कलेचे स्वरविश्‍व

 music.jpeg
music.jpeg

संगीत ही कंठस्वर व वाद्यस्वर यांची विशिष्ट मांडणी करून आनंद निर्माण करणारी कला आहे. ताल, लय तसेच स्वरातील सातत्य राखत आवाजाने, ध्वनीने सांगीतिक स्वर निर्माण करण्याची कृती म्हणजे संगीत. वाद्यांची साथ अथवा साथीशिवायही गायक गाणे सादर करतात. सर्वसाधारणपणे गायनाला वादकांची अर्थात वाद्यवृंदाची साथ असते. गायक कधी एकल कार्यक्रम करतो, तर कधी त्याला एका वाद्यापासून (आर्ट सॉंग व काही जॅझ प्रकार) नानाविध वाद्यांची म्हणजे सिम्फनी ऑर्केस्ट्राची साथ लाभते. गायनाच्या विविध शैली आहेत. आर्ट म्युझिक, ऑपेरा, चायनीज ऑपेरा, भारतीय व धार्मिक संगीतात गॉसपल, पारंपरिक संगीतात जॅझ, गझल, ब्लूज, तर लोकप्रिय संगीतात पॉप, रॉक, इलेक्‍ट्रॉनिक डान्स म्युझिक व भारतीय फिल्मी संगीत येते. स्वरतंतूंची स्थिती व आकाराप्रमाणे प्रत्येक गायकाचा आवाज हा त्याच्या शारीरिक आकार व स्थितीवरही अवलबूंन असतो. श्‍वासावरच्या नियंत्रणाने आवाजाचा पोतही बदलता येतो. 

छाती व मानेचा आकार, जिभेची स्थिती, इतर स्नायूंची लवचिकता यात आपण बदल करू शकतो. यातील कुठल्याही बदलाने स्वरपट्टी, आवाजाची तीव्रता व नाद बदलतो. युरोपियन अभिजात संगीत व ऑपेरात आवाजाला वाद्यासारखे गणले आहे. स्वरलिपी लिहिणाच्या संगीतप्रकाराला गायकाची प्रतिभा, कौशल्य तसेच त्याच्या आवाजाच्या गुणधर्माची जाण असावी लागते. आवाजातील वैविध्य, आवाजाचा पोत, स्वरांची फेक, स्वरांवरील पकड, आवाजाची पट्टी, आवाजातील चढ-उतार यानुसार मानवी आवाजाच्या गुणवत्तेची वर्गवारी केली जाते. स्वरात्मक संगीतात एक वा अनके गायक, वाद्ये अथवा वाद्याशिवाय गीत सादर करतात. हा एक पुरातन संगीतप्रकार असून, आवाजाशिवाय याला इतर कुठल्याही वाद्यांची गरज नसते. हे संगीत वेगवेगळ्या रूपात व शैलीत लिहिले जाते. भारतीय अभिजात संगीत, कला संगीत, लोकप्रिय संगीत, पारंपरिक संगीत, प्रादेशिक व राष्ट्रीय संगीत तसेच त्यांचे फ्यूजन हे या प्रकारात मोडतात. एका संगीतप्रकारात अनेक उपप्रकार येतात. 

एल्व्हीस प्रेसली, क्‍लिफ रिचर्ड, मायकल जॅक्‍सन, फ्रॅंक सिनाट्रा, टेलर स्विफ्ट, लेडी गागा, बियॉन्से व इतर अनेक ख्यातनाम पाश्‍चात्त्य गायक आहेत. पंजाबी संगीत, अभिजात संगीत, लोकसंगीत, फिल्मी/चित्रपट संगीत, गझल, लावणी, भांगडा, बंगाली, भारतीय रॉक व पॉप इत्यादी वैविध्य भारतीय गायकीत आहेत. हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत या भारतीय अभिजात संगीत परंपरेला हजारो वर्षांचा इतिहास असून, वेगवेगळ्या प्रदेशांत ते रुजले व फुलले. संगीत हे भारतीय धार्मिक सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, किशारी आमोणकर हे जगविख्यात भारतीय अभिजात गायक असून, लता मंगेशकर, आशा भोसले, किशोरकुमार, मोहंमद रफी व इतर अनेक नावाजलेले पार्श्‍वगायक आहेत. गझलगायक जगजित सिंग, तलत अझीज, तर अरिजित सिंग, श्रेया घोषाल त्यांच्या वेगळ्या गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. भारताला गायनाचा समृद्ध वारसा लाभला असून, प्रत्येक भारतीय भाषेत विख्यात गायक आहेत. गायन हा जरी प्रसिद्ध व्यवसाय असला तरी त्याला नैसर्गिक प्रतिभाही लागते. 

महत्त्वाकांक्षी गायकाकडे उत्तम आवाज, गायन कौशल्य, इतरांबराबेर काम करण्याचे कौशल्य लागते. गायकांकडे महत्त्वाकांक्षेबरोबर अभ्यासाची चिकाटी तसेच गायकीत सुधारणा करण्याची मानसिक तयारीही लागते. व्यावसायिक गायकांना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी नवनवीन गायन शैली आत्मसात करण्यासाठी तसेच गायनात विविधता आणण्यासाठी आवाजाचे शिक्षण घेणे अपरिहार्य असते. उभरत्या गायकांनाही आवाज कमविण्यासाठीचे व्यायाम, गीतांसाठी स्मरणशक्ती, वाद्यवृंदाची कौशल्ये, गाण्याचे अर्थ समजून घेणे तसेच निवडलेल्या संगीत शैलीतील साहित्य शिकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. काही गायक हे संगीत क्षत्रोशी निगडित अनेक कामे करतात. जसे की, संगीतकार, संगीतनिर्माते, वाद्यवृंद निर्माते, वाद्यवृंद, गीतकार, कार्यक्रमांचे प्रवर्तक, दिग्दर्शक, संगीत शिक्षक, यूट्यूबसाठी व्हिडिओ करणे इत्यादी. काही गायकांचे व्यवस्थापकांनाही चांगले वेतन मिळते. 

गायनाचे शारीरिक तसेच मानसिक फायदे असल्याचे सिद्ध झाले आहे. गायनाने तीन प्रकारचे फायदे होतात. सामाजिक परिणाम- उत्तम परस्पर संबंध, व्यक्तिगत परिणाम- स्वत:ची सकारात्मक जाण तसेच कार्यकारी परिणाम- शारीरिक स्वास्थ्याचे फायदे. संगीताने मेंदूमधील एंडॉरफिन स्रावाचे या प्रसारामुळे भावावस्था उत्तेजित होऊन मानसिक स्वास्थ्य लाभते. गायनाने अनेक गायकांना काळजी, ताणापासून मुक्ती मिळाली असून, ते चिंतामुक्त झाले असल्याने रोजचे जीवन सुखकर झाल्याचे सिद्ध झाले आहे. सामाजिक दृष्टिकानोतून सहगायकांबरोबरच परस्पर संवादही हितकारक ठरला आहे. शरीरातील इतर अवयवांतही आवाज निनादत असतो. मानवी भाषेच्या आधी संगीत व गायन निर्माण झाल्याचे पुरावे आहेत. हनेरी मूरने म्हणूनच म्हटले आहे, की "मूर्तिकार आकारात रमतो, कवी शब्दात, गायक कंठ स्वरात, तर संगीतकार ध्वनिवाद्यात रममाण हातो.'  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com