पिंकीचा बालहट्ट (जागतिक चिमणी दिन विशेष)

अपर्णा सुधाकर चांदजकर
गुरुवार, 19 मार्च 2020

कारखान्यांतील चिमण्यांमधून निघणारा विषारी धूर, वाढते शहरीकरण यामुळे चिमण्यांचा अधिवास धोक्यात आला. आपल्या अवतीभोवती कायम चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या येणाऱ्या पिढीला चित्रातच पाहाव्या लागतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे चिमण्या वाचवायच्या असतील तर निसर्गही वाचवायला हवा. हा संदेश जागतिक चिमणी दिनानिमित्त (20 मार्च) या लघूकथेतून दिला गेला.

आज छोट्या पिंकीचा थाटात वाढदिवस साजरा होत होता. सर्व नातेवाईक व तिच्या मित्र-मैत्रिणींनी तिला छान छान ‘गिफ्ट’ दिले तरीपण स्वारी रुसून बसली. नाराज झाली होती. कारण काय तर... तिला खरी खरी चिऊताई (चिमणी) हवी होती. पिंकीला कुणी छत्रीवर, कॉफी मगवर, सुंदर फ्रॉकवर चिऊताईचं चित्र काढून आणलं; पण पिंकीचा बालहट्ट! की खरी खरी चिमणी हवी. सर्वजण चिंतेत. आता काय करावं बरं? 

इतक्‍यात एक पिटुकली खारूताई, हातात एक छोटंसं रोप घेऊन आली व पिंकीला म्हणाली, ‘‘हे रोप तू तुझ्या अंगणात लाव, रोज रोपाला पाणी घाल. यामुळे चिऊताई तुझी मैत्रीण बनून तुला लवकरच भेटायला येईल.’’ पिंकीच्या बालमनाला हे पटलं व पिंकीने खारूताईचा सल्ला प्रत्यक्षात आणला. लवकरच पिंकीने लावलेले रोप मोठे झाले. त्या झाडावर विविध रंगांची फुलपाखरं येऊन बसू लागली आणि अचानक एक दिवस खरोखरच पिटुकली गोजिरी अशी सुंदर ‘चिमणी’ तिने लावलेल्या झाडावर बसून ‘चिवचिव’ करू लागली. चिमणीचा आवाज ऐकून पिंकी बाहेर आली.

चिऊताईला बघून तिचा आनंद गगनात मावेना. पिंकी आनंदाने जोरात ओरडली... ‘झाड लावा दारी, चिऊताई येईल घरी.’ पिंकीच्या घरात एकदम आनंदी वातावरण झाले. पिंकीच्या आई-बाबांनी सर्वांना आवाहन केले, की २० मार्च हा जागतिक ‘चिमणी दिन’ आहे. तेव्हा सगळीकडे झाडे लावून चिमण्यांना आपुलकीने आग्रहाचं निमंत्रण द्या. त्यांना अन्न, पाणी, निवारा द्या. ‘परत फिरा रे या चिमण्यांनो... आपुल्या घरा...’ 
 

रोज दिवस असतो 
निर्गुण निराकार, 
आपणच द्यायचा असतो 
त्याला सुंदर आकार. 

लेखिकेचा संपर्क - ८५५२८४७६६५  
 

इतर ब्लॉग्स