का करावं लागतं हे सारं?

का करावं लागतं हे सारं?

शिक्षण आणि ज्ञान यांचं म्हटलं तर परस्परांशी जैविक ऋणानुबंध आहेत. म्हटलं तर दोन्ही गोष्टी स्वतंत्र आहेत. पहिल्या मुद्याबाबत असं म्हणता येईल शिक्षणाशिवाय योग्यप्रकारे ज्ञान मिळवता येत नाही आणि ज्ञानांकांक्षेशिवाय शिक्षणाकडेही जाता येत नाही. परंतु एक गोष्टसुद्धा इथे ध्यानात घेतली पाहिजे, ती म्हणजे शिक्षणव्यवस्था अस्तित्वात नसतानाही मानवी विकास हा थांबला नाही. आकलनाच्या आणि अनुभवाच्या आधारावर स्वतःप्रत असणारी अंतप्रेरणा वा जिज्ञासा यामांध्यामातून ज्ञानाची कास धरत मानवी उत्क्रांतीची पाऊले पडलेली आहेत. याचा अर्थ असा की शिक्षण आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींचे स्वतंत्र स्वरुपाचे अस्तित्व आहे. ज्ञान ही गोष्ट अशी आहे की, ती माणूस अस्तित्वात आल्यापासून त्याच्यासोबत वावरत आलेली आहे. शिक्षण ही संकल्पना मानवी विकास प्रक्रियेला चालना वा गती देण्यासाठी एक system म्हणून अस्तित्वात आलेली आहे. 

जिज्ञासातून ज्ञान वर्धमान होत असते आणि ते निसर्गदत्त वा उपजत असते. शिक्षण मात्र या सा-याला ऊर्जा देण्यासाठी अंमलात आणली गेलेली स्वतंत्र यंत्रणा आहे. तथापि, शिक्षण आणि शिकणे हे दोन्ही शब्द परस्परांशी साधर्म्य साधणारे असणारे असल्याने ब-याचदा शिक्षण (यंत्रणा) म्हणजेच शिकणे आणि शिकणे म्हणजेच शिक्षण असंही म्हटलं जातं. वस्तुस्थिती पाहिली तर नेमकं काय हे इथं आपण समजून घेऊयात. त्यासाठी एक उदाहरण घेऊ. जन्मलेलं बाळ हे हळूहळू वाढत असते. त्याचे लुकलुकणारे डोळे सभोवताल टिपत असते. त्यांचे कान हर प्रकारच्या आवाजाचा कानोसा घेत असते. त्याच्यातील जिज्ञासा त्याला सतत प्रोत्साहन देत असते. त्यामुळे जी दिशा गवसेल त्या दिशेने ते रांगायला लागते. जे दिसेल ते खाण्याचा वा तोंडात घेण्याचा प्रयत्न करत राहते. नाविन्याची ओढ अथवा उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. चांगलं - वाईट, योग्य - अयोग्य याचा त्याला काहीएक मागमूस नसतो. अशा स्थितीत त्या मुलाची जिज्ञासू भूक ही वाढीस लागत असते आणि त्याचे निरीक्षण कौशल्यही प्रगल्भ होत राहते. एखादा आवाज झाला (कुत्रं भुंकले) तर त्या दिशेला ते मान फिरवते आणि डोळ्यांनी पाहते. अशावेळी जर कोणी त्याला म्हटलं की बाळा याला 'भू' म्हणतात, तर next वेळी जेव्हा त्याला कुत्रं दिसते तेव्हा त्या बाळाच्या ओठातून 'भू' हा शब्द आपसूक बाहेर येतो. म्हणजे त्या बाळाचे शिकणे हे आपोआप सूरु झालेले असते. किंवा असंही म्हणता येईल की तो बाळाच्या शिक्षणप्रक्रियेचा (शाळेत न जाता) आरंभ आहे. 

थोडक्यातः माती ओली असतानाच हवा तसा तीला आकार देता येतो तद्वतः बाल्यावस्थेत हवे तसे संस्कार करता येतात. म्हणजे कुत्र्याला भू का म्हणतात, पक्षी कसा असतो, झाड कसे दिसते यासंबधीचे सारं काही आपण त्या बाळाच्या मेंदूत फिड करतो. अर्थात त्यांच्यावर एकप्रकारे संस्कार करतो आणि या संस्कारातून ते बाळ घडते. किंवा या संस्कारावर त्या बाळाचा पुढील सारा प्रवास अवलंबून राहतो. त्यामुळे आपण नेमके संस्कार कसे करतोय म्हणजेच शिक्षण कसे देतोय हे व्यक्ती उन्नयनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. 

शिक्षण आणि संस्कार यात फारसा फरक नसला तरी आजच्या काळात शिक्षण ही एक व्यवस्था आहे. तिचे स्वतंत्र स्थान आहे. संस्कार माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे. तेव्हा शिक्षण आणि संस्काराचा सांधा जूळवता आला पाहिजे. त्याचबरोबर संस्काराने माणसाला दिशा दिलेली असते त्या दिशेने पुढे घेऊन जाणारे आणि माणसाला समृध्द करणारे शिक्षण आहे की नाही, हेही तपासता आले पाहिजे, तर संस्कार आणि शिक्षण यातले नातं उकलणं सहज शक्य होईल.

