आफ्रिकेचे 'बायबल'

विजय नाईक
Friday, 27 September 2019

आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी, झिंबाबवेमधील व्हिक्‍टोरिया फॉल्स, इजिप्तमधील पिरॅमिड्‌स, जगातील सर्वात महाकाय नाईल, कॉंगो या नद्या, नायजेरियातील बोको हरम, सोमालियातील चाचे व दहशतवादी अल शबाब, युगांडातील हुकूमशहा इदी अमीन, लीबियाचा कर्नल गद्दाफी, हे डोळ्यापुढे तरळते.

आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी, झिंबाबवेमधील व्हिक्‍टोरिया फॉल्स, इजिप्तमधील पिरॅमिड्‌स, जगातील सर्वात महाकाय नाईल, कॉंगो या नद्या, नायजेरियातील बोको हरम, सोमालियातील चाचे व दहशतवादी अल शबाब, युगांडातील हुकूमशहा इदी अमीन, लीबियाचा कर्नल गद्दाफी, हे डोळ्यापुढे तरळते. त्याचबरोबर, आफ्रिकेतील उत्तुंग नेते नेल्सन मंडेला, अल्बर्ट लुथुली, डेसमंड टुटू, ज्युलियस न्येरेरे, केनेथ कौंडा, सॅम नुजोमा, जोनास साविम्बी, लिओपोल्ड सेंघार,पॅट्रीस लुमुंबा यांची व त्यांनी वसाहतवादाविरूद्ध दिलेल्या लढ्याची आठवण होते. महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाची सुरूवात दक्षिण आफ्रिकेतून झाली. त्याचाच प्रयोग त्यांनी भारतात परतल्यावर स्वातंत्र्य लढ्यात केला. आफ्रिकेतील वसाहतवादाच्या क्रूर वागणुकीकडे पाहाता, गांधीजींचे अनुयायी असूनही नेल्सन मंडेला व अन्य नेत्यांना वसाहतवादाविरूद्ध सशस्त्र लढा द्यावा लागला. मंडेला यांनी त्यासाठी (उमखुंटो वी सीझ्वे-स्पिअर ऑफ द नेशन) ही संघटना उभारली होती. आफ्रिकेला "डार्क कॉंटिनेन्ट" म्हटले जाते, त्यामागे श्‍वेतवर्णियांची वंश व रंगभेदाची कूट निती आहे. क्वामे एन्क्रुमा यांनी गांधींजींच्या सत्याग्रहाचे अनुकरण केले. 

"सायंटिफिक अमेरिकन" नुसार, आफ्रिका हे चीन, भारत, अमेरिका व युरोप यांच्या एकत्र क्षेत्रफळापेक्षा मोठे (30.4 दशलक्ष चौरस कि.मी) खंड आहे. त्यात 54 राष्ट्र असून, त्यांच्या वसाहतवादाचा इतिहास, स्वातंत्र्योत्तर परिस्थिती, राजकीय, सामाजिक व आर्थिक स्पंदने यांचा अतिशय उद्बोधक व वाचनीय धांडोळा घेण्याचे मोलाचे काम प्रा. राजेन हर्षे यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या " "आफ्रिका इन वर्ल्ड अफेअर्स- पॉलिटिक्‍स ऑफ इम्पेरियलिझम, द कोल्ड वॉर अँड ग्लोबलायझशन" या ग्रंथात केले आहे. प्रा.हर्षे हे अलाहाबाद व हैद्राबाद विश्‍वविद्यापिठाचे माजी कुलगुरू व अलाहाबादच्या जी.बी.पंत सोशल सायन्सेस इन्स्टिट्यूटचे विद्यमान अध्यक्ष होत. 

आफ्रिकेला ब्रिटिश, फ्रेन्च, पोर्तुगीज, स्पेन, इटली व बेल्जियम या पाश्‍चात्यांच्या वसाहतवादाचा प्रदीर्घ इतिहास आहे. त्यातील बव्हंश काळ गुलामगिरीने पिचलेल्या लोकसंख्येचा, वसाहवाद्यांनी निरनिराळ्या लढ्यात कृष्णवर्णियांचा सैनिक म्हणून वापर केल्याचा, आफ्रिकेतील खनिज संपत्तीची लूट केल्याचा, वसाहतवाद संपल्यानंतरही नव वसाहतवादांची अंमबजावणी करण्यासाठी केलेला शिरकाव, आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीला सत्तेवर बसविण्यासाठी साम,दाम,दंड व भेद यांचा केलेला वापर, याचे भेदक चित्र व वर्णन या ग्रंथात वाचावयास मिळते. 

