डेंजरस लिंक्स ओळखायच्या कशा? (भाग-1)

प्रसाद शिरगांवकर
सोमवार, 22 जुलै 2019

डेंजरस लिंक्स ओळखायच्या कशा?
माझ्या मैत्रिणीचं फेसबुक पेज हॅक झालं हे काल सांगितलं. तिला आलेल्या एका मेसेजमधल्या लिंकवर तिनं क्लिक केलं म्हणून ते झालं असावं हेही सांगितलं. तिला आलेल्या मेसेजमध्ये तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा असा सांगून एक लिंक दिली होती. अर्थातच तिनं क्लिक केलं आणि पुढचं रामायण घडलं हेही काल सांगितलं.

डेंजरस लिंक्स ओळखायच्या कशा?
माझ्या मैत्रिणीचं फेसबुक पेज हॅक झालं हे काल सांगितलं. तिला आलेल्या एका मेसेजमधल्या लिंकवर तिनं क्लिक केलं म्हणून ते झालं असावं हेही सांगितलं. तिला आलेल्या मेसेजमध्ये तुमचं अकाउंट व्हेरिफाय करण्यासाठी पुढील लिंक क्लिक करा असा सांगून एक लिंक दिली होती. अर्थातच तिनं क्लिक केलं आणि पुढचं रामायण घडलं हेही काल सांगितलं.

दिवसभरात आपण अनेक कारणांसाठी अनेक लिंक्स क्लिक करत असतो. त्यातल्या खऱ्या कोणत्या आणि खोट्या, फसव्या किंवा डेंजरस कोणत्या हे ओळखायचं कसं?

कोणतीही लिंक (म्हणजे URL) ही अशी दिसते:
http:// example . com / some_path ?some_information

या लिंकचे चार भाग असतात. पहिला HTTP (किंवा HTTPS) हा शब्द. दुसरा भाग म्हणजे डोमेन किंवा वेबसाईटचं नावं (example . com). तिसरा भाग म्हणजे त्या डोमेन किंवा वेबसाईटवरचा विशिष्ट पाथ किंवा पान. आणि चौथा भाग म्हणजे प्रश्नचिन्हा नंतर येणारी काही माहिती. यातले पहिले दोन भाग अत्यंत महत्वाचे!

कोणतीही लिंक क्लिक करताना URLचे पहिले दोन भाग डोळ्यांत तेल घालून बघितलेच पाहिजेत.
URL चा पहिला भाग HTTP किंवा HTTPS. फक्त एका S चा फरक, पण अत्यंत महत्वाचा. यातला S म्हणजे Secured! जेंव्हा लिंकमध्ये फक्त http असतं तेंव्हा आपण पाठवलेली कोणतीही माहिती सुरक्षित नसते. ती अधलामधला कोणीही हॅकर अडवून वाचू शकतो आणि वापरू शकतो. कुठेही कधीही रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन किंवा ऑनलाईन पेमेंट वगैरेसाठी लिंक आली तर ती नुसती http नसून https च आहे का हे आपण तपासलं पाहिजे! आणि ती https असेल तरच क्लिक केलं पाहिजे.

URL चा दुसरा भाग म्हणजे डोमेन नेम (किंवा वेबसाईटचं नाव)

माझ्या मैत्रिणीला मेसेजमध्ये आलेली लिंक अशी होती: http://ow. ly /9wUu30fouF (कृपया ही लिंक क्लिक करू नका!)
आता जर फेसबुकने ही लिंक पाठवली असेल तर URL च्या दुसऱ्या भागात facebook. com किंवा fb. com असायला पाहिजे. पण इथे भलतंच काही तरी नाव आहे (ow. ly). पण घाईघाईत आपण हे नाव वाचत नाही किंवा दुर्लक्ष करतो. URLच्या दुसऱ्या भागातलं नाव, डोमेन नेम किंवा वेबसाईटचं नाव काय आहे हे कोणतीही लिंक क्लिक करायच्या आधी वाचलंच पाहिजे!  

हॅकर्सची सगळी गेम इथे असते. आपल्याला फेसबुक किंवा गूगल (किंवा तुमची बॅंक) यांच्याकडून मेल आलीये असं भासवतात आणि क्लिक करायची लिंक मात्र भलत्याच कोणत्या ठिकाणची असते. ते ठिकाण कोणतं हे URL च्या दुसऱ्या भागात आपल्याला स्पष्ट दिसतं! त्यामुळे कोणतीही लिंक पूर्णपणे वाचल्याशिवाय आणि त्याचे पहिले दोन भाग नीट वाचून त्याचा अर्थ लावल्याशिवाय त्यावर कधीही क्लिक करायचं नाही!

आपल्याला आलेल्या कोणत्याही संदेशामधली कोणतीही लिंक किंवा URL ही अशा पद्धतीनं वाचणं आणि मग ती योग्य का अयोग्य हे ठरवून त्यावर क्लिक करणं हे इतकं तरी आपण केलं पाहिजे. फेसबुक पासून ते आपल्या बॅंक अकाउंट पर्यंत आपलं कोणतही अकाउंट कधीही हॅक होऊ नये यासाठी हे इतकं बेसिक तर आपण केलंच पाहिजे! 

- प्रसाद शिरगांवकर

टॅग्स

इतर ब्लॉग्स