चहा आणि चहाते

डॉ. शंतनू अभ्‍यंकर
डॉ. शंतनू अभ्‍यंकर

चाहत्यांचे जेवढे रंगढंग तेवढेच चहाचेसुद्धा. साधा चहा, स्पेशल चहा, "पेशल चहा', इराण्याचा, कटींग, मारामारी असे अनेक प्रकार. याशिवाय शुद्ध दुधाचा, बिनदुधाचा, साखरेचा, बिन साखरेचा आणि गुळाचाही चहा आहे. कसले कसले मसाले घातलेलेही चहा आहेत. इतकंच काय मुळात दुसरीच कुठली तरी "कीस झाड की पत्ती' घातलेला असा बिन चहापत्तीचाही चहा आहे. गोरा, काळा, हिरवा असा विविधरंगी आहे. खारट, आंबट, तिखट, तुरट अशा अनवट चवीचा आहे. करपलेला, धुरकटलेला आणि नकोशा वासाचा आहे. खळखळ उकळता चहा पिणारे आहेत. ओट्यावरून टेबलावर येईपर्यंत गार झाला म्हणणारे आहेत. "आता तोंडात गाळू का?' विचारणारे आहेत आणि बर्फीला, थंडगार चहा घुटकणारेही आहेत. बर्फ घालून चहाचं लाल पाणी पिणाऱ्या व्यक्ती बहुधा स्त्रिया असतात. त्या तोकडे कपडे घालून पोहण्याच्या तलावाजवळ किंवा समुद्रकाठी बसून हे कृत्य करतात आणि त्यांच्या चहाच्या ग्लासात नळी आणि ग्लासच्या कडेवर लिंबाचा काप खोचलेला असतो; एवढेच मला ठाऊक आहे. 

पहायला आलेल्या पाहुण्यांसमोर येणारा थरथरता चहा आहे. किटलीतून गिलासात झेपावणारा हापिसातला "च्या' आहे. रेल्वेतला "च्याय ग्रेम' आहे. नेमकं या द्रावणात आहे तरी काय अशा बुचकळ्यात पाडणारा पंचतारांकित "टी' आहे आणि या सर्वांहुनी निराळा असा इराण्याचा चहा आहे. 

अमृततुल्य चहा ही मात्र वेगळीच संस्था आहे. मराठी भाषा आणि इये मराठीचीये नगरीतील चहा वगळता दुसऱ्या कशाची अमृताशी तुलना झाल्याचं मला आठवत नाही. बाकी अमृत नावाचं एक अंजन आणि अमृत नावाची एक दारू मात्र आहे. स्वर्गातही सध्या "चहातुल्य अमृत मिळेल' अशा पाट्या आहेत म्हणे..! तो अल्युमिनियमचा चबुतरा, ती शेगडी, पैशाच्या ड्रॉव्हरवर बसलेला पायजमा आणि बनियन घातलेला चहाकर्ता; त्याच्यामागे असंख्य देवांच्या तसबिरी आणि "मैने उधार में बेचा", "गीता-सार' वगैरेचे स्टिकर, पाण्याच्या ग्लासात तरंगत तेवणारी ज्योत, हे सारं प्रत्येक ठिकाणी जसंच्या तसं असतंच. शिवाय गिऱ्हाईकांसाठी वर्तमानपत्रे घेणंही कायद्यानं बंधनकारक असावं. चहाकर्ता स्वतः पेपर कधीच वाचत नाही. चहा करण्यात तो अगदी गढलेला असतो. आधीच्या गिऱ्हाईकाचे पैसेही तो निव्वळ कर्तव्य भावनेनं घेतो. इकडे आधण आलेले आहे आणि त्यानं त्यात चहा पावडर टाकलीसुद्धा. आता तो चहा उतू जायच्या आत मघाशीच खलून ठेवलेला मसाला तो किती चापल्यानं घालतो ते पहा. त्याच्या हालचालीत एखाद्या सर्जनचा आत्मविश्वास आहे. ते पहा चहा ऊतू जातोय म्हटल्यावर त्यानं ओगराळं पातेल्यात फिरवून चहा ढवळला सुद्धा. हाच तो क्षण जेंव्हा शेजारच्या पातेल्यातलं गरम दूध बरोब्बर मापानं चहात पडणार आहे. जादूगाराची छडी फिरावी तसं पुनः ओगराळं फिरणार आहे आणि ते कशाय पेय सिद्ध होणार आहे. इकडे किटल्या आणि त्यावर फडकी तयार आहेत. आता तो चहा गाळला आणि फडका चिमटयाने पिळला की बस्स... अशा चहाचा अमृतानुभव ज्यानं घेतला नाही तो चहाबाजच नाही. 

काही मंडळी निव्वळ चहा पिण्याऐवजी त्यात काहीनाकाही बुचकळून बुचकळून खातात. हेही निषिद्ध समजायला हवं. खारी, मारी, केक, पोळी, क्रीमरोल वगैरे चहाच्या चवीला मारक आहेत. तुम्ही हे सारं आधी खा आणि वर नुसता चहा प्या. पण वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी दोन्ही एकदम करू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. मात्र या शिफारसीला एक अपवाद आहे. पहाटेपासूनची ड्यूटी असावी, श्वास घ्यालाही उसंत नसावी, नाष्टा, जेवणाचे मुळी भानच नसावे. मग कधीतरी उतरत्या संध्याकाळी जरा वेळ मिळावा. तहान, भूक, थकवा याची एकत्रित जाणीव व्हावी. अशावेळी झक्कासपैकी कपभर चहा आणि ग्लुकोज बिस्किटांचा अख्खा पुडा घेऊन बसावे. चार बिस्किटे एकाच वेळी चहात बुडवावीत आणि चारीही एकदम खावीत. डोळे मिटावेत. जीभ आणि टाळूमध्ये तो लगदा अलगद दाबावा. मोक्ष मिळेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com