name inspiring millions across the globe, A name with an undeniable legacy, MS Dhoni – not just a name, it's an emotion" हे आयसीसीनेसुद्धा मान्य केलंय. MSD, माही, कॅप्टन कूल, द फिनिशर, किंग ऑफ कॅप्टन्स, थाला अशा अनेक टोपणनावाने तू जगभर ओळखला जातो. पण तू माझ्यासाठी 'गॉड ऑफ क्रिकेट' आहेस (सॉरी सचिन सर). तू उद्या भारतीय संघातून खेळ, आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळ, नाहीतर गावाकडच्या माझ्यासारख्या पोरांना सोबत घेऊन खेळ, मी कालही तुझा फॅन होतो, आजही आहे आणि कायम तुझाच फॅन राहीन. 

If Dhoni have billions of fan, then I'm the one.
If Dhoni have only one fan, then I'm the one.
If Dhoni have no fan, then I'm die.

तिकिट कलेक्टर ते ट्रॉफी कलेक्टरपर्यंतचा तुझा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. लिहण्यासारखंही खूप आहे आणि तुझ्याविषयी पुस्तक लिहण्याचा विचारही सध्या मनात घोळतो आहे. या छोटेखानी ई-पत्रातून तुला काही प्रश्न विचारला नाही, त्यामुळे जसं मैत्रिणींना म्हणालो होतो तसं 'तुझ्या उत्तराची वाट पाहीन' असं म्हणणार नाही, पण "ये खुदा तेरी सिर्फ एक नजर की बात है, मेरी पूरी जिंदगी का सवाल है" असं नक्कीच म्हणू शकतो. तूर्तास तरी तुझी रजा घेऊन हा लेखन प्रपंच इथेच थांबवतो. 

पुन्हा एकदा तुला जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. Happy Birthday Mahi !! 

तुझाच,
जबरा फॅन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com