युद्धाच्या कथा युद्ध संपल्यानंतरच मनोरंजक! (भाग -१) 

अमित गोळवलकर
Friday, 26 July 2019

युद्धस्य कथा रम्या...असे म्हटलं जातं! खरंच आहे ते! पण त्या केव्हा? युद्ध संपल्यानंतर!....याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय....आज वीस वर्षे झाली ते युद्ध आपण जिंकल्याला.....कारगिलची लढाई! बरोबर वीस वर्षांपूर्वी १९९९च्या जून महिन्यात दैनिक केसरीचा प्रतिनिधी म्हणून मला कारगिलच्या युद्धभूमीवर जाण्याची संधी मिळाली. तो अनुभव समृद्ध करणारा ठरला.

युद्धस्य कथा रम्या...असे म्हटलं जातं! खरंच आहे ते! पण त्या केव्हा? युद्ध संपल्यानंतर!....याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलाय....आज वीस वर्षे झाली ते युद्ध आपण जिंकल्याला.....कारगिलची लढाई! बरोबर वीस वर्षांपूर्वी १९९९च्या जून महिन्यात दैनिक केसरीचा प्रतिनिधी म्हणून मला कारगिलच्या युद्धभूमीवर जाण्याची संधी मिळाली. तो अनुभव समृद्ध करणारा ठरला.

दिल्लीहून श्रीनगरला विमानाने पोहोचतानाच वातावरणात युद्धाचा 'फील' यायला लागला होता. विमान श्रीनगरच्या विमातळावर पोहोचण्यापूर्वीच एअरहोस्टेसने विमानाच्या सर्व खिडक्या फ्लॅप लावून बंद करायला लावल्या. विमानतळावर बहुदा युद्धसाहित्य घेऊन येणारी विमाने असावीत. विमानतळावर उतरल्यानंतर श्रीनगर शहरात जाताना वातावरणातला तणाव सतत जाणवत होता. माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी विमानातच भेटले होते. ते देखिल युद्धाचे वार्तांकन करणाऱ्या आमच्या चमूत सहभागी होऊ इच्छित होते. एक ज्येष्ठ पत्रकारही सोबत होते. तिघेही टॅक्सीने श्रीनगरच्या १५ कोअर लष्करी मुख्यालयात पोहोचलो. 

आमच्यासारखेच देशभरातून आलेले सुमारे चाळीस पत्रकार तिथे जमले होते. आमची कागदपत्रे, अधिस्वीकृती पत्रे तपासल्यानंतर निघण्याची तयारी सुरु झाली. सुदैवाने धर्माधिकारी यांनाही आमच्या सोबत जाण्याची परवानगी मिळाली. पत्रकारांचे हे पथक कारगिरला घेऊन जाणार होता मेजर पुरुषोत्तम नावाचा हसतमुख अधिकारी. त्यांच्याशी पहिल्याच भेटीत नाळ जुळली होती. दुर्दैवाने पुढच्या एक दोन वर्षांत श्रीनगरच्या लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर पुरुषोत्तम शहिद झाले. 

दोन्ही बसेसनी श्रीनगर सोडल्यानंतर हळूहळू तणाव जाणवायला लागला होता. श्रीनगर - लेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ वरुन हा प्रवास सुर होता. रस्त्यात दर किलोमीटरमागे बंदुकधारी जवान झाडांच्या आडोशाआड उभे असलेले दिसत होते. पुढे काय पहायला मिळणार याची उत्सुकता ताणली जात होती. काही तासांतच उर्वरित काश्मीरला जोडणारा 'जोझिला पास' आला. अत्यंत वळणावळणाचा हा घाट. काश्मीर खोरे आणि द्रासचे खोरे यांना वेगळे करणारा हा घाटरस्ता. समुद्रसपाटीपासूनची उंची ११ हजार ६४९ फूट. अत्यंत छोटा रस्ता. घाटाच्या सुरुवातीला लष्कराला आणि कारगिलला धान्य व अन्य साहित्याचा पुरवठा करणारे ट्रक थांबवून ठेवले होते. लष्करी ताफ्याच्या संरक्षणात हे ट्रक काही तासांच्या अंतरानं कारगिलकडे रवाना केले जात. 

