लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा...

Article by Pralhad Lulekar on Datta Bhagat
Article by Pralhad Lulekar on Datta Bhagat

भारतीय इहवादी विचार परंपरेचे म्हणजे बुद्ध-फुले-आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानातून महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारधारा प्रवाहित झाली. याच विचारांतून सत्यशोधकी, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य चळवळी, प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्यांचा आग्रह दलित साहित्याने आपल्या भूमिकेसह आविष्कृत केला. या प्रवाहातील महत्त्वाचे नाटककार म्हणून प्रा. दत्ता भगत यांनी आपले लेखन मराठी साहित्याला दिले. महाराष्ट्र, महाराष्ट्राबाहेर त्यांनी नाटककार, समीक्षक, ललित लेखक, विचारवंत, वक्ता म्हणून नावलौकिक मिळविला. 

परिवर्तनवादी चळवळीचे ऐतिहासिक संदर्भ विचारात घेऊन वर्तमान प्रश्‍न गांभीर्याने मराठी नाटक, रंगभूमीवर उपस्थित करणारी नाटके त्यांनी मराठी नाट्यसृष्टीला दिली. बुद्ध-फुले-आंबेडकर विचारांनी विषम व्यवस्थेच्या समाप्तीसाठी विचार आणि कार्य केले. त्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध समतावादी विचारांनी संघर्ष केला. हे सारे संघर्ष मानवी मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी आहेत, ही जाणीव साहित्यातून आग्रही भूमिकेसह साकार केली. जात, वर्ण, लिंग, धर्म यातून आलेल्या साऱ्या भेदभावना नाकारून त्याविरुद्ध विद्रोह केला. मानवी अप्रतिष्ठा करणाऱ्या विसंगत, विसंवादी, अंतर्विरोधी वर्तनावर भाष्य करीत प्रहार केला. प्रा. दत्ता भगत यांच्या ‘अश्‍मक’, ‘खेळिया’, ‘वाटा-पळवाटा’, ‘पुस्तकी वांझ चर्चा’ या नाटकांनी आणि ‘आवर्त’, ‘चक्रव्यूह’, ‘जहाज फुटलं आहे’, ‘आम्ही सगळे’ या एकांकिका संग्रहातील एकांकिकांनी अनेकविध पातळीवरील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय संघर्ष समाजासमोर प्रखर जाणिवेने आविष्कृत केले. वर्णव्यवस्थात्मक सामाजिक संरचनेला आव्हान देणाऱ्या चळवळीची विचारसूत्रे त्यांच्या नाटकाने विलक्षण सामर्थ्याने साकार केली. त्यामुळेच त्यांची ‘वाटा-पळवाटा’, ‘अश्‍मक’, ‘आवर्त’, ‘चक्रव्यूह’, ‘जहाज फुटलं आहे’ या नाट्यकृतींचे इंग्रजी, हिंदी, तेलुगू, कन्नड भाषांत अनुवाद झाला. त्यांच्या विशेष गाजलेल्या ‘वाटा-पळवाटा’ या नाटकावर विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, अमोल पालेकर, सतीश आळेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी गौरव केला. त्यांच्या नाटक आणि रंगभूमीवरील योगदानामुळे ८६व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांना मिळाला. 

त्यांनी केलेले समीक्षा लेखन नवी मांडणी करणारे आहे. ‘निळी वाटचाल’, ‘दलित साहित्य ः दिशा आणि दिशांतरे’, ‘विजय तेंडुलकर ः व्यक्ती आणि वाङ्‍मय’, ‘साहित्य समजून घेताना’, ‘समकालीन साहित्य आणि साहित्यिक’, ‘आधुनिक मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्‍वभूमी’ या ग्रंथांतून त्यांची मौलिक समीक्षा आली आहे. ‘बिसापच्या गोष्टी’ हे त्याच्या कल्पक प्रतिभासंपन्नतेची उत्तम निर्मिती आहे. त्यांचे पिंपळपानांची सळसळ आणि पाऊलवाटा हे ललित लेखन वेगळ्या अनुभूतीची साक्ष देतात. या सर्व लेखनांसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नागपूरच्या मारवाडी फाउंडेशनचा पाच लाखांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. 

अलीकडे त्यांनी दोन महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. ‘मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास’ हा संशोधन ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केला आहे. नाट्यवाङ्‍मयाची निराळी मांडणी या साडेसहाशे पानांच्या ग्रंथातून आली आहे. मराठी रंगभूमीचा शोध, कालखंडाच्या नावासह नव्या कालखंडाची पुनर्मांडणी, नाटककार जोतिराव फुले आणि दलित रंगभूमीच्या निराळ्या भूमिकेसह वेगळा विचार या ग्रंथाने दिला आहे. नाट्यवाङ्‍मयाच्या इतिहासाच्या लेखनाचे हे कार्य अभ्यासक-संशोधकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. 

वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रा. दत्ता भगत यांनी गेल्या सात-आठ वर्षांपासून स्वतःला वेगळ्या संशोधनकार्यात गुंतवून घेतले. आता हे काम पूर्ण झाले आहे. त्यांचे हे साडेसातशे पानांचे लेखन राज्यासाठी आणि देशासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय दैनंदिनी त्यांनी ससंदर्भ सिद्ध केली. हे प्रकाशनासाठी सिद्ध होतानाच त्याचा हिंदी अनुवाद डॉ. सूर्यनारायण रणसुभे करीत आहेत. या नव्या लेखनाचे शीर्षक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय कार्य’ (‘कालिक सूची'च्या संदर्भात राजकीय कार्य) असे आहे. हे लेखनकार्य ऐतिहासिक ठरणार आहे. 

आयुष्यभर प्रा. दत्ता भगत यांनी विवेकनिष्ठेने मूल्यसंघर्ष आपल्या लेखनातून साकारला. शिक्षक-प्राध्यापक म्हणूनही निष्ठेने काम केले. अलक्षितांच्या अस्तित्वासाठी आपले लेखन, माणसाच्या प्रतिष्ठेसाठी लेखन, लेखनातून नवे सामाजिक भान देत प्रा. दत्ता भगत लिहीत राहिले. भविष्यात हीच लेखनसमृद्धी मराठी साहित्याला संपन्न करेल. त्यांच्यातील संवेदनशील लेखक, मानवतेसाठी अस्वस्थ असणारा निखळ माणूस मी पंचेचाळीस वर्षांपासून अनुभवला आहे. हा अनुभव आनंददायी आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com