दहशतीचा पाठिराखा अमेरिका

Dr. Ali Chegeni
Dr. Ali Chegeni

25 व 26 जून 2019 रोजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ यांनी दिल्लीला भेट दिली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत "इराण हा दहशतवाद निर्यात करणारा जगातील सर्वात मोठा देश आहे,"" असे विधान त्यांनी केले होते. त्याबाबत विचारता, इराणचे भारतातील राजदूत डॉ अली चेगेनी यांनी काल त्यांच्या निवासस्थानी एका अनौपचारिक वार्तालापात बोलताना, "इस्राईल हा जगातील सर्वाधिक दहशतवादी देश आहे. त्याला पाठिंबा व संरक्षण देणारी अमेरिकाही दहशतवादाला पोसते आहे. पॅलेस्टाईनवर होणारा अन्याय आम्हाला कदापिही मान्य नाही. ज्या हिजबोल्लाला अमेरिका व इस्त्राईल दहशतवादी म्हणतात, ते पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत.

आयसीस, तालिबान, अल कैदा कुणी पैदा केली? असे आरोप वजा प्रश्‍न केले. इराणच्या हद्दीत अलीकडे घुसलेले अमेरिकेचे ड्रोन इराणने पाडले. ते परत जावे, अशी सूचना इराणने केली होती, परंतु, ते न परतल्याने त्याला नष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. प्रत्युत्तर, म्हणून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण विरूद्ध युद्ध लादण्याची घोषणाही केली, पण काही वेळातच ती मागे घेतली. 8 जुलै रोजी ब्रिटनच्या नौदलाने जिब्राल्टर नजिक इराणचा टॅंकर ताब्यात घेतला, तो त्यातून सीरियाला खनिज तेल वाहून नेण्यात येत आहे, या संशयावरून. त्यावर, "ब्रिटनची ही चाचेगिरी सहन केली जाणार नाही,"" असा इशारा इराणने दिला.तसेच, "ब्रिटनने टॅंकरला सोडले नाही, तर ब्रिटनचे टॅंकर जप्त करण्यास इराण मागेपुढे पाहाणार नाही," असे इराणचे सर्वेसर्वा आयातोल्ला खामेइनी यांच्या मंडळाचे सदस्य मोहसेन रेझाई यांनी स्पष्ट केले. डॉ चेगेनी म्हणाले, "" इराणकडे अनेक टॅंकर्स आहेत. छापा घातलेला सुपर टॅंकर असून, तो सुएझ कॅनॉलमधून जाऊ शकणार नाही. इराणच्या नौदलाचा जगात सहावा क्रमांक लागतो, हे अन्य राष्ट्रांनी विसरता कामा नये. निरनिराळ्या देशांचे शेकडो टॅंकर्स, जहाजे ही पर्शियन आखातातून प्रवास करतात, तेव्हा त्याची जाणीव आमच्यावर कारवाई करणाऱ्या राष्ट्रांना ठेवावी लागेल. आम्हाला तणाव वाढवायचा नाही. छापा घातलेल्या टॅंकरमधून खनिज तेल नेले जात नसून, त्यापासून उत्पादित केलेला अन्य माल आहे."

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाच युरोपीय देशांच्या शिष्टाईद्वारे इराणने अण्वस्त्रनिर्मिती करू नये, म्हणून इराणबरोबर केलेला समझोता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडीत काढल्यापासून इराणच्या पर्शियन गल्फ, होर्मूज आखातात जबरदस्त तणाव वाढलाय. डॉ चेगेनी यांच्यामते, ""इराण सर्वार्थाने सिद्ध आहे."" ते म्हणाले, अलीकडे ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची भेट घेतली, ती केवळ "फोटो अपॉर्च्युनिटी" होती. अमेरिकेतील निवडणुका जवळ आल्याने ट्रम्प यांना या भेटीचे भांडवल करायचे आहे, या पलिकडे भेटीला महत्व नाही. अमेरिका जगातील एक बुली (गुंड) आहे. "मी म्हणेल, तेच झाले पाहिजे," अशी ट्रम्प यांची वर्तन असते." 