जोझिला पासचा प्रवास संपल्यानंतर घाटाखालीच एक प्रचंड मोठे पटांगण लागलं. तिथं पहिल्या ब्रिफिंगची तयारी होती. लष्कराचे अधिकारी हेलीकाॅप्टरने येऊन पोहोचले होते. समोर शस्त्रांचा, बंदुकीच्या गोळ्यांचा ढीग मांडून ठेवला होता. भारतीय जवानांनी शिखरं काबीज करताना मारलेल्या पाकिस्तानी सैनिकांकडून जप्त केलेला तो शस्त्रसाठा होता. पाकिस्तान भारताशी लढाई करण्यासाठीच लाईन आॅफ कंट्रोलवरच्या शिखरांवर आले आहेत, हे यातून स्पष्टपणे दिसत होतं. पाकिस्तानी सैनिकांची ओळखपत्रं, त्यांच्या डायऱ्या, 'एपलेट' (सैनिकाची रँक दाखवणाऱ्या पट्ट्या), पाकिस्तानच्या नाॅर्दन लाईट इंफंट्रीचे बॅच असं साहित्यही तिथं मांडलेलं होतं. तिथं चहापान करतानाही वातावरणात तणाव होताच. 

पुढे द्रास कँन्टोन्मेंट. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (लाईन आॅफ कंट्रोल) असलेल्या शिखरांवर पाकिस्तानी सैनिकांनी ताबा मिळवला असल्याचा शोध लागला तो इथंच. काही गुराख्यानं या हालचाली पाहिल्या आणि त्यानं द्रास कँन्टोन्मेंटला त्याबाबत माहिती दिली. तिथून सुरु झाली कारगिलची लढाई. सुप्रसिद्ध 'टायगर हिल' याच भागात. द्रास कँन्टोन्मेंटकडे पाठ केली की समोर दिसते टायगर हिल. 'क्रो फ्लाईंग डिस्टन्स' जवळपास पाच किलोमीटरचे. थोडक्यात टायगर हिलवरुन हेवी मशिनगनच्या टप्प्यात द्रास कँन्टोन्मेंट होते. त्या वेळी पाकिस्तानी इतक्या जवळ येऊन पोहोचले होते. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १. अत्यंत महत्त्वाचा रस्ता. या रस्त्यावरच ताबा मिळवून लेह आणि उर्वरित भारत एकमेकांपासून वेगळे करण्याचा डाव पाकिस्तानी खेळत होते. 'त्या' गुराखी पोरांचे डोळे उघडे नसते तर कदाचित हा अनर्थ घडलाही असता.

वाटेत एका ठिकाणी बसेस थांबल्या. खाली उतरुन पाहिलं तर रस्त्याच्या डाव्या बाजूला कारगिल युद्धात ज्यांनी कामगिरी बजावली त्या 'बोफोर्स गन' लाईन आॅफ कंट्रोलच्या दिशेनं आपल्या तोफांच्या नळ्या करुन उभ्या होत्या. सर्वसाधारण पणे सहा तोफांच्या रचनेला 'बॅटरी' म्हणतात. तोफ लोड करण्याचा आदेश सुटला आणि कानाचे पडदे फाटतील अशा आवाजात एका तोफेने थोड्या थोड्या अंतरानं तीन गोळे पाकिस्तानी हद्दीच्या दिशेनं मारले. तोफ उडवली जात असताना तोंड बंद करु नका, उघडे ठेवा नाहीतर आतून दडा बसून कानाचे पडदे फाटतील, ही सूचना आधीच दिल्यानं कानाचे पडदे वाचले. 

पुढच्या प्रवासात ज्या ज्या ठिकाणी बोफोर्स बॅटरी लागली त्या ठिकाणाजवळ आमच्या बसेस पोहोचल्या की किमान तीन तोफगोळे पाकिस्तानच्या दिशेनं मारले जायचे. 'अहो एकदा बोफोर्सचा आवाज ऐकला. सारखा सारखा ऐकवून गोळे का वाया घालवत आहात,' असं आमच्या बसमधल्या एका अगोचरानं मेजर पुरुषोत्तम यांना विचारलंच. मेजरनी फक्त स्मितहास्य केलं आणि म्हणाले, 'हे तुमच्या पुढच्या सुरक्षित प्रवासासाठी आहे. त्याला कव्हर फायर म्हणतात. तुमच्या बसेसच्या दिशेनं पाकिस्तानी सैन्यानं गोळीबार करु नये किंवा तोफगोळे मारू नयेत म्हणून आम्ही त्यांचं लक्ष बोफोर्सचे तोफगोळे मारुन आमच्याकडं वळवतोय,' यावर काय बोलणार! आपले सैन्यदल सीमेवर आपली काळजी घेतं म्हणजे नक्की काय करतं याचाच हा अंगावर काटा आणणारा अनुभव होता! (क्रमश:)

इतर ब्लॉग्स