एक चिराग ही काफी हाेता है !

एक चिराग ही काफी हाेता है !

नीरव शांतता... काळ्या रंगाच्या दुलईची कांबळ पांघरलेले आभाळ आणि त्याच छताखाली सदोदितपणे वाढणारे असंख्य नरकासूर! 
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत...
अभ्युत्थानम्‌ अधर्मस्य तदात्मानंम्‌ सृजाम्यहम...
पण याच असंख्य नरकासुरांचा खातमा करण्याच्या उद्देशाने आश्विन कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी अंधारलेल्या गर्भातून पर्वतांना चिरत पूर्वेकडे लाल तांबूस रंगाचा आकाश कंदील हळूच मान बाहेर काढू लागतो. कुकुक्कु करत कोंबडा आरवतो. वातावरणात अचानक वाढलेली गुलाबी थंडी अंगाशी खेटून अल्लडपणे चाळा करू लागते. प्रात:समयी वृक्षराजीवर पडलेल्या दवबिंदूने संपूर्ण झाड सळसळून निघतं. सोनेरी रथावर विराजित होऊन आद्यदेवतेची दैवीकिरणे या सृष्टीवर उमटतात... मातीच्या कुशीत विसावतात... हे दृष्य मोठे विलोभनीय असते. जणू काही पार्थासोबत सारथ्य करत साक्षात भगवान यदूनंदनच या सृष्टीवर अवतरले असावेत. दवबिंदूंवरून परावर्तित होणारे सूर्य देवतेचे हे किरण वृक्षराजीला नवीन तेज बहाल करत असतात. इतक्‍यात उटण्याचा सुगंध मातीतून घमघमायला लागतो. पहाटेच्या समयी आकाशातून बरसलेल्या शरदाच्या अभ्यंगधारांत संपूर्ण सृष्टी न्हाऊन निघते. तांबरट-पिवळसर अशा जीर्ण कपड्यांचा त्याग करत निसर्ग हिरवाईचा शालू असा हरसाल परिधान करत असतो. कात टाकणे यालाच म्हटले जात असावे बहुतेक!

घरापुढील लायटिंग आणि असंख्य दीपांनी घर अगदी लख्ख उजळून निघालेले असते. रेडिओवर भक्तीगीतांची रेलचेलही सुरूच असते. तबला, पेटी अन्‌ गायिका-गायकांचे ‘आज सोनियाचा दिन बरसे अमृताचे घन’ ते माउलींच्या पसायदानापर्यंतचे उच्चकोटीचे सूर रसिकांना मंत्रमुग्ध करत राहतात. मग लाडू, करंजी, चकली आदी फराळांचा फडशा पाडत चिमुकले वीर नवी कोरी कपडे परिधान करत नव्या जोशात आणि नव्या दमात पुढच्या कामगिरीवर रवाना होत असतात. कोणी पिस्तुलीने टिकल्या फोडतं तर कोणी लवंगी फटाकड्यांची माळ लावून दीपावली साजरी करतं... कोणी भला मोठा ॲटमबॉम्ब फोडून, तर कोणी इवल्याशा फुलबाज्या गोलाकार फिरवत समाधान व्यक्त करतो. कोणी दगडाने टिकल्यांचे रीळ फोडण्याला प्राधान्य देतो. प्रत्येकाची सण साजरी करायची पद्धत वेगळी! पण, एक मात्र खरंय मोठ्यांपेक्षा छोटी वानरसेनाच फटाके लावण्यात तरबेज असते. चेहऱ्यावरती भीतीचा लवलेशही दिसत नाही; या उलट प्रौढ आणि जाणती माणसं फटाकड्यातून ‘फट्ट’ असा आवाज ऐकताच धूम ठोकतात. लहानपण असंच असत निरागस, नीडर.. मोठे व्हायला लागले की भीती वाटू लागते, असुरक्षित वाटायला लागतं!!
 
