देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी

गोविंद अपार्टमेंटमध्ये दोन कोरोना बाधित रुग्ण आढल्यामुळे खळबळ माजली होती. सत्तर वर्षांचे जोशी आजी आजोबा कोरोना बाधित झाले होते. दोघांनाही सौम्य लक्षणं असल्याने हॉस्पिटलमधे न ठेवता घरातच राहण्यास सांगितले होते. सकाळीच पालिकेचे लोकं येऊन जोशी आजोबांचा मजला सील करून गेले होते. इथे मीराला सकाळपासून नुसते फोन वर फोन येत होते. काही नातेवाईकांचे तर काही मैत्रिणींचे. "अग तुमच्याच सोसायटीमधे सापडले ना रुग्ण?? " "बापरे.. आता काय होणार ग तुमचं?? " वगैरे वगैरे कोरड्या काळजीचे फोन घेऊन मीरा जाम वैतागली होती. सोसायटीच्या वॉट्सअप ग्रुपवर तर कहरच चालू होता. जोशी आजी आजोबांना अगदी वाळीत टाकल्यातच जमा केलं होतं.

मीराला प्रश्न पडला होता कि ज्यांना हा आजार झाला आहे आता ते कसं करतील या बद्दल कोणी चकार काढला नाही. बाकी नको त्या गोष्टींवर चर्चा करत बसलेत सगळे. "खरंच किती चांगले आहेत जोशी आजी आजोबा.. दरवर्षी न चुकता पुणे ते सासवड वारीला जाणारे ते विठ्ठल भक्त दोघे कधी कोणाच्या अध्यात ना मध्यात.. नेहमी आनंदी राहणारे.. मुलगा परदेशात स्थायिक झाल्याने पडत्या वयात एकमेकांना आधार देऊन राहणारे एकदम हैप्पी गो लकी कपल आहेत ते सोसायटी मधले आणि त्याच्यावर ही वेळ यावी?? अर्थात कोणाचा स्वभाव बघून हा रोग होत नाही." या सगळ्या विचारांचे मीराच्या मनात काहूर माजले होते.

इथे जोशी आजी आजोबा तापाने फणफणले होते. तोंडाची चव गेली होती आणि अंगात अजिबात ताकद नव्हती. तरी कसं बसं आजींनी डाळ तांदळाची खिचडी केली होती आणि ती खाऊन दोघे निपचित पडून होते. आजी राहून राहून विठ्ठलाचा धावा करत होत्या. "पांडुरंगा अरे काय वेळ आणलीस आमच्यावर.. काय चूक झाली आमची? तुझ्या दारी मरण यावं हीच इच्छा होती पण आता आमचे मृतदेह पण कोणी घेणार नाही. कुठे कमी पडलो आम्ही तुझ्या भक्तीत? " "अग असं अभद्र बोलू नकोस. काहीही होणार नाहीये आपल्याला. शांत हो बघू आधी ". जोशी आजोबांनी आजींना शांत केलं.

इथे आपलं मन शांत करण्यासाठी मीराने पुस्तकांचे कपाट उघडलं आणि चांगलं पुस्तकं शोधू लागली. तोच तिच्या हाती तिच्या आजीने लहानपणी भेट दिलेले 'गोष्टी संतांच्या 'हे पुस्तकं लागले. पुस्तकं घेऊन मीरा थेट आजीच्या फोटो समोर जाऊन बसली आणि एक एक गोष्ट वाचू लागली. आपल्या लाडक्या आजीची आठवणीने तिचे डोळे पाणावले. मीराची आजी सुद्धा पायी पंढरपूरची वारी करत असे. मीरा लहानपणी तिला नेहमी विचारत असे कि "आजी वारकरी म्हणजे काय ग? " "अग नुसती वारी केली म्हणजे कोणी वारकरी होत नाही. ज्याला जळी, स्थळी, काष्टी परमेश्वर दिसतो.. भूतदया मानवता या तत्वांवर जो जीवन जगतो तो खरा वारकरी ."

