तुमचा घात करण्याआधी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना

कोरोनाच्या भयंकर संसर्गाने संपुर्ण विश्‍व वेठीस धरले गेले आहे. एकीकडे या परिस्थितीला आपण तोंड देत आहोत, तर दुसरीकडे अशा स्थितीतही व्यसनांबाबत कोणतीही काळजी न घेता व्यसनाधिनतेत वावरणारे बरेच जण आपल्या अवतीभवती वाढत आहेत. त्यात सिगारेटचे झुरके हवेत सोडून जीवनालाही तसेच धुराप्रमाणे विखुरणारे आणि तंबाखूच्या सेवनाने स्वत:ला संपवून टाकणारे कमी नाहीत. त्यामुळे अशा तंबाखूने तुमचा घात करण्याआधी चला आपणच करुया, त्या तंबाखूचा घात...

तुमचा घात करण्याआधी...

एकदा एका व्यसनमुक्ती कार्यक्रमात एक गृहस्थ बसले होते. तेव्हा त्यांनी एक मजेदार विनोद केला. विनोद ऐकताच सभागृहातील सर्व लोक हसू लागले. त्या गृहस्थाने पुन्हा तोच विनोद सांगितला. आता यावेळी मात्र कमी प्रमाणात लोक हसले. ते गृहस्थ पुन्हा-पुन्हा तोच विनोद ऐकवू लागले. शेवटी अशी वेळ आली की, तो विनोद ऐकून कोणीच हसेनात. सगळ्यांची अशी स्थिती पाहून ते हलके हसले आणि म्हणाले, "तोच तो विनोद ऐकून जर तुम्हाला मजा येत नसेल तर तीच तंबाखू व त्याचे व्यसन पुन्हा- पुन्हा करुन तुम्हाला कशी मजा येते बरं..? यामध्ये आश्‍चर्यकारक गोष्ट ही आहे की, सरकार, आरोग्य संस्था, जागरुकता कार्यक्रम, चेतावणी, तंबाखूच्या व सिगारेटच्या पाकिटांवर दाखवलेली चिन्हे, सामाजिक माध्यमांवरील तंबाखू विरोधक विचार, तंबाखू विरोधक धोरणे आदी असुनही लोक कशी काय तंबाखू, मिश्री, गुटखा, मावा, सिगारेट आदी सोडायला मात्र तयार नाहीत. 

दरवर्षी मौखिक कर्करोगाने खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होतो. जागतिक आकडेवारीनुसार साडेसहा लाख नवीन कर्करोगग्रस्त रुग्ण दृष्टीस येत आहेत. आज भारताचा मौखिक कर्करोगात पहिला क्रमांक येतो. खूप वेळा असे पाहण्यात आले आहे की, जेथे- जेथे धुम्रपानाला परवानगी नाही अशा ठिकाणी सिगारेट सोडतात आणि कच्ची तंबाखू वापरण्यास सुरुवात करतात. सर्व कर्करोगग्रस्तांपैकी 75 टक्‍के लोक हे फक्त तंबाखू सेवनाचे कारण ठरले आहेत. तंबाखूसाठी कोणतीही सुरक्षित पातळी नाही. कारण तंबाखू ही कोणत्याही प्रकारात घातक असू शकते आणि जरी तंबाखूने कर्करोग नाही झाला तरी कर्करोग नसलेले लोक जखमी स्थितीने ग्रासले जाऊ शकतात. 

तंबाखूमुळे निकोटीन अवलंबन व व्यसनाधिनता होऊ शकते. तंबाखू खाणाऱ्यांमध्ये निकोटीन हे मौखिक त्वचेतून शोषले जाते व रक्तावाटे मेंदूपर्यंत पोचते. थुंकल्यानंतरही तंबाखूचे निकोटीन हे बराच वेळ शरिरात राहते आणि त्यामुळे सिगारेट सोडणे सोपे आणि तंबाखू सोडणे अवघड आहे. तंबाखूमध्ये कर्करोगास कारणीभूत असणारे 28 घटक आहेत. त्यापैकी काहींची नावे Nicotinamine (निकोटीनामाइन), Polonium 210 (पोलोनीअम 210), Polinuclear (पोलिन्यूक्‍लियर), Paramatic hydrocarbon (पॅरामॅटीक हायड्रोकार्बन). तंबाखू, मिश्री, गुटखा, जर्दा, पान- चुना, सुपारी आदींमुळे मौखिक कर्करोग, अन्ननलिका कर्करोग, प्यंक्रिया कर्करोग (Pancreatic cancer), पोटांचा, जिभेचा, गालांचा, हिरड्यांचा व घशाचा कर्करोग होऊ शकतो. Oral lesions जसे Lucoplakia, oral submucous Fibrosis यामुळे तोंडात आग होणे, तोंड उघडता न येणे, असहाय्य वेदना, गिळता न येणे, आवाजात बदल आदी काही चिन्हे आहेत. तंबाखूतील निकोटीनमुळे शारिरीक व मानसिक परिणाम होतात. मानसिक परिणाम म्हणजे सतत चिडचिड होणे, तंबाखू तोंडात असेपर्यंत ताजेतवाणे वाटणे असे होते. असे होत असल्याने तंबाखू सुटणे अवघड वाटते. 

