ध्येयवेडा सायकलस्वार; एका दिवसात 290 किलोमीटरचा प्रवास

cyclist Sandeep Nazre
cyclist Sandeep Nazre

वाहनांच्या गराड्यात अलीकडे सायकलींचे प्रमाणही वाढत चालल्याचे एक आशादायी चित्र दिसत आहे. सायकलींपासून दूर गाड्यांपर्यंत गेलेले युग परत सायकलींकडे हळूहळू का होईना येताना दिसतेय. यात फरक आहे तो आधुनिक सायकलींचा एवढेच! अगदी शहरांपासून परत गावपातळीपर्यंत हे चक्र परत फिरताना दिसत आहे. ऐषोरामी गाड्यांमधून फिरणारे व सायकलस्वाराकडे तुच्छतेने पाहणारेच आता सायकल सवारी करताहेत. प्रदूषण आणि ट्राफिकच्या विळख्यात रस्त्यांवर पुन्हा सायकली फिरताना दिसत असल्याचे एक चांगले चित्र दिसत असले तरी यामागे काही लोकांचे झिजणे निश्‍चितच असते. अशाच एका ध्येयवेड्या सायकलस्वाराची भेट झाली आणि अशा प्रकारच्या लोकांचे कुठेतरी कौतुक व्हावे, असे वाटले. 

अलीकडे सायकलीने लांबचा प्रवास करणाऱ्यांचे चमू तयार होत आहेत, ही नक्कीच बदलाची गोष्ट आहे. पण, केवळ आपल्यापुरते सायकल चालवायचे आणि शांत बसायचे, असे न करता या एका ध्येयवेड्या सायकलस्वाराने सायकलिंगच्या जागृतीचा विडाच उचलला आहे. स्वतः आयटी इंजिनिअर असून, नोकरी करीत तो या चांगल्या कामासाठी भरपूर वेळ देतोय. सतेज नाझरे (रा. पुणे) असे त्यांचे नाव. केवळ फोनवरून ओळख होऊनही कोल्हापूर जिल्ह्याच्या व कर्नाटकच्या शेवटच्या टोकावरील मलिकवाड (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) या गावात त्यांनी सायकलिंगच्या जागृतीसाठी मेहनतीचे प्रयत्न केले. विशेष असे, की सायकलिंगच्या जागृतीसाठी येताना त्यांनी चक्क 290 किलोमीटरचा प्रवास एका दिवसात सायकलवरूनच केला. त्यामुळे छोट्याशा गावात येऊन त्यांनी केलेल्या प्रयत्नाला या गावच्या सायकल क्‍लबनेही दादा दिली. तीन हजार लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात एकाच हाकेत चक्क 35 हून अधिक लोक सायकलिंग क्‍लबचे सभासद झाले. (विनानोंदीचे त्यापेक्षा अधिक आहेत) सांगायचा हेतू हा, की चांगल्या गोष्टींचे फळ सावकाश; पण चांगलेच मिळते. 

मलिकवाडसारखे छोटे गाव कुठे आहे, याची पुसटशी माहिती नसतानाही नाझरे यांनी पुण्याहून सकाळी सातच्या दरम्यान सायकलने महामार्ग कापण्यास सुरवात केली. पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने येणारे घाट सायकलने सर करीत असल्याचे चित्र जरी डोळ्यांसमोर आले तरी अंगावर काटा नक्कीच येईल. मोबाईलवरून लोकेशन काढत, नादुरुस्त झालेली सायकल दुरुस्त करीत मार्गक्रमण सुरू होते. कोल्हापूर-इचलकरंजीमार्गे एरवी दिवसा ज्या भागात सामसूम असते, त्या शेतवाडीच्या रस्त्याने या ध्येयवेड्या सायकलस्वाराने मध्यरात्री दीडला फज्जा गाठला. प्रवास वर्णन ऐकून जमिनीला पाठ लागायला साधारण पहाटेचे तीन झालेच. सकाळी परत आठला उठून सायकलिंग क्‍लबचा उद्‌घाटन सोहळा झाला. त्यात सायकलिंगबद्दल माहिती व आरोग्याला फायदे याचे धडेही दिले. त्यानंतर आजूबाजूच्या दोन गावांतून सायकलिंग जागृती रॅली काढली. 40 सायकलींसह लहान-मोठी मुले पाहून नाझरे यांचा उत्साह आणखीच दुणावला. छोट्याशा गावाने सायकलिंगसाठी उचललेले पाऊल जेवढे आश्‍वासक आहे तेवढेच नाझरे यांच्यासारख्या लोकांच्या जागृतीचे फळही आहे. अशाच प्रयत्नातून हे चित्र आणखी भरीव स्वरूपात नक्कीच दिसेल, अशी आशा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com