appetite for humanity
appetite for humanity

आज आमच्या घरात एकही दाणा नाही. 
आज आमच्या घरात एकही शहाणा नाही. 
भूक 
अंतःकरणाच्या शेवटच्या दिव्यापर्यंत गायिले तर 
भुकेचा दिवा मालवेल काय? 

नामदेव ढसाळ यांच्या कवितेच्या ओळी, "भयंकराच्या दरवाजात' ऐकल्या, आणि उंबरठ्यावरच मी ठेचकाळलो. पांढरपेशी आयुष्याची रेखीव रांगोळी स्वतःच्याच अंगणात रोज बघायची सवय. हे असं काही विलक्षण, वेदनेचे रंग घेऊन कवितेत उमटलेलं वाचलं की, आतील दरवाजे कुरकुरू लागतात. अस्वस्थतेची वावटळ आत घुसू पाहते... ही ढसाळांच्या कवितेची वैश्‍विक ताकद. भान, देहभान, चित्त, वर्तमान गदागदा हलवून सोडणारी. 

भुकेचा राक्षस असतो, भुकेचे श्‍वापद असते, भुकेचा आगडोंब असतो... इथे भूक दिवा बनलिए ! तानसेनने गायनाने दिवे पेटवले, ही आख्यायिका. अभिजनांच्या रसिकतेतून जन्म घेतलेली. इथे गाणारा आर्ततेतून भुकेचा दिवा विझवू पाहतोय. कायमचा अंधार शोधतोय जणू! अंतःकरणातील एकेक पान शुष्क होत होत दिवे मालवत गेलेली गरिबी. जन्मानंतरची भूक. ढसाळ प्रश्‍न विचारत आहेत. नम्रपणे! कवितेच्या चारच ओळी. आवाका ? जितका विचार करू तितका मोठा. पुस्तकं काय मनोरंजन म्हणून वाचायची असतात? केवळ काही वाचायचं म्हणून? या अशा ओळी-परदुःख शीतल म्हणून बघायच्याच नसतात. जिवंत ठसठसणारी प्राचीन वेदना आपणहून सामोरी येते. विचारते...ची आहेस ना जागा अजून? 

पुस्तक वाचनातून अशा कित्येक चिरेबंदी भिंती ढासळतात. "गरिबी' जाता-येता दिसत असते. डोळ्यांतून फाटक्‍या-उसवलेल्या वस्त्रांतून... चित्रातून, फोटोतून, चित्रपटातून.... या गरिबीचा दाह जेव्हा साहित्यात पानापानावर उतरतो तेव्हा समजतं, गावकुसाबाहेरचं दिव्याचं अंधारलेपण! यानं काय होतं? काय व्हायला हवं? तर खरंच जगण्याकडं बघण्याची पद्धत बदलते. गरिबीवर हसणारे-कुठंतरी आत खोलवर हलतात..जगण्याचा इतरांचा संघर्ष, करपून गेलेल्या चेहऱ्यामागची कारुण्याची वेदनेची सत्यता थेट समजते. विश्‍वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले! ""आणि मग सुरू होतो चिंतनाचा प्रवास. का? असेच का? आत सुरू होतो... रुची बदलते. अभिरुची बदलते. सातासमुद्रापारची गरिबी, वेदना याकडे काणाडोळा करावा असे वाटत नाही.'' 

""जुन्या पुस्तकांची पाने गेलेली आसत्यात. ती निम्म्या किमतीत इकत घेऊन वाचताना, आगूदरच जेवून गेलेल्या कुणाच्या तरी खरकट्या ताटात आपूण जेवायला बसल्यागत वाटतयं, म्हणून एकदा तरी नवी पुस्तकं घ्यावीतच. त्यास्नी पहिल्यांदा आपला हात लागावा.'' आनंद यादव सरांच्या "झोंबी'तल्या या वाक्‍यानंही असेच आर्त दार उघडले. आमच्या घरात "दाणा नाही-शहाणा नाही', म्हणणाऱ्या जगणातल्या "शहाण्या'चं हे दुःख! याची भूक वेगळी... का राहायचं असं गरीब? केविलवाणे? हा तो प्रश्‍न विचारतोय. कवी किंवा लेखक जातकुळी तीच. भुकेला वैश्‍विकतेकडे नेणारी यांच्या घरात चूल पेटली नव्हतीच; पण या अशा संवेदनांच्या आवर्तातून अशा लेखक, कवी, विचारवंतांनी इतरांच्या जगण्यात संवेदनात कोवळी पानं पेरली. स्वतः जळत जळत अंतःकरणातून या भुकेला इतरांच्या मनात स्थान दिलं. म्हणून पुस्तकं ही पुस्तकं नसतात केवळ! या वेदना, ही दुःखे, कोलाहल आत रुजवली जातात. पुस्तके म्हणून सोबतीला घ्यायची असतात. ती ऊतू देत नाहीत. मातु देत नाहीत. कोळियाने आत। विणलेले जाळे। मनी किती चाळे। चालतात। असे कवी सौमित्र "बाऊल'मध्ये म्हणतात. या जाळ्याचा धागा चिवट असतो, पुस्तकांच्या वाचनातून. 

रस्त्यावरून चालताना, समोर चालणाऱ्याच्या फाटक्‍या चपला मनाला अस्वस्थ करतात. त्याची वाढलेली दाढी, पांढरे खुंट, शर्टावर नसणारं बटण आणि डोळ्यांतली अगतिकता जाणवते... पुस्तकच असतं ते... चालतं बोलतं! अपरिचित. मग दाटलेल्या संध्याकाळच्या ढगासारखं मनात काही दाटून येतं... तो पुढं असणारा दूर गेलेला असतो. केव्हाच. तरीही वाचलेल्या कथा-गोष्टी, कविता यातील गरिबी आपल्या मनात रेंगाळते. ती जळमटे नसतात. ती विणलेली जाळीही नसतात.... ती तर घरे बनलेली असतात. कुठंतरी दिवा लागेलच याची वाट बघणारी. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com