निसर्गा तू आता सावरायला हवे! (ब्लॉग)

निसर्गा तू आता सावरायला हवे! (ब्लॉग)

घराच्या घट्ट सिमेंटच्या पत्र्याची शेडं जोरजोरात वादळासारखे ताडताड करताय. मी फोनमध्ये कोल्हापूर सांगली वाचतेय. हा पाऊस सतत पडतोय. कुणाला काहीच पत्ता नाही. इतके दिवस झाडाचं एक पान हलत नाही म्हणून बिल्डिंगच्या बिल्डिंग बांधल्यामुळे सगळं झालंय म्हणायचो. पण आज अचानक झाडं सुसाट सुळसुळाट करताय, पत्रे धाडधाड वाजताय, मध्येच कडाडून वीज चमकते त्यात कमीच की काय म्हणून कुठेतरी धाडकन भांडं पडल्याचा आवाज येतो. मी मनातून हादरून जाते, डोक्यात सतत येतं आपण सेफ जागी आहोत का? ही भिंतच अंगावर कोसळली तर? नाहीतर अचानक सगळेच रस्ते पावसा पाण्याने तुंबले तर? पाणीच झिरपल नाही तर?  

एरवी मुकाट्याने बसता बसता म्हणून जायचे, "सगळे वाहून गेले तर किती बरं होईल. सगळी आयुष्याची स्पर्धाच संपेल." पण आज हे हाल बघवत नाही. माणूस कितीही उच्चभ्रू असला तरी तो निसर्गामुळे किती हतबल होऊ शकतो, त्याची कल्पना कुणालाच नव्हती.  कालपर्यंत फक्त लोकांमुळे निर्माण होणाऱ्या हानीला आपण अपेक्षित केलं होतं पण एका वादळाने, एका पावसाच्या संतत धारेने हळूहळू मजाक मस्तीत सुरू झालेली सर जेवढी गंभीर होऊ लागली, आज तिने काय हे रूप धारण केलंय? 

कुठेच लक्ष लागत नाही, इतकं का कुणी रौद्र असतं. लहान मुलाबाळापासून म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत, निष्पाप जीवांपासून मुक्या जनावरांपर्यंत, व्हिडिओ ग्राफरपासून पत्रकारांपर्यंत आणि काल परवा बेफिक्रिने भांडलेल्या आईवडिलांपासून निसर्गाच्या विळख्यात सापडलेल्या प्रियकरापर्यंत अशी एकाच ठिकाणी ठप्प झालेली प्रत्येक व्यक्ती जी तग धरून आहे. लोकांच्या स्वार्थीपणाची शिक्षा आहे म्हणे ही. पण यात निष्पाप जीवही जाताय ना रे. 

नदी नाले स्वच्छ वाहते ठेऊन त्यांचं अस्तित्व राखून आपण निसर्गाचा समतोल राखू शकलो नाही आणि आज प्रशासनापासून सगळ्यांना नावे ठेवत आहे. जेव्हा प्रशासन किंवा कोणताही कंत्राटदार अशा जागा विकत घेतो तेव्हा आपण जागे झालो असतो तर ही परिस्थिती उद्भवली नसती. 

हा पाऊस त्याचं काम करतोय, आपण त्याला अडथळे निर्माण केलेय आपल्या स्वार्थासाठी ! तापमान वाढ (ग्लोबल वॉर्मिग) अशीच होत नाही. समुद्र सपाटीवर हा गरम दाबाचा पट्टा आपण तयार केला. आपण निसर्गाला गृहीत धरले, आपण प्रत्येक हिरवळ कापत गेलो जगाच्या स्पर्धेसाठी.

निसर्ग कधीच आपणहून माणसाच्या वाट्याला येत नाही, जोपर्यंत आपण त्याच्या वाटेत जात नाही...

अजपोहतर तोच तर समुद्र आवडायचा, ते कृष्णेच ममत्व आवडायचं, थोडी गोदामाई जवळ वाटायची, मला जाताना रस्ता भिडे पुलाचाच लागायचा. यांच्याशिवाय माझी कामं अपूर्ण असायची. आज त्यांचा संयम तुटून ते आपल्या घरात शिरले म्हणून का हो किंकाळी फुटते? त्यांच्या अखत्यारीत वस्ती करताना त्यांची आरोळी का आपल्याला ऐकू नाही आली? 

मी आज सेफ म्हणत माणूसच उरत नाही, 

मी सोशल मीडिया नि फोनच्या दुनियेत एका गंभीर पोस्टनंतर लागलीच दुसऱ्या जोकच्या पोस्टवर हाहा होते. 

सगळे म्हणता, पावसाने आता आवरायला हवं, 

खूप झालं आता सावरायला हवं. पण तुम्हीही थोडा विचार करा नि एकमताने ठरवा, त्याने तुमच्या सोयीने का नेहमीच पाडायला हवं? 
तरीही, पावसा... तू माणूस होऊ नको! तू निर्दयी होऊ नको! ...
तू निसर्ग हो, तू मुक्त हो! तुझी दाबलेली कोंडी तू एकदाची फोडली असेल तर आता खरंच आवर घाल! 
माणूस तुझाच अविभाज्य भाग म्हणत त्याला निर्दोष सोड, तू निसर्ग हो शेवटचं! आता बघवत नाही हाल, तू आता आवर, खूप केलं नुकसान, आता माणसांना सावर! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com