‘ती’ आत्मनिर्भर होत आहे..

अर्चना बनगे
Tuesday, 21 January 2020

समाजाला नेमके काय हवे, हे जाणून घेऊन महिलांनी आता घरातच बसून छोटी-मोठी उत्पादने सुरू केली आहेत. नामांकित कंपन्यांच्या ब्रॅंडेड उत्पादनांपेक्षा या महिलांनी तयार केलेले पदार्थ कधीही सकस आणि विश्‍वासार्ह, अशीच भावना आता अनेक ग्राहकांची झाली आहे.

युवती आणि महिला समाजात एक पाऊल पुढे टाकत आहेत. शहराबरोबर ग्रामीण भागातील महिलाही काहीतरी करायचे, या जिद्दीने अनेक क्षेत्रांत उतरत आहेत. नागरी सुविधांपासून ते प्रशासन व्यवस्था चालविण्यासाठी आणि छोट्या-मोठ्या उद्योगातून अर्थार्जन करण्यासाठी महिलांची धडपड सुरूच आहे.

महिलांच्या या धडपडीतून ग्रामीण भागातील अर्थार्जनाला बळ मिळत आहे. चूल आणि मूल या पलीकडे जाऊन आजच्या युवती कधीच्याच वेगवेगळ्या क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आज युवतींनी घेतलेली भरारी नक्कीच प्रेरणादायी आहे. नव्याने करिअर करणाऱ्या मुलींनाही एक वेगळी उमेद मिळत आहे. ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती तेथे आता महिला आणि युवती ठसा उमटवत आहेत. हॉटेल म्हटलं की फक्त पुरुष, ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. पुरुषांबरोबरच आता महिलांनी खाद्यपदार्थांच्या विक्रीमध्ये एक पाऊल पुढे टाकले आहे.

समाजाला नेमके काय हवे, हे जाणून घेऊन महिलांनी आता घरातच बसून छोटी-मोठी उत्पादने सुरू केली आहेत. नामांकित कंपन्यांच्या ब्रॅंडेड उत्पादनांपेक्षा या महिलांनी तयार केलेले पदार्थ कधीही सकस आणि विश्‍वासार्ह, अशीच भावना आता अनेक ग्राहकांची झाली आहे. अशा महिलांना यापूर्वी बचत गटासारख्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल उपलब्ध झाले आणि त्यातून त्यांना मार्केटिंगचे ज्ञान उपलब्ध झाले. बचत गटांच्या स्टॉलच्या माध्यमातून त्यांना मागणीही वाढली. त्यामुळेच ग्रामीण भागातील महिला उडीद पापड एवढ्यापुरते मर्यादित न राहता खाद्यपदार्थांच्या वेगवेगळ्या उत्पादनांत उतरल्या आहेत. बेकरीतील उत्पादनांपासून वाळलेल्या कडक भाकरीपर्यंत आणि दर्जेदार तुपापासून ते लज्जतदार लाडूपर्यंत तयार होणारी उत्पादने आता त्या त्या भागात ब्रॅंड बनू लागली आहेत. किंबहुना खानदेशातील पापड पश्‍चिम महाराष्ट्रात, तर पश्‍चिम महाराष्ट्रात गुळापासून तयार होणारी उत्पादने मराठवाड्यापर्यंत आता वेगवेगळ्या प्रदर्शनांच्या माध्यमातून पोहचू लागली आहेत. याची अनेक उदाहरणे देता येतील.

महिला एवढ्यापुरत्याच मर्यादित व्यवसायात राहिल्या नाहीत. शेती आणि दूध व्यवस्थापन, त्याचबरोबर शेतीमालाची अनेक उत्पादने ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे. शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी नजीकच्या बाजारपेठेत आता महिला गटागटाने पोहचू लागल्या आहेत. महिला गटांमार्फत येणारा हा भाजीपाला आणि शेती उत्पादने तेवढीच विश्‍वासार्ह ठरत आहेत. उत्पादनाचा दर्जा ग्राहकांना अत्यंत तळमळीने सांगत महिला आपली उत्पादने त्यांच्यापर्यंत पोचविण्यात यशस्वी ठरत आहेत.

गहू, ज्वारी, कडधान्ये, डाळी यापासून अनेक उत्पादने आता बाजारपेठेत अशा महिलांच्या माध्यमातून विक्रीसाठी येत आहेत. ही उत्पादने आता सेंद्रियकडे वळू लागली आहेत. सेंद्रिय उत्पादनाची मागणी आणि बाजारपेठेत त्याची कमतरता याचा अभ्यास करून अनेक महिला ठिकठिकाणी सेंद्रिय उत्पादने विक्रीसाठी स्टॉल सुरू करू लागल्या आहेत. केवळ मोठे व्यवसायच नव्हे, तर छोट्या छोट्या व्यवसायातून महिला आता आत्मनिर्भर होऊ लागल्या आहेत.

इतर ब्लॉग्स