जगाचे लक्ष आजही आफ्रिकेवर आहे, ते तेथील खनिज तेल, युरेनियम व दुमिळ धातू यांच्या साठ्यांमुळे. प्रा.हर्षे म्हणतात, की आफ्रिकेच्या19 व्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या प्रारंभी दृष्टीक्षेप टाकल्यास पाश्‍चात्य राष्ट्रांनी कसे अधिपत्य केले, ते दिसून येते. ब्रिटिशांनी पश्‍चिम आफ्रिकेतील गोल्ट कोस्ट (घाना), नायजेरिया, सिएरा लिओन, पूर्व आफ्रिकेतील टांगानिका (टांझानिया), दक्षिण व उत्तरेतील ऱ्होडेशिया, मध्य आफ्रिकेतील झिंबाबवे, झांबिया,मलावी व दक्षिण आफ्रिकेत वसाहती उभ्या केल्या. गिनी, माली, अपर व्होल्टा (बुर्कीना फासो), सेनेगल, नायजर, बेनिन, मौरितानिया व विषुवृत्तीय आफ्रिकेतील टोगो, कॉंगो (ब्राझिव्हिले), गॅबन,छाड व काही प्रमाणात हिंदी महासागरतील मॅडॅगास्कर व हॉर्न ऑफ आफ्रिकेनजिकच्या जिबुती व उत्तर आफ्रिकेतील अल्जेरिया, ट्युनिशिया व मोरक्को या देशांवर फ्रेन्चचे साम्राज्य होते. पोर्तुगालच्या नियंत्रणाखाली अंगोला, मोझांबिक, गिनी बिसाऊ, साव टोम, प्रिन्सिपे, केप वार्दे हे देश व बेटे होती. कॉंगो (डीआ कॉंगो), रूआंडा, बुरूंडी या बेल्जियमच्या वसाहती, तर एरित्रिया, इटालियन लीबिया, सोमालियाचा काही भाग व इथिओपिया या इटलीच्या, तर पश्‍चिम सहारा, रिओ मुनी व स्पेनच्या वसाहती होत्या. काही काळासाठी टोगो, कॅमेरून, टांगानिका व नामिबियावर जर्मनीची सत्ता होती. या तपशीलावरून पाश्‍चात्यांनी आफ्रिकेची केलेली वाटणी दिसून येते. त्या काळात अमेरिका, भारत,चीन या देशांची आफ्रिकेत कुठेही वसाहत नव्हती. सर्व वसाहतवाद्यांविरूद्ध त्या त्या देशात स्वातंत्र्यासाठी लढे झाले. त्यातील अनेकाना भारताने पाठिंबा दिला. 

