पर्सेप्शन निर्मितीचे प्रयोग !

पर्सेप्शन निर्मितीचे प्रयोग !

घटना मोडल्या जातात. तोडल्या जातात. थोडे सत्य, थोडे असत्य, थोडी तथ्ये, थोडी अतिशयोक्ती आणि मग त्याला अजेंड्याची फोडणी. त्याच्या बातम्या होतात. त्या बनविल्या जातात आणि मग आपल्याला ‘बनविले’ जाते. आपल्याला त्याचा पत्ताही नसतो. कळतही नाही ते अनेकदा. पण हे सारे चाललेले असते आपल्यासाठीच. आपल्यात काही समज-गैरसमज रुजविण्यासाठी. आपली मते तयार करण्यासाठी. विशिष्ट गोष्टींची हवा तयार करण्यासाठी. हा असतो पर्सेप्शन - लोकानुबोध - निर्मितीचा खेळ.

आणि आपल्यासारख्या लाखो जबाबदार, सुशिक्षित नागरिकांना वाटते, की आपण बातम्या वाचतो. त्या समजून घेतो. डावे-उजवे, योग्यायोग्य अशा सगळ्याचा विचार करतो आणि मग आपले मत वा भूमिका तयार करतो. खरेच ते तसे असते का? की याहून काही वेगळेच घडत असते आणि आपण कठपुतळ्या असतो? 

हे अनेकांना मान्यच नसते, की आपण या लोकानुबोध निर्मितीच्या खेळातील फक्त प्यादी असतो. मुळात असा काही खेळ असतो हेच अनेकांना पटत नसते. त्यांना वाटते, आपण शिकलेलो. विद्यापीठाची पदवी वगैरे आहे आपल्याकडे. शिवाय आपण अनुभवी. वाचन तर आहेच आपले भरपूर. आपण वृत्तपत्रे वाचतो, कालिके वाचतो, कथा-कादंबऱ्या-अललित असे बरेच काही वाचतो. झालेच तर सायंकाळी कामावरून परतल्यानंतर तर आपला बहुतेक वेळ दूरचित्रवाणीसमोरच तर जातो. जोडीला फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि इन्स्टाग्राम हे आहेच. यातून नाना प्रकारची माहिती ग्रहण करीत असतो आपण. तिचे विश्‍लेषण करतो आपण आणि मग त्यातून आपले मत तयार करतो. असे असताना आपल्याला कोण बरे बनवू शकेल? त्यांना वाटते, लोकानुबोध हा लोकांच्या शहाणपणाचा भाग असतो आणि अखेर "पब्लिक' तर सारेच काही जाणते! ही अशी सारी मंडळी प्रोपगंडाकारांना फार प्रिय असतात. त्यांच्या जीवावरच तर प्रोपगंडा फोफावत असतो. लोकानुबोधाची निर्मिती होत असते. ती कशी होते हे नीट समजून घ्यायचे असेल, तर प्रथम आपल्या डोळ्यांवरचा पक्षीय चष्मा काढून ठेवा. राजकीय विचारांना बाजूला ठेवा आणि हे ताजे प्रकरण पाहा. ते आहे राहुल गांधी यांच्या ‘रेप इन इंडिया’ या विधानामुळे निर्माण झालेल्या वादंगाचे. 

त्याचा सर्व घटनाक्रम पाहा. 
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत ९ तारखेला मंजूर झालेले आहे. आता त्यावरून आणि बलात्कार प्रकरणांवरून वातावरण तापलेले आहे. ९ तारखेलाच राहुल गांधी यांनी बलात्कार प्रकरणांवरून झारखंडमधील सभेतच मोदी सरकारवर टीका केलेली आहे. १० तारखेला तर भर लोकसभेत कॉंग्रेस नेते रेप इन इंडियाकडे देश चाललाय असे म्हणालेले आहेत. त्यावरून कोणीही काही बोललेले नाही. ११ तारखेला विधेयक राज्यसभेत मंजूर झालेले आहे. ईशान्येतील राज्ये पेटलेली आहेत. देशभरात अन्यत्रही या कायद्याच्या विरोधात रान पेटलेले आहे. त्यामुळे सरकार अडचणीत आलेले आहे. 

