सावित्रीनंतर 'कीर्ती सुरेश' बनली दक्षिणेतील 'महानटी'

जयपाल गायकवाड
Friday, 9 August 2019

तेलुगू मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये सध्या आघाडीची अभिनेत्री म्हणून कीर्ती सुरेशला ओळखले जाते. शुक्रवारी ६६ व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली असून यामध्ये कीर्ती सुरेशला 'महानटी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

चित्रपट निर्माते सुरेश कुमार आणि अभिनेत्री मेनका यांच्या कन्या म्हणजे कीर्ती सुरेश होय. कीर्तीने वयाच्या आठव्या वर्षी बालकलाकार म्हणून आपल्या वडिलांच्या निर्मिती असलेल्या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या मल्याळम भाषेतला 'गीतांजली' या हॉरर चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा काम केले होते. मल्याळम नंतर तमिळ चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. तमिळमध्ये आघाडीचा अभिनेता शिवकार्थिकेयन, धनुष, विजय, सूर्या आणि विक्रम यांच्यासोबत मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तेलुगूमध्ये प्रसिद्ध अभिनेता राम पोथीनेनी याच्या सोबत 'नेणू शैलजा' चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि ती तेलुगू इंडस्ट्रीत प्रसिद्ध झाली. त्यानंतर अभिनेता नानी, पवन कल्याण यांच्यासोबतही काम केलं.

कीर्तीसाठी २०१८ वर्ष खूप महत्वाचे होते, यावर्षी 'महानटी' या ७० च्या दशकात दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय असलेली अभिनेत्री सावित्री यांच्या बायोपिक मध्ये मुख्य भूमिका कीर्ती साकारणार होती. त्यामुळे सर्व फिल्म इंडस्ट्रीचे लक्ष या चित्रपटाकडे होते. अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट सुपरहिट झाला आणि कीर्ती सुरेशच्या अभिनयाचे कौतुक झाले. तिच्या मेहनतीचे फळ म्हणजेच आज जाहीर झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.

सावित्री यांच्याबद्दल....
सावित्री दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. त्याकाळी त्यांची प्रसिद्धी एवढी होती की, त्यांच्या चाहत्यांनी "महानटी" नाव ठेवले. दक्षिणेतील प्रेक्षक त्यांच्या अभिनयाबद्दल इतकी खात्री देतात की, आजपर्यंतच्या तमिळ आणि तेलुगू चित्रपटांतील अभिनेत्रींच्या तुलनेत सावित्री या सर्वश्रेष्ट आहेत.

सावित्री यांचा बायोपिक असलेला 'महानटी' हा चित्रपट तेलुगू आणि तमिळ भाषेत तयार करण्यात आला. ९ मे २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'महानटी' चित्रपट पाहण्यासाठी ज्या व्यक्तींनी कधीही सिनेमातगृहात प्रवेश केला नाही. अशा लोकांनी सुद्धा "महानटी" चित्रपट पाहिला असल्याच्या बातम्या येत होत्या. यावरूनच अभिनेत्री सावित्री यांची महानता व लोकप्रियता दिसून येते.

सावित्री यांनी तीन दशकांहून अधिक काळ दक्षिण भारतीय चित्रपटावर अधिराज्य केले. तेलुगू आणि तमिळ सिनेमात सुपरस्टार असलेले शिवाजी गणेशन, एमजीआर, मिथुन गणेश, एनटीआर आणि नागेश्वर राव या दिग्गज अभिनेत्यांसोबत प्रमुख भूमिका केल्या आहेत.

तेलगु आणि तमिळ मध्ये जवळपास 300 चित्रपटात त्यांनी काम केले. फक्त चित्रपटात अभिनयच केला नाहीतर दक्षिण भारतात पहिल्यांदाच चित्रपटाची निर्मिती करणारी महिला म्हणून त्यांचं नाव कोरल गेलं...

सावित्री यांचा जन्म ४ जानेवारी १९३६ ला आंध्रप्रदेशातील गुंटूर येथे झाला, त्यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या वेळी त्या फक्त सहा महिन्याचे बाळ होते. त्यानंतर सावित्री यांच्या आई काकाकडे म्हणजेच कॉमरेड्डी वेंकटरामैया चौधरी यांच्याकडे राहण्यासाठी पाठवले. सावित्री यांच्यामध्ये नृत्य आवड होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय त्या अतिशय सुंदर नृत्य करीत असत..

सावित्री या काकासोबत राहत असताना कोंगरा जग्याहीया या थिएटर कंपनीत नाटक, नृत्य, अभिनय करायचे, त्यानंतर त्यांना चित्रपटाचे वेध लागले मात्र, हे क्षेत्र म्हणजे अयशस्वी होण्याची भीती, धोक्याचा प्रवास, भूमिका मिळेल की, नाही याची शाश्वती नाही. १९५० मध्ये वयाच्या १४ व्या वर्षी अभिनेत्री म्हणून महिला नेतृत्वावर असलेल्या एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली परंतु अति उत्साही प्रयत्नामुळे खूप वेळेस सीन रिटेक करावे लागल्याने ती संधी गेली.

