गणेशोत्सव 2019 : आगमण गणरायाचे

नेहा निखील गोसावी
Wednesday, 28 August 2019

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. भाद्रपद चतुर्थीला. रक्तवर्णीय एकदंत.. एका हातात पाश नि दुसऱ्या हातात अंकुश घेऊन, भक्तांच्या रोजीरोटीची व्यवस्था करणाऱ्या प्रसादाचा एक हात आणि भक्तांना वरदान देणारा अभयमुद्रेचा दुसरा हात घेऊन.... 

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे. भाद्रपद चतुर्थीला. रक्तवर्णीय एकदंत.. एका हातात पाश नि दुसऱ्या हातात अंकुश घेऊन, भक्तांच्या रोजीरोटीची व्यवस्था करणाऱ्या प्रसादाचा एक हात आणि भक्तांना वरदान देणारा अभयमुद्रेचा दुसरा हात घेऊन.... 

गणपती बाप्पा म्हटले की एक वेगळाच उत्साह संचारतो. लहानपणी फारच मजा यायची. आमच्या विदर्भातला तो काळच वेगळा होता. आशा भोसलेंच्या "मारी हिवडा में नाचे मोर' किंवा फाल्गुनी पाठक यांच्या "मैंने पायल है छनकाई'वर काही मुलींचा 15 दिवस आधीपासूनच सराव सुरू व्हायचा. सामान्य ज्ञान, चित्रकला, हस्ताक्षर, रामरक्षा पठण, गीता पठण या स्पर्धांमध्ये अतिहुशार व्यक्ती जन्माला यायचे. खरी मज्जा यायची ती संगीत खुर्ची, अंताक्षरी अशा अतरंगी कार्यक्रमात. 

आता पुण्यातले गणेशोत्सव म्हणजे विषयच नाही... पण हळूहळू ती लहानपणीची उत्सुकता कॉलनी किंवा सोसायटीच्या गणेशोत्सवात कमी होताना दिसतेय; पण काहीही असो, संख्येने कमी का असेना, उत्साही आणि संस्कृती जपणाऱ्या लोकांमुळे उच्चभ्रू सोसायटीमध्ये गणेशोत्सव अजूनही साजरे होताना दिसतात. हेच उत्साही लोकं एकत्र येऊन जन्माला येतं ते मंडळ. अनेक जवाबदाऱ्या अंगावर घेत आपला व्यवसाय आणि नोकरी सांभाळून हिरिरीने त्यात उतरतात. 

सुटीच्या दिवशी सोसायटीखाली जमलेला कॅज्युअल कपड्यांमध्ये असलेल्या पुरुषांचा घोळका, त्यातल्या एखाद्याच्या हातात वही-पेन आणि सोबतच दुसऱ्याच्या हातात पावती पुस्तकं असलेले दिसले की ओळखावं, गणपतीची वर्गणी वसुली करण्याचं काम चालू झालं आहे. तेवढीच जास्त जबाबदारीची कामे इतर मंडळींचीही. गणेशमूर्ती निवडण्यापासून ते महाप्रसादापर्यंत सगळीच लगबग. त्यातही जितका सहभाग पुरुषांचा तितकाच महिलांचासुद्धा.. यांच्याशिवाय मज्जा नाही. पूजेची तयारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठमोठ्याला रांगोळ्या यांच्याशिवाय गणपती नाहीच... 

काहीही म्हणा, पण गणेशोत्सवाच्या विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेणारे असोत किंवा नसोत, तुमची या बाप्पावर श्रद्धा असेल किंवा नसेलही, पण टिळकांच्या स्वप्नातला गणेशोत्सव साकार होण्यासाठी, सगळे एकत्र येण्यासाठी, एकमेकांना ओळखून घेण्यासाठी तरी सगळ्यांनी थोडासा खारीचा वाटा उचलावा. आपापसांतील क्‍लेश, मतभेद बाजूला ठेवून त्या दहा दिवसांच्या पाहुण्याचा यथोचित पाहुणचार करावा. निदान कार्यक्रमांना तरी उपस्थित राहावं म्हणजे खरी भारतीय परंपरेतील "एन्जॉयमेंट' काय असते ते कळेल. नंतर काय... संपूर्ण वर्ष पडलंय स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी. 

इतर ब्लॉग्स