अशात १२ तारखेला राहुल यांनी रेप इन इंडिया या टीकेचा पुनरुच्चार केला. झारखंडमधील त्या सभेची ध्वनिचित्रफित उपलब्ध आहे. त्यावरून समजते, की देशाची आर्थिक स्थिती, बेरोजगारी, शेतकरी समस्या यांबरोबरच या सभेत त्यांनी महिलांवरील वाढत्या अत्याचारांवरून मोदी सरकारला धारेवर धरले. त्यांचे नेमके शब्द होते, ‘नरेंद्र मोदींनी म्हटले होते - मेक इन इंडिया. आता आपण कुठंही पाहा - मेक इन इंडिया नाही भैया, आता आहे रेप इन इंडिया. कुठंही पाहा. वर्तमानपत्रं उघडा... झारखंडमध्ये महिलेवर बलात्कार. उत्तर प्रदेशात पाहा, मोदींच्या आमदाराने महिलेवर बलात्कार केला. मग गाडीचा अपघात झाला. प्रत्येक राज्यात रोज रेप इन इंडिया. मोदी म्हणतात - बेटी पढाओ, बेटी बचावो. पण मोदीजी, तुम्ही हे नाही सांगितलं, की कुणापासून वाचवायचं?... भाजपच्या आमदारापासून वाचवायचं आहे...’ 

कुणालाही त्यात वावगे वाटावे असे काहीही नव्हते. अधीररंजन चौधरी तसे म्हणाले तेव्हाही त्यात कुणाला काही आक्षेपार्ह दिसले नव्हते. किंबहुना नरेंद्र मोदी यांनी एकदा दिल्लीला रेप कॅपिटल - बलात्काराची राजधानी - असे संबोधले होते, तेव्हाही लोकांनी त्याचा मथितार्थ तेवढा ध्यानात घेतला होता. पण आता वातावरण वेगळे होते. सरकारविरोधी वातावरण बनू लागले होते. अर्णब गोस्वामी यांच्यासारखे मोदीसमर्थक पत्रकारसुद्धा नागरिकत्व कायद्याच्या विरोधात बोलू लागले होते. यातून मार्ग काढणे आवश्‍यक होते. वेगळाच लोकानुबोध - पर्सेप्शन - निर्माण करणे गरजेचे होते. 

अशा वेळी प्रोपगंडाशास्त्रातील एक तंत्र हमखास वापरले जाते. त्याला म्हणतात - फोर डी. डिसमिस, डिस्ट्रॅक्‍ट, डिस्टॉर्ट आणि डिस्मे. भाजपच्या रणनितीकारांनी हेच तंत्र उपयोगात आणल्याचे दिसते. 

सर्वांत प्रथम त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला. संसदेचे अधिवेशन सुरूच होते. लोकसभेत त्या हल्ल्याचे नेतृत्व केले केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी. त्या म्हणाल्या, ‘एक पार्टी का नेता सार्वजनिक तौरपर क्‍लॅरियन कॉल देता हो की हिंदुस्थान की महिलाओं का बलात्कार होना चाहिए. यह राज्य की इतिहास में पहेली बार हुआ है. जो कॉंग्रेस पार्टी का नेता रेप जैसे संगीन जुर्म को पोलिटिकल मॉकरी का हिस्सा बनाता हो. यह राज्य की इतिहास में पहेली बार हुआ है, की गांधी खानदान का एक बेटा सरेआम कहता है की हिंदुस्थान में बलात्कार करो... सदन का एक सदस्य पहली बार यह हिमाकत कर रहा है, की हिंदुस्थान की औरतोंके बारे में... उनका बलात्कार होना चाहिये ऐसे शब्द उनके मूंह से निकल रहे हैं...’ 

अत्यंत संतापून, अतिशय आवेशाने बोलत होत्या त्या. त्यांच्या चेहऱ्यावरून राहुल यांच्या विधानाने त्यांना आलेला राग, झालेले दुःख स्पष्ट झळकत होते. सदनातील भाजपचे सदस्यही राहुल यांच्या विधानामुळे संतापलेले होते. लॉकेट चटर्जी, प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासारख्या महिला सदस्यांसह भाजपचे अन्य खासदारही शेम शेमच्या घोषणा देत होते. तिकडे राज्यसभेतही भाजप सदस्यांनी हंगामा केला होता. राहुल गांधी यांनी क्षमा मागावी अशी या सर्वांचीच मागणी होती. 