कोरोनाचा धोका... 
सिगारेट, बिडी ओढत असताना बऱ्याचवेळा तोंडाला स्पर्श होतो. तंबाखू मळताना ती इतरांशीही वाटप होते. चेहऱ्याला व हाता- तोंडाला स्पर्श झाल्याने कोरोनाचा धोका वाढतो. अशा रुग्णामध्ये फुफ्फुसाची क्षमता कमी होते व त्यामुळे कोरोनाची गुंतागूंत वाढण्याची शक्‍यता वाढते. तंबाखू व गुटखा खाणाऱ्यांमध्ये सतत थुंकण्याचे प्रमाण जास्त असते. थुंकण्यामुळे कोरोनाची लागण जास्त होते. फुफ्फसांचे आजार, टिबी, फुफ्फुसांचा कर्करोग, न्युमोनिया आदी आजार बळावण्याचा धोका जास्त असतो. Passive smoking प्रकारामध्ये घरातील वयोवृद्ध मंडळी, लहान मुले यांना विनाकारण सिगारेटच्या धुराचे सेवन करावे लागते व त्यामुळे त्यांना सूद्धा फुफ्फुसांच्या आजाराच्या धोक्‍याला सामोरे जावे लागते. जागतिक आकडेवारीनुसार 6.25 ट्रिलियन्स सिगारेट दरवर्षी ओढल्या जातात व तंबाखूमुळे दरवर्षी सहा मिलियन्स लोक मरण पावतात. अशा स्थितीत फक्त 15 टक्‍के लोकांना व्यसन सोडण्यासाठीचा सुविधा उपलब्ध आहेत. तंबाखूमुळे हजारो नॉक्‍सियस केमिकल असतात आणि त्यामध्ये दोन प्रकार आढळून आले. 

गॅस व सॉलिड फेज गॅसफेजमध्ये कार्बन मोनॉक्‍साइड, अमोनिया, फॉरमॅलडीहाइड, हायड्रोजन सायनायड व इतर भरपुर असे टॉक्‍सिक कंपाउंड आढळून आले आहेत. 60 पेक्षा अधिक कर्करोगास कारणीभूत आढळतात. सॉलिड फेजमध्ये निकोटीन, बेन्जीन, बेन्जोपायरिन हे धुरासोबत श्वसनावाटे फुफ्फुसात जाते व दातांवरती काळा व तपकिरी रंगाचा घट्ट थर राहतो. दात व जीभ यांचे रंग बदलतो. लक्षात ठेवा निकोटीन हे सिगारेटच्या धुराद्वारे मेंदूपर्यंत 19 सेकंदात पोहोचते. तर निकोटीन हा प्रचंड प्रमाणात व्यसनाधिनता वाढविणारा पदार्थ आहे. त्यामुळे त्यापासून जेवढे दूर राहू, तेवढे तंदुरुस्त राहू आणि संपुर्ण कुटूंबाला सुख- समाधानाने समृद्ध करू... 

तंबाखू सोडण्याचे उत्तम मार्ग 
निरोगी जीवनशैली आत्मसात करणे. 
सौम्य, सात्विक, पौष्टिक आहार करणे. 
भरपूर प्रमाणात फळे, हिरव्या पालेभाज्या आदी खाणे. 
व्यायाम, प्राणायाम, योगा जसे की, अनुलोम- विलोम आदी आत्मसात करणे. 
तंबाखू सोडण्याची ईच्छाशक्ती प्रबळ ठेवणे. 
आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे. 
आनंदी वातावरण, कुटुंबासोबत आनंदी राहणे व स्वतःला आनंदी ठेवणे. 
 

Web Title: Article Dr Aishwarya More

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top