ते म्हणाले, "वारंवार लादल्या जाणाऱ्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेला कमीत कमी खनिज तेलनिर्यातीवर अवलंबून ठेवण्याचे धोरण इराणने अवलंबिले आहे. आधी आमची अर्थव्यवस्था 95 टक्के खनिजतेल निर्यातीवर अवलंबून होती. ते प्रमाण आम्ही 30 टक्‍क्‍यावर आणले असून, यावर्षी ते 27 टक्‍क्‍यावर आणले जाईल. इराण, कृषिजन्य माल, लोखंड यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की या देशांना विजेची निर्यात करीत आहोत. शिवाय, अणु समृद्धीचा वापर आम्ही अणुऊर्जा निर्मितीसाठी करणार आहोत. इराणला अण्वस्त्र निर्मिती करायची असेल,तर आम्हाला कुणीही त्यापासून परावृत्त करू शकणार नाही. इराण 8 कोटी लोकांचा सार्वभौम देश आहे. कुणाचाही दबाव सहन करणार नाही. इराणवर बंधने लादून अमेरिकेला आमचा महसूल कमी करावयाचा आहे. मी क्‍यूबात असताना त्यावर असलेल्या निर्बंधामुळे तेथील रुग्णांना परदेशातून जीवनावश्‍यक औषधे आयात करता येत नव्हती. इराणवर निर्बंध लावण्याचा तो एक हेतू आहे. "अण्वस्त्र प्रसार बंदी (नॉन प्रालिफरेशन ट्रीटी)" कराराचा इराण सदस्य आहे. एक जबाबदार राष्ट्र आहे. 

अमेरिका इतकी निर्ढावलेली आहे, याचे आणखी एक कारण म्हणजे, आजवर ते खनिज तेल आयात करीत होते. परंतु, शेलगॅसचे साठे मिळाल्यापासून तेल आयातीची गरज अमेरिकेला भासत नाही. 

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुका जवळ येतील, त्यापूर्वी इराण व अमेरिका दरम्यान युद्ध होईल काय? असे विचारता डॉ चेगेनी म्हणाले, की काय होईल सांगता येणार नाही. परंतु, इराण सर्वशक्तीनिशी प्रत्युत्तर देईल. इराणमधील दहशतवादी गट मुजाहिदीन ए खल्कने अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व संरक्षण मंत्री जॉन बोल्टन यांना पैसे दिल्याचा जाहीर आरोप केला जात आहे. तो गंभीर असल्याचे राजदूत यांनी सांगितले. 

भारत व इस्त्राईलचे मैत्रीपूर्ण संबंधाबाबत मत विचारता, ते म्हणाले, की दोन्ही स्वतंत्र राष्ट्र आहेत. कुणाशी संबंध ठेवायचे, हे त्यांनी ठरवायचे आहेत. शिवाय हे संबंध इराणविरूद्ध नाही, याची आम्हाला खात्री आहे. "भारत व इराणचे संबंध ऐतिहासिक, परंपरागत आहेत, ते दोन हजार वर्षापासून. पर्शियन भाषेचे भारतात मोठे अध्ययन झाले आहे. त्यातील अनेक शब्द भारतीय भाषात प्रचलित झाले आहेत. भारताच्या साह्याने इराणमध्ये छाबहार बंदर उभारल्यापासून संबंध अधिक दृढ झालेत. त्याच्या पुढील प्रगतीसाठी आमची परराष्ट्र मंत्री डॉ एस.जयशंकर व जहाज मंत्री नितिन गडकरी यांच्याबरोबर अलीकडे बोलणी झाली. या बंदरामुळे भारताला पश्‍चिम व मध्य आशियातील बाजारपेठ उपलब्ध होणार आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com