आता ही खासदार मंडळी म्हणजे काही निर्बुद्ध नव्हेत. त्यांना हे माहितच असणार, की स्मृती इराणी जे म्हणत आहेत, ते सारेच खोटे आहे. वस्तुतः बलात्कार रोखले गेले पाहिजेत आणि हे सरकार ते करीत नाही, हा राहुल यांच्या टीकेचा आशय होता. पण प्रोपगंडात ते मान्य करायचे नसते. फोर डी तंत्रात सर्वप्रथम आपल्याविरोधातील टीका, आरोप, माहिती, प्रतिक्रिया, मते या सगळ्याचा इन्कार करायचा असतो. ते डिसमिस करायचे असते. स्मृती इराणी तेच करीत होत्या. याकरिता त्यांनी राहुल यांचे म्हणणेच विकृत पद्धतीने मांडले. रेप इन इंडिया याचा शब्दशः अर्थ घेतला तरी, तो भारतातील बलात्कार असाच होतो आणि जेव्हा राहुल म्हणत होते, की कुठंही पाहा, वृत्तपत्रे वाचा, रेप इन इंडिया दिसते, तेव्हा त्यांनाही हाच अर्थ अभिप्रेत होता. परंतु त्यांचे सर्व वक्तव्यच डिस्टॉर्ट करण्यात आले. स्मृती इराणी किंवा त्यांच्या भाषणानंतर भाजपचे अनेक नेते आणि आयटीसेलमधील जल्पक यांनी ते विरुपित, विकृत स्वरुपात मांडले. इराणी यांच्या याच वक्तव्यातून, त्यावेळच्या त्यांच्या चेहऱ्यावरील भावांतून त्या सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात एक भावना तयार करीत होत्या. वैषम्याची, हताशेची, संतापाची. लोकांच्या मनात भयभावना वा नैराश्‍य म्हणजेच डिस्मे निर्माण करणे हे अपमाहितीचे एक कार्य असते. तेच यातून साधले जात होते आणि हे सर्व करताना भाजपचे प्रोपगंडा रणनितीकार नागरिकांचे लक्ष विचलित करीत होते. महिलांवरील अत्याचार रोखण्यात आलेले अपयश, नागरिकत्व कायद्यावरून पेटलेला देश यावरून ते लोकांना डिस्ट्रॅक्‍ट करीत होते. त्यांनी आता राहुल यांची माफी ही बाब किती महत्त्वाची आहे आणि ती कशी घेतलीच पाहिजे यावर भर द्यायला सुरुवात केली होती. 

राहुल यांनी दिल्लीतील भारत बचाओ मेळाव्यातून केलेल्या भाषणात माफी मागणार नाही असे सांगताना सावरकर यांचे नाव घेतले. माझे नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे असे ते यासंदर्भात म्हणाले. याला संदर्भ होता, सावरकर यांच्या माफीनाम्याचा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात जन्मठेप भोगत असताना ब्रिटिश सरकारकडे क्षमेची याचना करून सुटकेची मागणी केली होती. त्याबाबतची त्यांची काही पत्रे उपलब्ध आहेत. ती आठवण देऊन राहुल हिंदुत्ववाद्यांना डिवचू पाहात होते. त्यावरून वाद सुरू आहे. भाजपच्या असंख्य नेत्यांनी आणि जल्पकांनी त्यावरून राहुल यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. यातून झाले असे, की वादाचे जे मुद्दे होते... उदाहरणार्थ आर्थिक मंदी ते नागरिकत्व कायदा ते महिला अत्याचार... ते सारेच माध्यमांतून मागे पडले असून, सावरकर या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. लक्ष विचलनाचे तंत्र यशस्वी ठरले आहे. 

याला कॉंग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलेच नाही का? आले. यासाठी कॉंग्रेसने वापर केला डिस्टॉर्ट या तंत्राचाच एक भाग असलेल्या ‘व्हॉट अबाऊटरी’चा. म्हणजे ‘त्याचे काय?’ या प्रश्‍नाचा. राहुल रेप इन इंडिया म्हणाले, पण नरेंद्र मोदीही दिल्लीला रेप कॅपिटल म्हणाले होते, त्याचे काय हा तो सवाल आहे. 
हे सारे नीट समजून घेणे गरजेचे. हे राहुल गांधी-स्मृती इराणी व मंडळींचे उदाहरण झाले. पण येथे पक्षभेद नाही. सारेच हे असे पर्सेप्शन - लोकानुबोध - निर्मितीचे प्रयोग करीत असतात. सातत्याने हे असे घडत असते, घडविले जात असते... 

ravi.amale@gmail.com 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com