इथं वेदनेचा हुंकार कायम आहे!

डॉ. माधव सावरगावे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सध्याच्या महाराष्ट्रातील सर्व विभागातल्या व्यथित करणाऱ्या परिस्थितीवरचा हा धांडोळा

एकीकडे थरकाप उडवणारा महापूर तर दुसरीकडे भयावह आणि भीषण दुष्काळ असं चित्र एकाचवेळी महाराष्ट्रात दिसून येतंय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर या पावसाळी वेदनेचे हुंदके महाराष्ट्रात सगळीकडे जाणवू लागलेत. कोणी म्हणतं आपत्ती व्यवस्थापन सक्षम नाही, कोणी म्हणतं सरकार गंभीर नाही. मात्र, परिस्थिती अधिक गंभीर होतेय. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातचं समाधानकारक पाऊस नव्हता. चातकासारखी पावसाची अख्खा मराठवाडा वाट पाहत होता. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिकं वाळून जात होती. त्याचकाळात कोकणात पावसानं जोर धरला. तसा मुंबई आणि मुंबई उपनगर भागात पावसाने अक्षरशः सर्वसामान्यांना, तितकंच व्यवस्थेला ठोकून काढले. जीवाच्या आकांताने जगणारी तिथली माणसं पूर परिस्थितीला तोंड देत दिवस काढले. पाऊस पडल्यानंतर कुठं मरण येतं का असा सवाल कुणाला विचारला तर कोणीही हो म्हणणार नाही. पण महाराष्ट्रात ते घडतंय. इतकंच नाही तर पाऊस नसताना आणि पाऊस असताना वेदनेचे हुंदके कायम आहेत, हेही दिसून आलं. जीवनमरणाच्या संघर्षात अडकलेल्या माणसाना यातून कोण, कसं, केव्हा बाहेर काढणार हा प्रश्न कायम अनुत्तरीत आहे. 

कोकणातील तिवरे धरण फुटून अठरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हाहाःकार उडाल्यानंतर राजकीय आरोपांची चिखलफेक झाली. त्यांच्या त्यांच्या सोईने. पण मरणारा नाहक गेला आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत मात्र कोणीही नंतर पाहिली नाही. बहुदा महिनाभरापूर्वी घडलेली आपत्ती आता विस्मृतीत गेली असावी. राजधानी मुंबई, मुंबई उपनगरातील माणसं लेट ट्रेनमुळे त्रस्तही झाली. रुळावरच्या पाण्याने रेल्वेचीच नाही तर माणसांच्या जगण्याची अडचण केली. बहुदा हेही राजकीय, प्रशासकीय व्यवस्था विसरली असेल. म्हणत असतील, 'बघू, मुंबईचं स्पिरीट आहे, अडचण आल्यास पुन्हा तोंड देऊ'!

हे असं सगळ्यांच झालंय. आला दिवस ढकलायचा. यांनी त्याच्याकडे तर त्यांनी त्याच्याकडे बोट दाखवून एकमेकांचं 'अवलक्षण' रोखायचं. आता त्यांना विचारण्याची हिंमत कुणाची? पुन्हा मुंबई, कोकण आणि नाशिक जिल्ह्यात पावसानं जोर धरला. नाशिक पाण्यात. तिथे पुन्हा आपत्ती व्यवस्थापनची तीच बोंबाबोंब. चार दिवस चर्चाचर्वणनंतर पाण्याने कूस बदलली. आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात थरकाप उडवला. आठवडाभरापासून पाण्यात असलेली माणसं, बायाबापड्या, चिमुकली लेकरं मरण डोळयांसमोर पाहत आधाराची वाट पाहत होते. आजही पाहतायत. त्यात बोट उलटली. पुन्हा मरणाचा खच. मंत्री आले. विरोधक आले. संस्था आल्या. मरणातून सुटका करणारे सैनिकही आले. पण वेदना काही संपल्या नाहीत. महापुराचा फटका यापूर्वी व्यवस्थेच्या गलथापणा बसला होता, असं कोल्हापूर, सांगलीकरांचं म्हणणं आहे. अलमट्टीचाही विषय समोर आला. आज मोठ्या प्रमाणात सरकार, सरकारी व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था पोहचली. मदतही सुरू आहे. मात्र, ही मदत केवळ कोल्हापूर, सांगली या शहराभोवतालपुरती सध्या तरी दिसते आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठावरील ग्रामीण भागतील पूरग्रस्त अजूनही संकटात कायम आहेत. हे संकट लवकर हद्दपार भाव असं महाराष्ट्राला वाटतंय. तीच प्रार्थना सर्वांची आहे. मदतीचा ओघ सुरू आहे. ती मिळावी. पुन्हा माणूस उभा रहावा. पुन्हा प्रश्न तोच हे कुठंवर?  पाऊस पडला की माणसांचे चेहरे हसमुख होतात. प्राणी पक्षी बागडत असतात. शिवारं हिरवीगार होतात. डोंगररांगा हिरवा शालू पांघरून भुरळ पाडतात. पण अलीकडं सगळं उलटं झालंय. पाऊस आल्यावरही दुःख आणि नसतानाही दुःख.

आज अख्खा मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. पावसाचा टिपूस नसतानाही 'नाशिक'च्या पाण्यानं जायकवाडीची ओटी भरली पण उर्वरित मराठवाडा आजघडीला तहानलेला आहे. बिंदुसरा, मांजरा, येलदरी, तेरणा, माजलगाव, दुधना ही मराठवाड्याची तहान भागवणारे मोठे प्रकल्प. ते मृतसाठ्यांची शेवटची घटका मोजत आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पाऊस पडावा म्हणून महायज्ञ केला. सोयाबीन, ज्वारी, तूर, मका, कापूस जागच्या जागी वाळून जाण्याची वेळ आली आहे. चारा नसल्यानं जनावरांची विक्री आणि चोरट्या कत्तली सुरू आहेत. विभागात दिवसाला ३ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. इथं तर मरण सोपं झालंय बिनापाण्याचं! 

महाराष्ट्रात आज केवळ हुंदके आहेत. पाऊस असतानाही आणि नसतानाही. या हुंदक्यांना मात्र वाट करून देण्यासाठी व्यवस्था नाही. मूकपणे जगावं लागतंय. मूग गिळून गप्प बसावं लागतंय. आजचा दिवस जाण्याची वाट पाहावी लागतेय. उद्याच्या किमान स्वतःच्या तरी चांगल्या दिवसासाठी. दोष केवळ सरकारला देऊन चालणार नाही असंही बोललं जातं. मग सांगा कसं आणि कुठं जगायचं? कायमस्वरूपी दुःखाचा डोंगर कोणी दूर करील का याचा विचारही मनात आहे, याच उत्तर तरी आमच्या हुंदक्यांना मिळेल का असा आर्त सवाल कायम आहे. मग तो मुंबईकरांचा. कोकणवाशीयांचा. समृद्ध पश्चिम महाराष्ट्राचा. आता आताशी विकासाची गती वाढलेल्या विदर्भवाशीयांचा. कारण इथं वेदनेचा हुंकार कायम आहे; वाट पाहतोय तो थांबण्याची!

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या