भांडवलशीही वसाहतवादाविरूद्ध संघर्षाला चालना दिली, ती फ्रान्ट्‌झ फॅनन, ऍमिकाल कब्राल, डु बॉइस, मार्कस गार्व्हे, अली माझरूई या क्रांतिकारी विचारवंतांनी. त्यांनी आपल्या लिखाण, भाषणातून व कृत्यातून गुलामगिरी व अत्याचाराला कडाडून विरोध करण्याची शिकवण दिली. अमेरिकेत मार्टीन ल्युथर किंग यांनी रंगभेदाविरूद्ध संघर्ष चालविला होता. त्याचे पडसाद आफ्रिकेत पडत होते. हर्षे म्हणतात, ""तब्बल तीन शतके गुलामांचा व्यापार सुरु होता. त्या काळात सत्तर दशलक्ष आफ्रिकन जगात गुलाम म्हणून विकले गेले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडलेल्या घटनेचा उल्लेख विरळाच आढळतो. मानवी व्यापार व ऍफ्रो-अमेरिकन समाजाचा गुणात्मक अभ्यास व छाननी होण्याची गरज आहे."" ""आपण कृष्णवर्णीय आहोत, आणि ती अभिमानाची बाब आहे (नेग्रिट्यूड),"" हा विचार कृष्णवर्णीयात रूजवला तो लिओपोल्ड सेदार सेंघार (कवि व सेनेगलचे अध्यक्ष), मार्टिनिकचे लेखक एमी सिसायर व फ्रेन्च राजकीय नेते व कवि लिऑन ग्रॉन्टन दामास यांनी. सिसायर यांच्यामते, "" द आयडिया ऑफ द बार्बारीक निग्रो, इज ए युरोपियन इन्व्हेन्शन."" त्रिनिदादमध्ये जन्मलेले व एन्क्रूमा (घानाचे अध्यक्ष) यांचे सल्लागार, जॉर्ज पॅडमोर हे प्रसिद्ध कृष्णवर्णीय विचारवंत होते. त्यांनी "कृष्णवर्णीयांचा राष्ट्रवाद" या संकल्पनेला मूर्त रूप दिले. लायबेरिया व इथिओपिया यांनी स्वातंत्र्य टिकवून ठेवले, याची ती नेहमीच वाखाणणी करीत. हर्षे म्हणतात, की जगात कुठेही गेले, तरी कृष्णवर्णीयांना जीवनात केव्हा न केव्हा वंशभेदाचा अनुभव येतो. उलट, कृष्णवर्णीयांनी वसाहतवाद्यांबाबतही मन मोठे ठेवले व रक्तपात टाळला. उदा. दक्षिण ऱ्होडेशियातील ( झिंबाबवे) आयान स्मिथ यांची सत्ता 1970 च्या अखेरीस संपुष्टात आली, तेव्हा त्यांना कोणत्याही चौकशीला सामोरे जावे लागले नाही. या उलट अध्यक्ष रॉबर्ट मुगाबेंच्या कारकीर्दीत स्मिथ संसदेचे सदस्य झाले. 1993-94 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वसाहतवाद संपुष्टात येऊन अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे सरकार आले, ते प्रथम कृष्ण व श्‍वेतवर्णीयांचे (गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल युनिटी) संयुक्त सरकार होते. त्यात माजी श्‍वेतवर्णीय अध्यक्ष एफ.डब्ल्यू.डी.क्‍लर्क हे उपराष्ट्राध्यक्ष होते. मंडेला व त्यानंतर आलेल्या सरकारमध्येही श्‍वेतवर्णीयांना मंत्रिपदे देण्यात आली. याचा अर्थ वसाहतवादाच्या काळात सत्ताधारी श्‍वेतवर्णीय कृष्णवर्णीयांशी कितीही निर्दयपणे वागले असले, तरी तसा आकस कृष्णवर्णीय नेत्यांनी ठेवला नाही, ही बाब अत्यंत महत्वाची व त्यांच्या माणुसकीची व प्रगल्भतेची साक्ष देते. अनवर सादात, राल्फ बुंचे, अलर्ब्ट लुटुली, देसमंड टुटू, नेल्सन मंडेला यांना शांततेसाठी मिळालेल्या नोबेल पारितोषकांचा उल्लेख म्हणूनच महत्वपूर्ण ठरतो. 