दोन्ही भुवयांच्यामध्ये मग एक चैतन्याचा कुकुंमतिलक आई लावते. स्वराज्याचे वारसदार मग रुजू होतात, ते अंगणात बांधलेल्या शिवछत्रपतींच्या भुईकोट किल्ल्याच्या संरक्षणार्थ! येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे आदी सारे नरवीर निसरड्या मातीतच आपापली जागा घेतात. गडावरच वाढलेल्या कडधान्य, तृणधान्य, गुहेतून हे सिंह, वाघ मग दिवसभर डरकाळी फोडत राहतात!!
पहिला दिन वसुबारसेचा गोवत्स पूजनाचा... रत्नागिरीतील माझ्या ओळखीचा एक मुस्लिम तरुण गेल्या सहा-सात वर्षांपासून गाईंचा मनोभावे सांभाळ करतोय. गोवंशाचे जतन करतोय. गाईला धर्माचे आधारकार्ड देणाऱ्यांना त्याने सणसणीत चपराक लगावलीय.

वसुबारसेनंतर येते ती धनत्रयोदशी... धन्वंतरीची पूजा करत देशाच्या वैद्यकशास्त्राचा प्राचीन सेवा-वारसा पुढे नेणारे नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश आमटे, दारूमुक्तीसाठी झटणारे डॉ. अभय बंग हे धन्वंतरीचे खरे-खुरे दूतच आहेत! तर आपली संपूर्ण संपत्ती जनसेवेसाठी खुली करणारे विप्रोचे अझीम प्रेमजी, टाटा समूहाचे रतन टाटा ही समाजातील खरी श्रीमंत माणसं होत! लक्ष्मीला पूजावे, भजावे ते असं! समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढत तुमच्या-आमच्यात प्रकाश चेतवणारे महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले ही माणसं केवळ द ग्रेटच!

हाच तो वहीपूजनाचा दिवस! तर अंधाऱ्या रात्री भररस्त्यात एका महिलेवर अत्याचार होत असताना तिला मृत्यूच्या दाढेतून सोडवत वस्त्र पुरवणारा नागपूरचा एक अनामिक व्यक्ती नक्कीच भगवान श्रीकृष्णाचा अंश असावा! ही सारी माणसं... हा सारा निसर्ग आणि ही खरी दीपावली! 

रक्तरंजित बुद्धिवाद आणि बोथट संवेदना दोन्हीही समाजविघातकच! चला दोस्त हो, आपल्यातील अंध:काराला, अज्ञानाला कायमचं झुगारून टाकूयात आणि प्रज्वलित करूयात असंख्य आकाश कंदील... ज्ञानसमृद्धता आणि बलदंडतेचा ध्यास घेऊयात! निसर्गाचे संवर्धन आणि संगोपन करूयात... कारण, निसर्गच मूळ आदिम आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्याला जपूयात. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईसारखे शांत आणि नेहमी प्रवाही राहूयात... नेहमीच स्वच्छतेचा विचार करूयात... समाजविद्वेषी सरंजामी वृत्तीच्या फांद्या तोडून टाकूयात... नेस्तनाबूत करूयात... धनाचा योग्य वापर करूयात... आणि हो, भलेही इवलीशी ज्योत घेऊन आपण पुढे निघालोय; पण ती कायम पेटती ठेवली तर संपूर्ण रस्ता पादाक्रांत करायला वेळ लागणार नाही... कारण शिखरावर पोचण्याचा दुर्दम्य आशावाद त्या पलित्यांत ठासून भरलेला आहे! जपून ठेवा पणती आसपास अंधार फार झाला आणि म्हणूनच आपल्या मनामनांत ती एक-एक ज्योत पेटवूयात... आणि या पिढीच्या डीएनए जीन्समधून ती पुढील पिढीत संक्रमित करत ज्योत से ज्योत लावत जाऊयात... क्‍योंकी ‘एक चिराग ही काफी होता है, पूरा अंधेरा मिटाने के लिए!’

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com