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असं सांगत महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांनी १८४८ शाळा साली सुरू केली. खरंतर, तेव्हापासून महाराष्ट्राच्या सामाजिक क्रांतीला नवी दिशा आणि गती गवसली. कारण इथे फक्त महात्मा जोतीराव फुल्यांनी किंवा सावित्रीमाईंनी केवळ बाराखडी शिकवून अथवा अक्षर ओळख करून समाज वा-यावर सोडला नाही. तर त्याच्यावर समग्र परिवर्तनासाठीचा मूलभूत स्वरुपाचा संस्कार केला. योग्य - अयोग्य, इष्ट - अनिष्ट यावर शिक्षणाच्या माध्यमातून चर्चा केली. किंबहुना हे सारं तपासण्याच्या जबाबदारीचे भान दिले. हे आपण नीटपणे लक्षात घ्यायला हवे.

आज शिक्षणाने प्रचंड वेग घेतलाय. शिक्षण घेणा-यांच्या हातात हव्या तेवढ्या पदव्याही पडताना दिसताहेत. मात्र संस्काराच्या आभावामुळे सुसंस्कृतणा किंवा सुशिक्षितपणा काही अपवाद वगळता आजच्या शिक्षण व्यवस्थेत पहायला मिळत नाही, असं म्हटलं तर ते अप्रस्तुत ठरणार नाही. कारण फुले दांम्पत्याने इष्ट - अनिष्ट तपासण्याचा शिक्षणातून जो संस्कार इथल्या मातीत रुजवलाय त्याच्याशी आपण प्रामाणिक कुठे राहतोय. अनिष्ट प्रथा - रुढी - परंपरा यांना नाकारण्याचे जे धैर्य फुल्यांच्या शिक्षणाने महाराष्ट्रालातल्या तमाम स्त्रियांना दिले ते धैर्य आजचे शिक्षण वा शिक्षण घेणारे दाखवताहेत का खरा मुद्दा आहे. 

शिक्षित मेंदू सुसंस्कृत असला पाहिजे. परंतु वर्तमान स्थितीचे चित्र काय आहे ? खूप शिकलो, भरपूर पदव्या घेतल्या असा अर्थ लावून आपण सुसंस्कृत वा शहाणे झालो असे म्हणणे कितपत योग्य आहे. मासिक पाळीच्या काळात चुकीच्या धार्मिक वा सांस्कृतिक वातावरणाखाली आजही आधुनिक भारतातल्या स्त्रियांना अपवित्र मानलं जाणं, त्यांना देवघरापासून ते माजघरात प्रवेश करण्यास मज्जाव केला जातो हे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय ? 

तेव्हा सुसंस्कृत असणे म्हणजे नेमके काय हे ही स्पष्ट असायला हवे नाहीतर आपल्याकडे आज महिलांचे शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे, पण त्या कितीही सुशिक्षित झाल्या तरी आपल्या वर्षानुवर्ष्याच्या ज्या काही अंधश्रद्धा असतात त्या सोडायला तयार नसतात.  

मुंबई विद्यापीठात असतानाची एक गोष्ट इथं उधृत करते. कारण जिच्यामुळे मी फार अचंबित झाले आणि असलंकसलं शिक्षण माथी मारलं जातंय की ज्यामुळे समाज अंधश्रध्द बनतोय असं वाटायलाही लागलं. माझी मैत्रीण असणारी एक मुलगी उच्च विद्याविभूषित होऊन (पासआऊट ) विद्यापीठातून बाहेर पडते. काही दिवसांनी तिचा कॉल येतो आणि आमच्या गप्पा रंगतात. बोलता बोलता ती म्हणाली आमच्या इथे एक नदी आहे, तिथे मी निघालेय. मला वाटले हिला नदीवर फिरायला जायचे असेल किंवा कपडे धुवायचे असतील पण असं काहीच नव्हतं, तर तिला बरे वाटत नव्हते. तिची प्रकृती बिघडलेली म्हणून तिला दहीभात आणि फळे नदीवर सोडयची होती. खरंतरं मला क्षणभर तिच्या या मानसिकतेची कीव वाटली. मी तिला प्रतिप्रश्नही केला की तू सायन्सनी शिकलेली विद्यार्थीनी ना ? मग असले थोतांड वा कर्मकांड आजही तू मानते ? त्यावर ती म्हणाली करावे लागते हे सारं. 

तिच्या या प्रतिउत्ताराने मी थोडी थबकली आणि मग संस्काराने माणूस घडला पाहिजे की बिघडला पाहिजे ? शिक्षणाने माणूस ज्ञानवादी झाला पाहिजे की अज्ञानवादी बनला पाहिजे.  ज्ञानाने माणूस विज्ञानवादी झाला पाहिजे की अंधश्रध्दावादी झाला पाहिजे, असे अनेकविध प्रश्न मला अस्वस्थतेच्या गर्तेत घेऊन गेले. अंततः सकस बुध्दीवादी संस्कारक्षम शिक्षण जर या मुलीला मिळाले असते तर कदाचित हीचा वेचारिक प्रवाह शिक्षणाकडून ज्ञानाकडे आणि ज्ञानाकडून विज्ञानाकडे गेला असता. नदीच्या दिशेकडे वाहात गेला नसता, असा एक विचार मनाला स्पर्शून गेला !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com