""आफ्रिकेतील स्वातंत्र्यलढ्याचे दोन प्रकार आहेत. पहिला वसाहतवादाच्या विरोधातला व दुसरा वंशभेदाविरूद्धचा,"" असे नमूद करून प्रा. हर्षे यांनी निरनिराळया राजकीय पक्ष, त्यांच्या संघटना यांनी उभारलेल्या लढ्यांची माहिती दिली आहे. तसेच "ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी (ओएयू)" चे कार्य व तिच्या मर्यादा यांचा उल्लेख केला आहे. आफ्रिकेकडे पाहाता, वसाहतवादानंतर आलेल्या काही नेत्यांत मानवी हक्कांबाबत असलेला तिरस्कार व बंदुकीच्या साह्याने सत्ता कायम ठेवण्याकडे वाढती प्रवृत्ती यांचे दर्शन होते. तसेच, वसाहतवाद संपुष्टात आला, तरी आफ्रिकेतील अनेक देश आजही पश्‍चिमेकडे दृष्टी ठेवण्यातच धन्यता मानतात, हा विरोधाभास नजरेत भरतो. वसाहतवादाच्या काळात रशियातील साम्यवाद व कार्ल मार्क्‍स व एन्जल्स आदींचा पगडा आफ्रिकेतील नेत्यांवर होता. त्यामुळे, तसेच वेगवेगळी शासनप्रणाली अंमलात आणल्याने आफ्रिका खंडात आजही ऐक्‍याचे चित्र दिसत नाही. तथापि, आफ्रिकेतील जवळजवळ निम्या (सुमारे 26) राष्ट्रांत लोकशाही प्रणाली असून, त्यात दक्षिण आफ्रिकेसह, आयव्हरी कोस्ट, झायर, बेनिन, केनिया, घाना, सेनेगल, कॅमेरूनमध्ये रीतसर निवडणुका होतात. आफ्रिकेचे ऐक्‍य साधण्यासाठी 2020 मध्ये आफ्रिका युनियनने आफ्रिका खंडातील सर्व देशात एक पासपोर्ट पद्धती अंमलात आणण्याची योजना तयार केली आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे, द नेदरलॅंड्‌समधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयापुढे सुदानचे अल बशीर, केनियाचे उहुरू केन्याटा, जाण्याचे अनेक आफ्रिकन नेत्यांनी नाकारले आहे. तेथेही श्‍वेतवर्णीयाकडून न्याय मिळणार नाही, अशी शंका त्यांना आहे. 2004 पासून आफ्रिकन युनियनच्या विद्यमाने आफ्रिकेचे स्वतंत्र मानवाधिकार न्यायालय चालू असून त्याकडे तक्रारी नोंदविण्याची सोय आहे. 

"एक्‍सप्रेसिंग फ्रेन्च निओकोलोनियल डॉमिनन्स" या प्रकरणात प्रा.हर्षे यांनी फ्रेन्च वसाहतवादापासून मुक्ती मिळाल्यावरही फ्रान्सच्या राजकीय व सांस्कृतिक प्रभावाखाली असणाऱ्या देशाबाबत लिहिताना म्हटले आहे, की जगातील एकूण 29 फ्रॅंकोफोन राष्ट्रांपैकी तब्बल 21 देश आफ्रिकेतील आहेत. पहिल्या महायुद्धात फ्रान्सने आफ्रिकेतून साडे चार लाख सैनिकांना युद्धभूमीवर धाडले होते. त्यातील 1 लाख 80 हजार आफ्रिकन सैनिक फ्रान्सच्या स्वातंत्र्यासाठी लढले. फ्रान्सचे माजी अध्यक्ष जनरल डी गॉल, यांच्यानंतर आलेल्या जॉर्ज पॉंपिडू, गिस्कार्ड डइस्टॅंग, फ्रॅंको मित्तरॉं, निकोलस सार्कोझी, फ्रॅंको ओलांद या अध्यक्षांनी आफ्रिकेवर आपला पगडा कायम ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. वेळप्रसंगी तेथील फ्रान्सधार्जिण्या सत्ताधाऱ्यांना वाचविण्यासाठी सेनेगल, गॅबन, छाड, मौरितानिया, झाईर, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, टोगो, कॅमेरून, रूआंडा, जिबुती, बेनिन, माली या राष्ट्रात सेनाही धाडली आहे. 

