आज राजे असते तर असं घडलच नसतं...

धनाजी सुर्वे
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

दुर्दैवाने आज हिंगणघाट मधील प्राध्यापिकेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली आणि तिने आपल्या सर्वांचा निरोप घेतला... याच घटनेवर भाष्य करणारा लेख...

   लालबुंद चेहरा झालेले राजे सिंहासनावर बसले होते. राजांचा अवतार पाहून ‘तो’ घामाने डबडबला होता. दरबारात निरव शांतता होती. नराधम राजांच्या चरणी धाडकन पडला... राजे चूक झाली... परत अशी चूक होणार नाही. मला माफ करा... राजे शांतपणे म्हणाले, ‘‘हो तुला माफ केले जाईल, फक्त जिच्यावर तू अत्याचार केलेस तिला या दरबारात हजर कर.’’ नाही राजे ती या जगात नाही, नराधम बोलला. राजे कडाडले, ‘‘तीही त्या वेळी अशीच विनवणी करत होती ना... ती अशीच हात जोडत होती ना...’’ तो काहीच बोलला नाही. राजे भडकले. ‘‘हो राजे, ती अशीच ओरडत होती, मी भानावर नव्हतो राजे... मला माफ करा...’’ तो विनवणी करीत होता. ‘‘ज्या हातांनी तिच्यावर अत्याचार केला ते हात कलम करा. ज्या पापी डोळ्यांनी तिला पाहिले, ते डोळे काढा. माझ्या स्वराज्यात स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्याला हिच शिक्षा दिली जाईल,’’ राजांनी आदेश दिला. दरबारात पुन्हा शांतता. तेवढ्यात एका माऊलीच्या तोंडून शब्द आले, ‘‘धन्य झाले महाराज... लेकीला न्याय मिळाला.’’ त्या शब्दांनी माझ्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. असा राज्यकर्ता असेल तर माझ्या माता-भगिनींच्या केसालाही धक्का लागणार नाही. याच विचारात मी जागा झालो. ते स्वप्न मी का पाहिले होते? मी भानावर आलो. काही दिवसांपूर्वीच हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात जिवंत पेटवलं होतं. तेव्हापासून मी हाच विचार करीत होतो. खरंच आज राजे असते तर... आमच्या माता-भगिनींच्या अब्रूवर हात टाकायची कोणाची टाप झाली नसती. होय, हे खरेच आहे, विचारांचं काहूर थांबत नव्हतं. इतिहासात रांजाच्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच शिक्षा दिली होती.

आज हैदराबादची प्रियांका, निर्भया, कोपर्डी, सांगलीची अमृता अशा रोज कितीतरी कळ्या दिवसाढवळ्या कुस्करल्या गेल्या आहेत. अनेक घटना घडत आहेत, महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. महिलेवर वाईट नजर पडली म्हणून सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याचे फर्मान शिवाजी महाराजांनी फर्मावले होते. आज त्यांच्याच महाराष्ट्रात महिला असुरक्षित होऊ लागल्या आहेत. अशा घटनांनंतर तर मन सुन्न होतं आणि आपसूकच मनात विचार येतो, ‘खरेच आज राजे असते तर...’

अशा घटनांनंतर देशभरातून संताप व्यक्त होतो. आरोपींना ही शिक्षा द्या, ती शिक्षा द्या; परंतु, अशा शिक्षांनी या घटना थांबतील का? या आधीही किती तरी अशा घटना घडल्या, किती जणांना फाशी झाली, जन्मठेप झाली. तरीही या घटना घडतच आहेत. आज राजे नाहीत; पण त्यांचे विचार आहेत. त्यांच्या विचारांचा सातत्याने जागर करण्याची वेळ आज आली आहे. महाराजांचे विचारच भरकटलेल्या समाजाला तारतील. घडणाऱ्या घटना कायमच्या थांबविण्यासाठी प्रत्येकाची मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता आहे. स्त्रीकडे प्रथम माणूस म्हणून पाहिले पाहिजे. तरच राजांच्या या स्वराज्यातील माता-भगिनींना सन्मानाचे जिणे मिळेल.

 

इतर ब्लॉग्स