त्यानंतर दुसऱ्या स्टुडिओमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न करीत असताना ती प्रथमच मद्रासच्या जेमिनी स्टुडिओत पोहोचली. तेथे सावित्री यांचे मिथुन गणेशन यांनी काही छायाचित्र काढले होते. मिथुन गणेशन यांनी ओळखले होते की सावित्रीत अभिनेत्रीचे गुण आहेत. परंतु, मद्रासमध्ये चित्रपटात काही काम मिळत नसल्याने निराश होऊन सावित्री परत गावाकडे गेली. काही काळानंतर, मिथुन गणेशन यांनी काढलेले सावित्रीचे छायाचित्र एका मॅगझिनमध्ये छापून आल्यानंतर त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी आमंत्रित केले गेले. घाईघाईने तिथे पण त्यांनी ती संधी गमावली. दिग्दर्शकाने म्हटले होते, "ती चित्रपटासाठी फिट नाही." सावित्री यांची एक सवय होती त्या आव्हानात्मक गोष्टी स्वीकारून त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नसत, त्यांच्याबद्दल लिहण्यासाठी समीक्षकांना विचार करायला लागायचे. 

त्या काळात विजया फिल्म्सची तमिळ चित्रपट क्षेत्रात चलती होती. जो कोणी त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करतो तो एक सुपरस्टार मानला जात असे, सावित्रीने त्याच बॅनरखाली चित्रपटात काम करण्यास चालू केले. "देवदास" मध्ये त्यांनी पार्वतीची (पारु) भूमिका साकारली होती. (१९५३ साली देवदास तमीळ भाषेत प्रदर्शित झाला होता तर दिलीप कुमारचा हिंदी मध्ये १९५५ मध्ये आला होता.) त्यांनी पहिल्या दोन चित्रपटांमध्ये साईड रोल केला. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. भारतात देवदास अनेक भाषांमध्ये तयार झाला परंतु तेलुगूसारखे क्वचितच यश कुणाला मिळवता आले नाही. सावित्रीने या चित्रपटातून लोकांच्या ह्रदयात एक अखंड जागा निर्माण केली होती.

दरम्यान, याच वेळेत सावित्री आणि गणेशन यांच्यात जवळीकता वाढत चालली होती. गणेशनचे आधीच लग्न झाले होते. पण सावित्रीला गणेशन यांच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, परंतु अनेक अडचणी येत होत्या भरपूर त्रास झाल्यानंतर, त्यांनी गपचूप लग्न केले. पण किती दिवस लोकांपासून लपून ठेवणार अखेर ही गोष्ट सार्वजनिक झाली त्यानंतर आई, काका आणि मावशी यांना सोडून सावित्री या गणेशन यांच्या सोबत राहण्यासाठी गेल्या.

लग्न झाल्यानंतर त्यांनी "माया बाजार" मध्ये काम केले. या चित्रपटाने सावित्री यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचवले की, सावित्री तेलुगू प्रेक्षकांच्या हृदयातच होत्या पण त्यानंतर मनामध्ये सुद्धा जागा निर्माण केली होती. त्यांची लोकप्रियता एवढी वाढली की त्यांना आता तेलुगू चित्रपटांमध्ये थांबवणे कुणालाही सोपे नव्हते. त्यानंतर त्यांचे एकामागोमाग चित्रपट हिट होत गेले. अनेक दिग्गज कलाकारांना सावित्रीची कामगिरी पाहून भीती वाटत असे की चित्रपटामध्ये आपल्यापेक्षा तिचे वर्चस्व दिसेल...

सावित्री आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर होती. त्यांनी आपल्या फीमध्ये चांगलीच वाढ केली होती. त्यासोबतच सावित्री यांना प्रतिष्टीत राष्ट्रपिता पुरस्कार, नंदी पुरस्कार, कलीमणी पुरस्कार मिळाले. भारतातील 30 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, त्यांना "महिला चित्रपटांमध्ये" सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी गणेशन हा एक साधा अभिनेता होता. सावित्री यांना दोन मुले होती. जेव्हा त्यांना दुसरा मुलगा झाला होता, तेव्हापासून गणेशन सावित्री यांच्यात दुरावा निर्माण व्हायला सुरवात झाली. सावित्रीची प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढत असताना गणेशनला सावित्रीबद्दल इर्षा निर्माण होऊ लागली यात दोघांत वाद होऊ लागले. सावित्री यांची प्रसिद्धी गणेशनच्या कामगिरीपेक्षा मोठी झाली होती. लोक त्यांना आता सावित्रीचा पती म्हणून ओळखू लागले. दोघात यावरुन अंतर वाढू लागले. दोघांचे संबंधात अंतर इतके विस्तृत झाले की ते एकमेकांपासून विभक्त झाले. सावित्रीला या गोष्टीचा मोठा धक्का बसला यामध्ये त्यांना एकाकीपणा वाढू लागला यातच दारूचे व्यसन लागले. त्याचा परिणाम चित्रपटांवर जाणवू लागला, जवळच्या लोकांनी दगाबाजी सुरु केली त्यात इन्कम टॅक्सची रेड त्यांच्या घरावर पडली. यात त्यांची संपत्ती मोठ्याप्रमाणावर जप्त झाली. राहिलेली बहुतांश संपत्ती अनेक सामाजिक संस्थांना दान करून टाकण्यात आली. त्या काळात त्यांनी अनेक गरजूंना मदत केली, सावित्री यांनी स्वतः बिकट अवस्थेत असताना सुद्धा एका गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी आपली साडी लिलावात विकली होती. शेवटच्या दिवसात त्या अतिव्यसन आणि त्यात शुगर असल्यामुळे त्या १९ महिने कोमात राहिल्या त्यातच त्यांचा मृत्यू २६ डिसेंबर १९८१ रोजी म्हणजेच ४५ व्या वर्षी झाला.

"ज्या देवदास चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती, त्याच देवदास सारखं प्रेमात तडपडून महानटी सावित्री यांचा दुर्देवी अंत झाला.."
 

इतर ब्लॉग्स