तुमच्या दक्षतेने फुलू द्या निरागस हास्य !

Accident Care  Kolhapur Marathi News
Accident Care Kolhapur Marathi News

बाळ एक वर्षाचं होते आणि ते दुडुदुडू चालू लागते. साऱ्या घरभर त्याचा वावर कौतुकाचा विषय ठरतो. त्याच्या हातांची पकडही आता अधिक चांगली होऊ लागलेली असते. ते इतरांचे पाहून तशीच कृती, आवाज यांची नक्कल करू लागते. साधारणतः पाच वर्षांपर्यंत हा मनोहारी सोहळा सुरूच असतो आणि त्याच्या कोडकौतुकात सारा परिसर आनंदात न्हाऊ लागतो.

हा आनंद असाच टिकण्यासाठी पालक म्हणून किंवा बाळाचे शेजारी म्हणून तुम्हाला खूपच दक्ष राहावे लागते. ती दक्षता म्हणा किंवा समयसूचकता दाखविली नाही तर मात्र अपघात होतात. त्यात बाळाचे शारीरिक नुकसान होतेच; पण मोठा बाका प्रसंगही उद्‌भवू शकतो. 

या घटना काय घडू शकतात, याचा अंदाज पालकांनी बांधला पाहिजे. तुमच्या वावरात, वागण्यात अधिक सुधारणा असली पाहिजे, हे नक्की. कारण तुमचे बघूनच तो किंवा ती शिकत असते. अगदी साधे उदाहरण. चिवडा किंवा डाळिंबाच्या दाण्यांचा बकणा आपण थेट तोंडात फेकतो. चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणेही तसेच खातो. छोटा मुलगा खाताना हेच करतो आणि तो शेंगदाणा त्याच्या नाकात जाऊन बसतो; मग कठीण प्रसंग उद्‌भवतो. तुम्ही दुचाकीवर मुलाला पुढे बसवता. गाडी सुरूच ठेवून मोबाईलवर बोलता किंवा भेटलेल्या मित्राशी बोलता, टपरीवरून एखादी वस्तू खरेदीसाठी गाडीपासून दूर जाता.

हाच क्षण धोक्‍याचा असतो. कधी आपले पाल्य दुचाकीची मूठ (लिव्हर) वाढवेल आणि अपघात होईल, याचा नेम नसतो. चक्कर मारून आणली की मुलाला मोटारसायकलच्या उजव्या बाजूने खाली सोडता. त्याच वेळी तो नकळत सायलेन्सरच्या दिशेने धावतो. तुम्ही कुठलीही वस्तू घेऊन कान खाजविता. मूल तसेच करते. छोट्याशा गोष्टींचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतील इतके भयंकर असू शकतात. हे टाळण्यासाठी सजग पालक होणे अधिक गरजेचे असते.

 काय कारणे असतात?
  घरातील दारांच्या फटीत बाळाची बोटे अडकणे.
  निष्काळजीपणे ठेवलेले स्क्रू, स्क्रू ड्रायव्हर, मोळे, लोखंडाची तार, टोकदार लाकडी वस्तूंमुळे इजा होतात.
  स्नानगृहात भरून ठेवलेल्या बादल्या, पातेली.
  घरातील कमी उंचीवर असलेले इलेक्‍ट्रिक िस्वच.
  लहान मुलांच्या हाताला येतील इतक्‍या उंचीवर असणारे फ्लॅटचे लॅच.
  वाऱ्याने आदळणारी दारे किंवा खिडक्‍यांची तावदाने.
  ग्रीलशिवाय असलेली फ्लॅटची गॅलरी, अपार्टमेंटमधील जिने.
  औषधे, कीटकनाशकांच्या बाटल्या सहज हाताला येणे.
  उघडी कपाटे अन्‌ त्यातील साहित्य. 
  स्वयंपाकघरातील कमी उंचीवरील भांड्यांची फडताळे.
  ओट्यावरील गॅस शेगडीची हाताला येणारी बटणे.
  देवघरातील दिवे, उदबत्या. 

अपघातानंतर ही काळजी घ्या...
  तातडीने प्राथमिक उपचार करा.
  जवळच्या डॉक्‍टरांकडे धाव घ्या.
  शक्‍यतो ज्या त्या विषयाच्या डॉक्‍टरांकडे जाण्याचा प्रयत्न करा.
  जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण विभागाला भेट द्या, तेथे माहिती घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com