1898 ते 1946 दरम्यान फिलिपीन्स अमेरिकेची वसाहत होती. परंतु, भांडवलशाही असूनही युरोपीय देशाप्रमाणे अमेरिकेने, आफ्रिका व अन्यत्र वसाहती स्थापन केल्या नाही. पण, पोर्तुगालमध्ये सालाझार व स्पेनमध्ये जनरल फ्रॅंको या हुकूमशहांना पाठिंबा दिला. तसेच, पनामामध्ये इमॅन्युएल नोरिएगा, फिलिपीन्समध्ये फर्डिनांड मार्कोस, पाकिस्तानामध्ये साऱ्या हुकूमशाहांना सक्रीय साथ दिली. लोकशाही प्रस्थापित करण्याच्या नावाखाली इराक व लीबिया व अर्जेंटिनात सत्ता पालट केला. त्यासाठी युद्धही पुकारले. प्रा.हर्षे यांच्यामते, एकाधिकारशाही मिश्रित भांडवलशाहीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सिंगापूर, इटली,जर्मनी, दक्षिण आफ्रिकेत पाहावयास मिळातात. 1960 नंतर अमेरिकेचा आफ्रिकेत प्रवेश झाला व अमेरिकेने व्यूहात्मक गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. शेवरॉन, मोबिल, शेल, एल्फ ऍक्विटेन या कंपन्यांनी खनिज तेल क्षेत्रात गुंतवणूक केली. 

अमेरिका व अन्य युरोपिय देशांना चीन आज शह देऊ पाहात आहे. बऱ्याच प्रमाणात तो सफल झाला आहे. याचे महत्वाचे कारण आफ्रिकेतील देशात हुकूमशाही आहे, राजेशाही की अन्य कोणतीही प्रणाली असो, चीनने मोठ्या प्रमाणावर अर्थसाह्य देण्याचा सपाटा चालविला असून, जगाला दृष्यमान होतील, असे कळीचे प्रकल्प चीन हाती घेतले आहेत. तेथील मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडे चीन डोळेझाक करीत आहे. 1971 मध्ये चीनचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला, तेव्हा चीनच्या सदस्यत्वाला पाठिंबा देणाऱ्या 76 देशापैकी 26 देश आफ्रिकेतील होते. 2018 च्या आकडेवारीनुसार चीन व आफ्रिकेच्या व्यापाराचे प्रमाण 204.19 अब्ज डॉलर्स झाले आहे. भारताने मात्र क्षमतावृद्धीचे अनेक प्रकल्प आफ्रिकेत हाती घेतले असून, भारत आफ्रिका व्यापाराचे प्रमाण 2017-18 मध्ये 62.66 अब्ज डॉलर्स होते, ते 150 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. प्रा.हर्षे यांनी दोन्ही राष्ट्रांच्या आफ्रिकेतील भूमिकेकडे दोन स्वतंत्र प्रकरणातून पाहिले असून, भारत-आफ्रिका शिखर परिषदांच्या माध्यमातून भारताने आफ्रिकेतील आपला प्रभाव वाढविण्याचे कार्य हाती घेतले आहे, असे दिसते. साम्यवादी चीन व लोकशाहीवादी भारत याकडे आफ्रिका आज आशेने पाहात आहे. येत्या काही वर्षात जगातील आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या दिशेने आफ्रिकेची वाटचाल होईल, असा निष्कर्ष प्रा.हर्षे यांनी काढला आहे. सर्वार्थाने त्यांचा हा ग्रंथ " आफ्रिकेचे बायबल" आहे. ""आजवर दुर्लक्षिलेल्या या खंडाकडे जगाचे लक्ष वेधले असून, त्याचे महत्व वाढत जाणार,"" असे त्यांना वाटते. आफ्रिका व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अध्ययन करणाऱ्या प्रत्येकाला या ग्रंथाचे वाचन व चिंतन अत्यावश्‍यक आहे. प्रा.हर्षे यांनी ग्रंथाचे लिखाण अशा पद्धतीने केले आहे, की तो वाचताना टप्प्याटप्प्याने आफ्रिका आपल्या मनःचक्षूपुढे उलगडत जातो व "डार्क कॉन्टिनेन्ट" कडे आपण "कॉन्टिनेन्ट ऑफ ग्रेट होप अँड प्रॉमिसेस" या वेगळ्या दृष्टीने पाहू लागतो. 

"आफ्रिका इन द वर्ल्ड अफेअर्स- पॉलिटिक्‍स ऑफ इम्पेरियलिझम, कोल्ड वॉर अँड ग्लोबलायझेशन" 
प्रकाशक -राऊटेज टेलर अँड फ्रान्सिस ग्रूप, (साऊथ एशिया एडिशन) 
पृष्ठसंख्या 235, हार्डबाऊंड किंमत. रू. 995. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या