Kolhapur Flood : बातमीदार पण शेवटी माणूसच असतोय..(व्हिडिओ)

विशाल सवने (साम टीव्ही)
Sunday, 11 August 2019

बातमीदार पण शेवटी माणूसच असतोय..

पूरग्रस्त भागात रिपोर्टिंग करणारे सकाळ-सामचे सहकारी पूरग्रस्तांच्या मदतीतही सहभागी...

थोडं संभाजी आणि सहकाऱ्यांबद्दल...
संभाजी या नावातच अजब रसायन आहे. बस नाम ही काफी है... असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. शिवपुत्र संभाजी यांनी औरंग्याला जेरीस आणला. तो औरंग्या मराठी मातीत संपला पण मराठी मुलूख जिंकता काही आला नाही. आणि आमच्या संभाजीनं पावसाला जेरीस आणलं पाऊस थकला पण ह्यो काळ्या मातीतील रांगडा गडी काय थकायचं नाव घेत नाही. संभाजी म्हणजे संभाजी थोरात. आमचे कोल्हापूर प्रतिनिधी. पठ्ठा कराडचा; कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावचा. गडी कामाला निबार. कंटाळा गड्याच्या रक्तात नाही...

सातारा, सांगली, कोल्हापूरला पावसानं झोडपून काढलंय. आठ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला या भागातलं पाणी ओसरण्याचं नाव घेत नाही. जिल्ह्यांचा संपर्क तुटलाय. त्यात संभाजी कराडचे राहणारे. कराड ते कोल्हापूर रोजचं यांचं अपडाऊन. पावसाचा जोर वाढतोय हे लक्षात येताच यांनी कपड्याची बॅग भरून कोल्हा'पुरा'त वस्ती केली. सकाळी सहा वाजल्यापासून हा गडी  इतर कोल्हापूरकरांसारखा पुरासोबत दोन हात करतोय. नुसतं कामच करत नाही तर अनेकांना मदतदेखील केलीय या माणसानं. मी असाईन्मेंटला बसतो अधूनमधून फिल्डवर असतो, त्यामुळं फिड पाठवणं; तेही वेळेत याला किती महत्त्व असतं हे मला चांगलं ठाऊक आहे. बरं फिड पाठवायला लाईव्ह यू ची सोय असली की उत्तम. पण या माणसाकडं ती पण सोय नाही. मोबाईलवर डब्लू के टी ( वॉकथ्रू) करणं, बाईट करणं, व्हिज्युअल शूट करणं आणि ते पाठवणं हीच काय तेवढी सोय..
 

अनेकवेळा मी संभाजींना काॅल केला आणि म्हणालो, "आहो, ते अमके व्हिज्युअल आहेत का? तमके व्हिज्युअल आहेत का ?" पण हा माणूस जराही त्रस्त न होता हो आहेत देतो किंवा मॅनेज करतो, असं सांगून पुढच्या पाच मिनिटांत बातमी देतो. या माणसाच्या मदतीला पुण्याची, मुंबईची टीमदेखील आलीय. या टीमकडे लाईव्ह यू ची सोय आहे; पण हायवे ठप्प असल्यामुळे आमचे ह्या शिलेदारांना मुख्य शहरापर्यंत जाताना अडचणी येतायत. पण ही मंडळी थांबलेली नाहीत. पुण्याचा अमोल कविटकर आणि सुमीत भोसले, मुंबईची वैदही, तुषार, राकेश आणि अरविंद ही मंडळीदेखील पुराचा, पावसाचा सामना करतायत. दुसरीकडं सातारचे राजे ओमकार कदम आणि सांगली संस्थानचे सुभेदार विजय पाटील हेदेखील पुराच्या पाण्यात संकटासोबत दोन हात करत वार्तांकन करत आहेत.

आमचा विजय तसा अंगानं इतका पैलवान आहे की पावसाच्या दोन थेंबांमधून सहज पलीकडं निघेल पण यानंदेखील पुराचं मैदान मारलंय. रायगडलाही पुरानं दणका दिलाय. महाडमध्ये पाणी भरलंय. जनजीवन ठप्प झालंय. तिकडचा आमचा प्रतिनिधी दिनेश पिसाटचं पुरामुळं नुकसान झालंय. संपूर्ण घरात पाणी शिरलंय. घर सावरत चिखलगाळ काढत हा माणूस 'कणा' कवितेतल्या नायकासारखा ताठ उभा आहे. तब्बेतीची काळजी नाही जेवणाच्या वेळा नाहीत पण बांधिलकी बातमीसोबत आहे. या मंडळींकडून शिकण्यासारखं खूप आहे.

मगाशी म्हटल्याप्रमाणं ही व्यक्ती (संभाजी)सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 एक पर्यंत पुराच्या पाण्यात पडणाऱ्या पावसात भिजत काम करतो, सोबतीला सचिन कॅमेरापर्सनही भिजत काम करतो पण या मंडळींची कोणतीही तक्रार ऐकली नाही किंवा ही मंडळी असंही म्हटलेलं ऐकलं नाही की, 'जरा थांबा की थोडं जेवण तरी करतो '. बरं ही मंडळी जेवतात तरी का? 

ओ सर, तुम्ही नसाल जेवत तर जेवत जावा...तब्बेतीची काळजी घ्या; हे सगळं पोटासाठी आणि तब्बेतीसाठी करतो आपण. तेच दुर्लक्ष केलं तर कसं चालेल? 

आणि महत्त्वाचं तेवढं राहिलं पावसाला सांगा, कृष्णा- कोयनेचं अन् आता पंचगंगेचं पाणी प्यालोय असा थकायचो न्हाई..

इतर ब्लॉग्स