कुस्तीत दोस्ती... 

मतीन शेख
Sunday, 19 January 2020

खेळ आणि इर्षा हे एक समिकरणच... मग या समिकरणात मैदानावरील भांडणे, एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकार आपण नेहमी पाहतोच, पण अनेक खेळाडू आपल्या स्पर्धकाशी इर्षा करताना देखिल आपल्या मनातल्या कप्यात असणारी मैत्री जपत असतात. असाच हा कुस्तीतल्या दोस्तीचा किस्सा...

   कुस्ती पारंपरिक ईर्ष्येचा आणि रांगडा बाज असलेला खेळ. दोन मल्लांचे हे रणयुद्धच म्हणा. हा पैलवान त्या तालमीचा, तो त्या वस्तादांचा पट्ट्या; पण मानाची कुस्ती तर आपणच जिंकायची, अशी निकोप ईर्ष्या, खुन्नस, प्रतिष्ठा. प्रसंगी राजकारणही कुस्तीत असतेच; पण आखाड्यात एकमेकांसमोर भिडणाऱ्या मल्लांच्या पलीकडे अनेकदा दडलेली असते ती त्यांची सहृदयी मैत्री... कुस्तीत दोस्ती करू; पण दोस्तीत कुस्ती न करता ते दोन्ही मल्ल आखाड्यात लढतात.

अलीकडेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुणे येथे झाली. अंतिम लढत हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके यांच्यात चांगलीच रंगली. 
एकाच आखाड्यातले, एकाच मातीत घाम गाळणारे हे दोन्ही मल्ल; पण मानाच्या कुस्तीसाठी एकमेकाला भिडले. मैत्रीला बाजूला ठेवून दोन हात करत दोघांनी आपले डाव-प्रतिडाव केले. या लढतीत हर्षवर्धनने बाजी मारली; पण जिंकल्यावर विजयाचा कोणताही जल्लोष केला नाही. कुस्ती शौकिनांना हात जोडत अभिवादन केले आणि थेट आपल्याकडून चितपट झालेल्या आपल्या मित्राला हर्षवर्धनने खांद्यावर घेत मैदानात रपेट मारली. हा सुवर्णक्षण उपस्थित कुस्ती शौकिनांनीच नव्हे, तर अन्य माध्यमांद्वारे अनेकांनी डोळ्यांत साठवला. मैदानातच दोघांनी  एकमेकांची गळाभेट घेतली. या खिलाडूवृत्तीचा नवा आदर्श पायंडा मात्र यानिमित्ताने महाराष्ट्राच्या मातीत नव्याने पेरला गेला आहे.कोणत्याही खेळात हार-जीतप्रमाणे श्रेष्ठत्वाची लढाई होत असते. परंतु, महाराष्ट्राच्या या पैलवानांनी आखाड्यातले युद्ध संपताच  मैत्रीची तत्त्वं किती शाश्वत आहेत, याचा दाखला दिला. 

याचनिमित्ताने आणखी एक किस्सा आठवतो, श्रीनिवास नावाचा माझा प्रतिस्पर्धी मल्ल. बरीच वर्षे बरीच मैदाने आम्ही दोघे एकमेकांविरोधात मोठ्या ईर्ष्येने लढलो. कोण कुणाला चितपट करणार? याची स्पर्धा कित्येक दिवस होती; पण कुस्ती संपताच आम्ही दोघे एकमेकांकडे पाहत स्मितहास्य करायचो. अनेकांना वाटायच की यांच्या कुस्तीत काही तरी मॅनेज आहे. परंतु, आखाड्यात लढत, बाहेर मैत्री जपत होतो. एकमेकाच्या खेळाचा आदर करत होतो.

कुस्ती परंपरा अशीच आहे. स्पर्धा करायला लावणारी आणि मैत्रीचं सत्त्व पाहणारी. आखाड्यात जात - धर्म - वंश सर्व विसरून अनेक मल्ल बंधुत्वाने सराव करतात. यातूनच तांबड्या मातीत अशा प्रकारचे सकारात्मक विचारांना बळ देणारे ठरते आहे.खेळातील हार जीत ही खिलाडू वृत्तीने स्विकारत आपला खेळ खेळत रहायला हवं. इर्षा करताना ती निकोप भावनेने करायला हवी आणि प्रत्येक खेळात आपला मैत्रीचा बंध जपत दोस्तीत कुस्ती न आणता कुस्तीत मैत्री राहायला हवी...

 

इतर ब्लॉग्स