ती, बळी पडली, पण तो टेंभा तिच्यावर नाही, तर आपल्या समाजावरही पडलाय...!

सायली नलवडे-कविटकर
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

आधी हैदराबाद आता हिंगणघाटची लेक ! दोघी सुशिक्षित स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धरपडणाऱ्या! झालेला हल्ला बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वदूर पसरलीय आणि हळहळ व्यक्त होतीय, तर अनेक प्रश्न उभे होतायत ! त्यातला खटकलेला प्रश्न म्हणजे तिला ३ महिन्यांपासून तो मुलगा त्रास देत होता तर का तिनं गुन्हा, तक्रार दिली नाही? या तक्रारीनंतर काय झालं असतं, त्याला शिक्षा? नाही, पण नक्कीच समाजाच्या नजरांनी तिचा श्वास कोंडला गेला असता ! हे खरंय प्रत्येकाने आपल्या मनाला हा प्रश्न विचारा, उत्तर हेच असेल..

कोणत्या शतकात आहोत? तरी ही मुलगी असण्याची अवेहलना का? आता त्या नराधमाला फाशीची शिक्षा देऊन विषय संपणार आहे का? ते शक्य आहे? निषेध मोर्चे आणि कायद्यातील सुधारणा काय निष्पन्न करतात? हा मला नेहमी प्रश्न पडतो ! उत्तर देणारे बोलतात, सिस्टिमवर प्रेशर येतं त्यातून न्याय मिळतो का? सिस्टीम चालवणारा समाज का बदलत नाही? दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढतायत का? याचं उत्तर शोधून सापडत नाहीये, एकीकडे सावित्री-जिजाऊंच्या लेकी म्हणत महिला दिन साजरा करून प्रत्येक जण महिला सक्षमीकरणाची टिमकी वाजवतायत, यामुळे महिला होतायत का पण सक्षम? पण त्यांच्या बाई असण्यावरून तिच्या कर्तृत्वाच्या कहाणीपेक्षा तिच्यावर अत्याचाराच्या करून कहाण्या होतायत, त्याला जबाबदार कोण? जबाबदारी घेणार कोण? एक व्यक्ती दोषी ठरवून त्याच्या विकृतीला दोष देऊन विषय संपत नाहीये, कारण एका शिक्षेने इथलं भय संपत नाहीये!

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांना जबाबदार आपण आहोत, म्हणजे तुम्ही-आम्ही ! विकृत माणूस नसतो, मानसिकता असते. नुसतं म्हणून चालणार नाही, आसपास डोळे उघडे ठेवून जगा नक्कीच एकतरी विकृत सापडेल ! या विकृतीला नष्ट करता येऊ शकतं, त्यासाठी केवळ मेणबत्या जाळून होणार नाही, तर समाजात बाईला दुय्यम स्थान देत समान न्याय द्यावा लागेल, कागदापुरता नाही खराखुरा ! आज उच्चशिक्षित मुलींची ही अवस्था अस्वस्थ करतीये. ही फक्त माझी मनस्थिती नाही, तर प्रत्येकीची हुरहरू आहे !

आज हिंगणघाटची पीडिता भयानक मरण यातना सहन करतेय ! जीव जगला तरी मरण आणि गेला तरी मरणच ! तिची वाचा गेली, काळजाला पिळवटणाऱ्या किंचळ्या तुम्हा आम्हाला कायम कानठाळत राहतील. ती गेल्या तीन महिन्यांपासून रोज त्याच्या त्रासाने न खचता सक्षमपणे स्वतःच्या नोकरीवर धाडसाने जात होती. तिच्या कणखरपणाला समाज मानसिकता साथ देऊ शकला नाही, असं म्हणावं लागेल. आज ती जळाली नाही तर समाजाचा बुरखा जळाला आहे. तिची वाचा नाही गेली, नाही तर समाजाची गेलीय !

इतर ब्लॉग्स