आजीचे हे उत्तर मीराला फार आवडे. आजीच्या आठवणीतून भानावर येऊन मीराने पुन्हा पुस्तक वाचायला सुरवात केली आणि त्या गोष्टी पुन्हा एकदा वाचून तिच्या हे लक्षात आले कि देवानेही देवपण सोडून अडचणीत असलेल्याला भक्तांची नेहमी मदत केलीये. या विचाराने मीरा भानावर आली. पटकन उठून स्वयंपाकघरात गेली. चहा आणि पोहे करून डब्यात भरले आणि तो डबा जोशी आजोबांच्या दारात ठेऊन आली.

घरी येऊन मीराने जोशी आजोबांना फोन केला आणि म्हणाली "आजोबा दार उघडून डबा घ्या आणि हो आजींना सांगा आज पासून सकाळ संध्याकाळ मी तुम्हाला जेवणाचा डबा देणार आहे. "
"अग मुली तुला माहितीये ना आम्हाला काय झालंय ते?" जोशी आजोबा म्हणाले. "हो चांगलंच माहितीये. तुमच्या दारात डबा ठेवल्याने मला कोरोना होणार नाहीये . मी काही एक ऐकणार नाहीये तुमचं. आजपासून तुमच्या जेवणाची मी सोय करणार आहे ". असं म्हणून मीराने फोन ठेऊन दिला. आणि त्या दिवसापासून अगदी सकाळच्या चहा पासून ते रात्री हळदीच्या दुधापर्यंत सर्व काही मीरा जोशी आजोबांच्या दारात ठेऊ लागली.

असेच काही दिवसांनी दुपारी जोशी आजोबांचा मीराला फोन आला. "आजोबा बसं 15 मिनटात डबा ठेवते.. सॉरी आज जरा उशीर झाला. " "अग मुली किती गडबड.. मी तुला वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. आज आमच्या पुढच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले आहेत.. " "आजोबा अहो काय सांगताय..!! किती आनंदाची बातमी दिली तुम्ही "..मीराचा चेहरा आनंदाने फुलला. "हो.. आमच्या मुलालासुद्धा सांगितलं नाही अजून.. पहिला फोन तुलाच केला.. " जोशी आजोबांकडून आज्जीने फोन घेतला आणि म्हणाल्या "मुली अगदी देवासारखी धावून आलीस बघ.. मी उगाच विठुरायाला दूषण देत होते. तुझ्या रूपात आमच्या मदतीला तो धावून आला बघ. "

"अहो आजी फार मोठेपणा दिला तुम्ही मला. मी फक्त माझ्या आजीच्या व्याख्येतील 'वारकरी 'बनण्याचा प्रयत्न केला जो मानवता आणि भूतदया या तत्वांवर आपले जीवन जगतो." डोळे पुसत मीरा म्हणाली, "आज डब्यात गोडा धोडाचं देते. काळजी घ्या आजी." इथे जोशी आजींनी देवा जवळ दिवा लावून साखर ठेवली आणि विठूरायाची क्षमा मागितली आणि म्हणाल्या, "देवा तुझी लीला अपरंपार आहे. आज तुझ्या देवळाची दारं बंद झाली.. अगदी तुझी वारी पण रद्द झाली पण तू घराघरात वास करून माणसातला देव बघायला शिकवलं. "

मीरा सुद्धा आपल्या लाडक्या आजीच्या फोटोसमोर बसली.. हात जोडून आजीला म्हणाली, "आज खरं मी तुझी नातं शोभतिये. तुझ्या शिकवणीमुळे आज मी वारकरी झाले.. हा वारसा असाच पुढे नेईन याची मी तुला खात्री देते. " मीराचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि नकळत ती आजीचे आवडते भजन गाऊ लागली..

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी
देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com